सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचा बाल रुग्ण विभाग बंद

डॅनियल काळे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - सर्वसामान्य गरीब, गरजू रुग्णांचा आधारवड असलेल्या महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने येथील बाल रुग्ण विभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा सर्वसामान्य रुग्णांना फटका बसणार आहे. या रुग्णालयाकडे कोणाचे लक्ष नसल्याने रुग्णालयातील एकेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 

कोल्हापूर - सर्वसामान्य गरीब, गरजू रुग्णांचा आधारवड असलेल्या महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने येथील बाल रुग्ण विभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा सर्वसामान्य रुग्णांना फटका बसणार आहे. या रुग्णालयाकडे कोणाचे लक्ष नसल्याने रुग्णालयातील एकेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 

महापालिकेच्या आरोग्य सेवेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल. एकेकाळी ते खूप नावाजलेले होते. गोरगरीबच काय, शहरातील उच्चभ्रूही या रुग्णालयात येऊन उपचार घेत असत. चारचाकी वाहनातून येऊन येथे उपचार घेणारे अनेक लोक शहरात होते. अलीकडच्या काळात मात्र रुग्णालयाची अवस्था बिकट होत चालली आहे. गळकी इमारत, अपुरा कर्मचारी, अपुरी यंत्रणा, धूळ खात पडलेली यंत्रसामग्री अशी अवस्था आहे.

डॉक्‍टरांचा पत्ताच नाही 
हॉस्पिटलमध्ये अनेकदा डॉक्‍टरांचा पत्ताच नसतो. बाह्यरुग्ण विभागात दररोज शेकडो रुग्ण डॉक्‍टरांची प्रतीक्षा करत असतात; पण महापालिका प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. खुद्द आरोग्याधिकारीच याविषयी फारसे गांभीर्य पाळत नसल्याचे दिसतात. गलेलठ्ठ पगार घेऊनही रुग्णसेवा व्यवस्थित आहे की नाही, हे पाहण्याची तसदी आरोग्याधिकारी घेत नाहीत.

व्हेंटिलेटरही पडलाय धूळ खात
या रुग्णालयात तंत्रज्ञ नसल्यामुळे लाखो रुपये खर्चून आणलेली उपकरणे धूळ खात पडली आहेत. या रुग्णालयाला रेडिओलॉजीस्टही मिळत नाहीत. कमी पगारात काम करायला कोण येत नसल्याने रेडिओलॉजीस्टची जागाही रिक्तच आहेत.

एक्‍स-रे मशीन आहे; पण फिल्मच नाहीत
अनेक रुग्ण येथे दाखल होतात. बाह्यरुग्ण विभागातही शेकडोजण येतात. अनेक रुग्णांचा एक्‍स-रे काढावा लागतो; पण गेली कित्येक दिवस रुग्णालयात एक्‍स-रे फिल्मही नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

का बंद करावा लागतोय बाल विभाग?
बाल विभाग व एनआयसी विभागात स्टाफ नर्सच नाहीत. नवीन नेमणूक केलेल्या परिचारिका हजर झालेल्या नाहीत. इतर दोन परिचारिकांनी राजीनामा दिला आहे. एक परिचारिका पायाला दुखापत झाल्याने रजेवर आहे. स्टाफ नर्स नसल्याने शिफ्ट ड्यूटी लावणे व रुग्णसेवा देणे अवघड बनले आहे. परिणामी बाल विभागच बंद करावा लागत आहे. याबाबतचे पत्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी आरोग्याधिकारी, तसेच आयुक्तांनाही दिले आहे.

Web Title: kolhapur news savitribai phule hospital child care depatment