स्वमग्न मुलं मतिमंद कशी ?

संभाजी गंडमाळे
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर - स्वतःच्याच जगात हरवून जाणाऱ्या स्वमग्नता (ऑटिस्टिक) मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र जिल्हा रुग्णालयांच्या पातळीवर त्यांना गतिमंद किंवा मतिमंद म्हणूनच दाखले दिले जातात. मुंबई, पुणे, नागपूर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात असेच चित्र सध्या आहे.

कोल्हापूर - स्वतःच्याच जगात हरवून जाणाऱ्या स्वमग्नता (ऑटिस्टिक) मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र जिल्हा रुग्णालयांच्या पातळीवर त्यांना गतिमंद किंवा मतिमंद म्हणूनच दाखले दिले जातात. मुंबई, पुणे, नागपूर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात असेच चित्र सध्या आहे. दरम्यान, तपासणीसाठी आवश्‍यक तज्ज्ञ व सुविधा नसल्याची कारणे याबाबत दिली जात आहेत. 

ऑटिझम हा गुंतागुंतीचा आजार बऱ्याच मुलांना जन्मजात असतो, तर काहींना दोन-अडीच वर्षांनंतर लक्षात येतो. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत असून, १९८५ मध्ये अडीच हजारांत एक, असे त्याचे प्रमाण होते. पुढे दहा वर्षांनी पाचशे मुलांत एक, तर २००१ मध्ये अडीचशे मुलांत एक, असे हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. 

२००४ मध्ये १६६, २००९ मध्ये एकशे दहा मुलांत एक, असे चित्र राहिले आणि आता तर हे प्रमाण किमान शंभर मुलांत एक, असे झाले आहे. असे असले तरी नुकत्याच ‘फोरम फॉर ऑटिझम’ संस्थेने मुंबईत केलेल्या सर्वेक्षणात एकट्या मुंबईत ६८ मुलांमागे एक इतके प्रमाण आढळले. 

सरकारच्या दिव्यांग पुनर्वसन धोरणानुसार २१ प्रकारची अपंगत्व असून, त्यात स्वमग्नता हे स्वतंत्र अपंगत्व असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेक ठिकाणी तक्रारी वाढल्या असल्या, तरी नागपूर जिल्ह्यात मात्र नुकताच स्वतंत्र दाखले देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. पुण्यात पद्मजा गोडबोले यांनी प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून सर्वांत पहिल्यांदा स्वमग्न मुलांसाठी काम सुरू केले. राज्यातील त्यांची ही पहिली शाळा ठरली. आता प्रत्येक जिल्ह्यात याबाबतच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
सांगलीच्या आशादीप विशेष मुलांच्या शाळेच्या सतनाम चड्डा सांगतात, ‘‘ऑनलाइन प्रक्रियेत स्वतंत्र दाखले मिळत नाहीत. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. येत्या चार दिवसांत पुन्हा पालकांसह संबंधितांना भेटणार आहे.’’ 

कोल्हापुरात दीपा शिपूरकर यांनी आता स्वमग्न मुलांसाठी कामाला प्रारंभ केला आहे. ऑगस्टमध्ये त्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाणार असून, कोल्हापुरातही स्वतंत्र दाखले मिळत नसल्याचे त्या सांगतात. 

पूर्वी गतिमंद, मतिमंद असे दाखले दिले जायचे; मात्र दोन वर्षांपासून स्वतंत्र दाखले मिळू लागले आहेत. राज्यात सर्वत्र असे दाखले मिळायलाच हवेत.
- पद्मजा गोडबोले,

प्रसन्न ऑटिझम सेंटर, पुणे 

स्वमग्नतेचा स्वतंत्र दाखला द्यायलाच हवा. पूर्वी असे दाखले दिले जायचे नाहीत. मात्र, खमकेपणाने पाठपुरावा केल्यास दाखले मिळतात.
- अंबिका टाकळकर,
आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम, औरंगाबाद

Web Title: Kolhapur News Self-immersed child special