शाळांची उन्हाळी सुटी एक मे नंतरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर - वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही एक मेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने दिले आहेत. १५ ते १६ एप्रिलपर्यंत परीक्षा संपत असताना पुन्हा पंधरा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे.

कोल्हापूर - वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही एक मेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने दिले आहेत. १५ ते १६ एप्रिलपर्यंत परीक्षा संपत असताना पुन्हा पंधरा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे. शालेय उपक्रमांतून परिपूर्ण विद्यार्थी घडावेत, यासाठी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. या काळात शाळांना भेटी द्याव्यात, असेही प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांनी सोमवारी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सुटीचे. काही खासगी शाळांच्या परीक्षा दहा एप्रिलच्या आत संपतात. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळांच्या परीक्षा १५ ते १६ एप्रिलपर्यंत संपतात. नंतर शिक्षकांची पेपर तपासणी सुरू होते. काही शाळा एक मे रोजी निकाल जाहीर करतात. पेपर तपासणी झाली की अध्ययन अध्यापनाचे काम चालत नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्गात येत नाहीत, असा प्राधिकरणाचा निष्कर्ष आहे. त्यावर उपाय म्हणून एक मे नंतरच उन्हाळी सुटी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षण उपसंचालक, डाएट प्राचार्य, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकाऱ्यांना परिपत्रक दिले गेले आहे. परीक्षेनंतर गोष्टी, नाटके, कथा, कविता, पुस्तके वाचणे, त्याचे सामूहिक सादरीकरण, उन्हाळी शिबिर, परिसरातील प्राणी, पक्षी, वनस्पती, घरे, ठिकाणे, सोयीसुविधा याबाबत माहिती, चित्रे संकलित करून चिकटवह्या, संग्रह, भित्तीपत्रके अशा स्वरूपात गटागटाने निर्मिती करून त्याचे सादरीकरण, स्थानिक कारागिरांच्या मदतीने विविध हस्तकला, चित्रकला, स्थानिक
लोककलेची कार्यशाळा घेणे, क्रीडा शिबिर, पारंपरिक कथा, भारूड, नाटके आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे, शैक्षणिकदृष्ट्या चित्रपट दाखवावेत, असा कार्यक्रम प्राधिकरणाच्या संचालकांनी आखून दिला आहे. शाळेतील शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळावी, यासाठी उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्याकडून कोणते उपक्रम करून घ्यावेत, याची यादीच त्यांनी दिली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन उपक्रमांची माहिती घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

खरंच शाळा सुरू राहणार का?
एकदा वार्षिक परीक्षा संपली की निकालाचा दिवस वगळता थेट जूनमध्येच शाळेत येण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता असते. अशा स्थितीत किती विद्यार्थी वर्गात येतात आणि शाळा खरेच एक मे पर्यंत सुरू राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kolhapur News School Summer vacation after one May