"शिष्यवृत्ती'चा कोल्हापूर पॅटर्न राज्यात भारी...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

कोल्हापूर - महापालिका शाळा असोत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा, या शाळांतील पटसंख्या वाढवताना शिष्यवृत्ती परीक्षांतील यशाचे प्राधान्याने मार्केटिंग केले गेले. मात्र गेल्या वर्षी चौथी आणि सातवीच्या परीक्षा रद्द करून त्या पाचवी आणि आठवीसाठी घेण्याचा निर्णय घेताना अभ्यासक्रमही बदलला. त्यामुळे आता या शाळांची भिस्त पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेवरच आहे. त्यासाठी या शाळा विशिष्ट ध्येय ठेवून वर्षभर कामाला लागल्या. मोबाईल ऍपची निर्मिती असो किंवा मार्गदर्शक प्रश्‍नपत्रिकांचे संचही शिक्षकांनी तयार केले. काल परीक्षांचा निकाल लागला आणि हा कोल्हापूर पॅटर्न राज्यात भारी ठरला. 

एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या वाढलेल्या शाळा आणि इतर संस्थांच्या शाळांशी स्पर्धा करताना गेल्या पाच वर्षांत या शाळांनी अनेक नवोपक्रमांवर भर दिला. त्याशिवाय लोकसहभागातून विविध भौतिक सुविधाही शाळांत पुरवल्या. 

कोल्हापूर महापालिकेने तर गेल्या वर्षी प्रति विद्यार्थी चाळीस हजार इतक्‍या खर्चाची तरतूद केली. ई-लर्निंग सुविधा असो किंवा सेमी इंग्लिश आदी गोष्टींवरही भर दिला गेला. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सव्वीस शिक्षकांची कोअर कमिटी तयार केली आणि सराव चाचण्यांचे आयोजन करून त्यातील पहिल्या पंचवीस यशस्वी विद्यार्थ्यांना सात हजार दोनशे रुपयांची शिष्यवृत्ती दिली. विविध क्षेत्रांतील यशोलौकिकाच्या शिलेदारांची व्याख्याने आणि कार्यशाळांचे आयोजन झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजचे जादा तास तर आहेतच त्याशिवाय सुटीदिवशीही मार्गदर्शन वर्गांवर भर दिला गेला. नेहरूनगर विद्यालयाचे विनोदकुमार भोंग यांनी शिष्यवृत्ती मार्गदर्शनासाठी मोबाईल ऍप तयार केले; तर मार्गदर्शनासाठी ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातूनही अध्यापनावर भर दिला गेला. या साऱ्या प्रयत्नांचे फळ म्हणून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पातळ्यांवर राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूरने बाजी मारली. विद्यार्थ्यांकडून वर्षभरात पाचशे प्रश्‍नपत्रिकांचा सराव करून घेतला, असे नेहरूनगर शाळेच्या सुजाता दाभोळकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय वयातच व्हावी, या उद्देशाने शिष्यवृत्ती परीक्षांबाबतचे नेटके नियोजन केल्याचे प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी सांगितले. 

Web Title: kolhapur news scholarship kolhapur municipal school