लिटरमागे २० रुपये खर्च होतोच कशासाठी? - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  एक लिटर दूध खरेदी-विक्रीत २० रुपयांचा फरक आहे. व्यवस्थापन खर्च कमी करून शेतकऱ्यांना अपेक्षित दूध दर देता येईल, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या संचालकांना धारेवर धरले. 

कोल्हापूर -  एक लिटर दूध खरेदी-विक्रीत २० रुपयांचा फरक आहे. व्यवस्थापन खर्च कमी करून शेतकऱ्यांना अपेक्षित दूध दर देता येईल, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या संचालकांना धारेवर धरले. 

दरम्यान, म्हैस दुधात गायीचे दूध मिसळल्याच्या कारणावरून संचालक आणि आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी होऊन चांगलीच शाब्दिक चकमक झाली. या वेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत करीत मुद्यावर बोलण्याचे आवाहन केल्यानंतर पुन्हा चर्चेला सुरवात झाली. 
‘गोकुळ’ गाय दुधाचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’च्या संचालकांना निवेदन देण्यात आले. ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या दालनात संचालकांनी आमदार पाटील यांच्याकडून निवेदन स्वीकारले. या वेळी आमदार पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक रणजितसिंह पाटील व कार्यकारी संचालक घाणेकर यांनी उत्तरे दिली. 

आमदार पाटील म्हणाले, की ‘गोकुळ’ने शासनाच्या दूध दराच्या नियमाला हरताळ फासला आहे. उत्पादकांची लुबाडणूक आणि ग्राहकांना भुर्दंड बसविणाऱ्या जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) गाय दुधाची दरकपात मागे घेतली पाहिजे. एकीकडे शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध खरेदी करायची आणि ग्राहकांना जादा दराने विक्री करायची, हे योग्य नाही. शासनाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर दिला पाहिजे; तर म्हैस दुधासाठी ३६ रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे.

वास्तविक, ही दरकपात कोणाच्या सांगण्यावरून केली आहे, हे (माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता) सर्वश्रुत आहे. दूध दरकपातीचा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक खाईत टाकणारा आहे. उत्पादकांना फायदा होतो की तोटा होतो, याच्याशी संचालक मंडळाला देणे-घेणे नाही. कारण, संघ कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे, संघातून कोणाचा फायदा होत आहे, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

‘गोकुळ’ दुधाचा विक्रीदर कायम आहे. त्यामुळे दूध संघ ग्राहक आणि उत्पादक दोघांची लूट करीत आहे. दूध खरेदी करता २४ ते २५ रुपयांनी आणि ४५ ते ४७ विक्री होते; तर बाकीचे वीस रुपये काय करता? असा सवाल करीत जर दूध संघ सुरक्षित ठेवायचा असेल तर अगोदर संचालक मंडळाने आपल्या खर्चावर मर्यादा घातली पाहिजे, असे सांगितले.

यावर रणजित पाटील म्हणाले, की आम्ही दूध उत्पादक शेतकरी आहोत. आम्हाला दूध दर कमी झालेला परवडणारा नाही. पण, संघ चांगले काम करीत आहे. ‘गोकुळ’ची ११ तारखेला बैठक आहे. यावर सकारात्मक विचार केला जाईल. यात कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आपली भूमिका मांडत असताना मोठ्या आवाजात बोलत होते. त्यामुळे, घाणेकर यांनी हळू आवाजात बोलावे, असे सांगत असताना रणजितसिंह पाटील, घाणेकर व कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी होऊन शाब्दिक चकमक झाली. या वेळी, ऋतुराज पाटील, बाबासाहेब देवकर, भय्यासाहेब कुपेकर, करणसिंह पाटील, विश्‍वास नेजदार, शशिकांत खोत, सदाशिव चरापले उपस्थित होते. 

त्यांचे वय झाले आहे...
‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आपली भूमिका स्पष्ट करताना आवाज वाढवून बोलू लागले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. संचालकही कार्यकर्त्यांना मोठ्या आवाजात सांगू लागल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. श्री. घाणेकर निवृत्त झाले आहेत. एकदा निवृत्ती घेऊन ते पुन्हा ‘गोकुळ’मध्ये काम करीत आहेत. त्यांचे वय झाले असल्याने त्यांचा तोल सुटला आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे कोणी मनावर घेऊ नये, असे बाबासाहेब चौगुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. 

११ तारखेनंतर तीव्र आंदोलन
‘गोकुळ’चे संचालक रणजिसिंह पाटील यांनी ११ तारखेला गोकुळ संचालकांच्या बैठकीत दर कपातीबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. सभासद म्हणून ११ तारखेपर्यंत आम्ही वाट पाहून यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.

Web Title: Kolhapur News Satej Patil comment