आम्ही गुन्हा केलाय, बेड्या घाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

कोल्हापूर - ‘आम्ही गुन्हा केलाय, आम्हाला बेड्या घाला...’ असा नारा देत आज दुपारी शिक्षण बचाव समितीच्या सदस्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारातच ठिय्या मारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

कोल्हापूर - ‘आम्ही गुन्हा केलाय, आम्हाला बेड्या घाला...’ असा नारा देत आज दुपारी शिक्षण बचाव समितीच्या सदस्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारातच ठिय्या मारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांची समजूत काढता काढता पोलिसांच्या नाकीनऊ आले. गुन्ह्यांबाबतच झालेला गैरसमज पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दूर केल्यानंतर यावर पडदा पडला. 

शिक्षणाच्या खासगीकरणाच्या विरोधात शिक्षण बचाव समितीने आंदोलन केले होते. याचाच एक भाग म्हणून १३ मार्चला संपूर्ण शहरात रस्त्यावर विद्यार्थ्यांचे पाठ घेतले. अशाच प्रकारचे आंदोलन बिंदू चौकातही झाले. याबाबत पोलिस प्रशासनाने शहरात एकूण ८ गुन्हे दाखल केले. गुन्ह्यांबाबत समितीच्या सदस्यांना पोलिसांनी नोटिसा बजवल्या. नोटिसांबरोबर अटकही होणार असा समज समितीचा झाला. त्यामुळे समितीने नेमके गुन्हे का दाखल केले, आपला दोष काय याबाबतची विचारणा करण्यासाठी दुपारी समितीचे सदस्य गणी अजरेकर, अब्दुल सिद्धिकी, कादर मलबारी, रमेश मोरे, अशोक पोवार, लाला गायकवाड आदींनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे गाठले. येथील ठाणे अंमलदारांकडे विचारणा केली; मात्र साहेब नसल्याने त्यांनी याबाबत तुम्ही साहेबांशीच चर्चा करा, असे सांगितले. विचारलेल्या प्रश्‍नांचे समाधान होत नसल्याचे पाहून ते संतप्त झाले. त्यांनी थेट ठाण्याच्या दारात जाऊन ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनात भरत रसाळे, सुभाष देसाई, गिरीश फोंडे, फिरोज खान, महादेव पाटील, राजाराम सुतार आदी सहभागी झाले. 

पोलिस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन करणे हे चुकीचे आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्याची प्रक्रियाही सुरू आहे. 
-तानाजी सावंत, 

पोलिस निरीक्षक, लक्ष्मीपुरी.

यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत दाखल झाले. त्यांनी हा काय प्रकार आहे, सर्वांना ताब्यात घ्या आणि गुन्हे दाखल करा, असा आदेश कर्मचाऱ्यांना दिला. त्यांनी आंदोलकांना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर आंदोलकांनी सावंत यांच्याशी चर्चा केली. बिंदू चौकात झालेल्या आंदोलनाबरोबर शहरातील इतर आंदोलनांबाबतही वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे गुन्हे आंदोलकांवर दाखल केले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल; पण कोणतीही विचारणा न करता अशा प्रकारचे आंदोलन का करता, असा जाब त्यांनी विचारला. केवळ गैरसमजातून चुकीचे वागू नका, पहिल्यांदा विचारणा करा, असेही त्यांनी आंदोलकांना सांगितले.

 

Web Title: Kolhapur News Save Education committee agitation