शालेय क्रीडा स्पर्धेवर चिंतेचे ढग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कोल्हापूर - बेचाळीस क्रीडा प्रकारांत होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेवर चिंतेचे सावट पसरले आहे.एकीकडे स्पर्धेची कार्यक्रम पुस्तिका छपाईस गेली असून, क्रीडाशिक्षक मात्र स्पर्धेवरील बहिष्काराच्या मुद्यावर ठाम आहेत. शासनस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या कमी केलेल्या तासिकांचा प्रश्‍न अद्याप मार्गी लागलेला नाही. क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेने जिल्हा क्रीडा कार्यालय अस्वस्थ झाले आहे. 

कोल्हापूर - बेचाळीस क्रीडा प्रकारांत होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेवर चिंतेचे सावट पसरले आहे.एकीकडे स्पर्धेची कार्यक्रम पुस्तिका छपाईस गेली असून, क्रीडाशिक्षक मात्र स्पर्धेवरील बहिष्काराच्या मुद्यावर ठाम आहेत. शासनस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या कमी केलेल्या तासिकांचा प्रश्‍न अद्याप मार्गी लागलेला नाही. क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेने जिल्हा क्रीडा कार्यालय अस्वस्थ झाले आहे. 

कला व क्रीडा विषयाच्या कमी केलेल्या तासिकांमुळे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक संतप्त झाले आहेत.कोल्हापूर व पुण्यात मोर्चा काढूनही या प्रश्‍नावर शासनाकडून कोणतेच उत्तर मिळालेले नाही.या परिस्थितीत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून शालेय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम तयार केला जात असून, त्याची पुस्तिका छपाईस गेली आहे. येत्या 14 जुलैपर्यंत क्रीडा शिक्षकांनी आपापल्या शाळांचा स्पर्धेतील सहभाग निश्‍चित करावयाचा आहे. कोण-कोणत्या क्रीडा प्रकारांत शाळा सहभागी होणार,याची माहिती क्रीडाधिकाऱ्यांना द्यायची आहे.विविध खेळांच्या संघटनांनासुद्धा त्या कोणत्या खेळाच्या स्पर्धेचे संयोजन करण्यास इच्छुक आहेत,हे क्रीडाधिकाऱ्यांना कळवायचे आहे. 

जिल्ह्यात सुमारे एक हजार क्रीडाशिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांची माहिती देणे, त्याचे प्रशिक्षण देणे, स्पर्धेत त्यांची नाव नोंदणी करणे, त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जाणे, असे त्यांच्या कामाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. दरवर्षी हेच क्रीडाशिक्षक शालेय स्पर्धांत विद्यार्थ्यांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे, यासाठी धडपडत असतात. शालेय स्पर्धांत प्रतिस्पर्धी संघाकडून ओव्हरएज खेळाडू खेळविल्यास त्याची तक्रार करणारेसुद्धा क्रीडा शिक्षकच असतात. मैदानावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओरडणारेही तेच असतात.मात्र, यंदा त्यांचा मैदानावर आवाज ऐकायला मिळेल, की नाही, याची साशंकता आहे.शासनस्तरावर कमी केलेल्या तासिकांबद्दल कोणताच निर्णय झालेला नसल्याने क्रीडा कार्यालयाकडे क्रीडाशिक्षक पाठ फिरविणार आहेत. जिल्हा शारीरिक संघटनेचे प्राचार्य आर. डी. पाटील म्हणाले, ""शासनाने क्रीडाशिक्षकांवरचा अन्याय दूर केला पाहिजे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उभा करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याचा हा प्रयत्न आहे.'' 

उर्वरित कामे अपूर्ण 
विभागीय क्रीडा संकुलातील मैदानांवर यंदा स्पर्धा होणार आहे.मात्र, ज्या घाईत संकुलाचे उद्‌घाटन झाले, त्याप्रमाणे संकुलातील उर्वरित काम पूर्ण झालेले नाही.जलतरण तलावात संभाजीनगरातून येणारे सांडपाणी आजही मिसळत आहे. फुटबॉल मैदान, ऍथलेटिक ट्रॅकही चांगल्या पद्धतीने केला गेलेला नाही. 

Web Title: kolhapur news School sports