शिवाजी विद्यापीठात ‘एसएसबी’ मार्गदर्शन कक्ष - डॉ. शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कोल्हापूर - सेनादलात अधिकारीपदी भरतीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्ड (एसएसबी) परीक्षांसाठी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन कक्ष सुरू करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) मानद कर्नलपद पदस्वीकृतीनंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

कोल्हापूर - सेनादलात अधिकारीपदी भरतीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्ड (एसएसबी) परीक्षांसाठी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन कक्ष सुरू करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) मानद कर्नलपद पदस्वीकृतीनंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने एनसीसीसाठी परिसरात मोठी जागा उपलब्ध करून देऊन एनसीसीच्या उपक्रमांना चालना दिली आहे. पदवी स्तरावर एनसीसी हा विशेष लष्करी अभ्यासक्रमही विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुरू केला. विद्यापीठात ज्याप्रमाणे युपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते; त्याच धर्तीवर ‘एसएसबी’ परीक्षांसाठीही मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येईल.

कुलगुरू डॉ. शिंदेंना निवेदन 
मेजर रूपा शहा यांच्या माध्यमातून जिल्हा एनसीसीतर्फे कुलगुरू शिंदे यांना निवेदन दिले. यात कुलगुरूंनी स्वत:च्या नावाच्या नेमप्लेटवर मानद कर्नल ही पदवी लावावी, सैन्यदलाची ॲकॅडमी सुरू करून यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा, २०१८-१९ वर्षांपासून एनसीसीच्या विद्यार्थ्यांना १० गुण मिळावेत, विद्यापीठात फायरिंग रेंज उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या.

१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनांच्या प्रसंगी विद्यापीठ प्रांगणात एनसीसीची परेड घेण्यासंबधी प्रयत्न सुरू आहेत. एनसीसीत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी काही सवलती,अधिक गुण प्रदान करता येतील का?, या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. ब्रिगेडियर पी.एस. राणा आणि कर्नल चौधरी यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कक्षापासून मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांना सन्मानपूर्वक पाचारण केले. तेथे एनसीसीचे छात्र व एनसीसी बॅंडकडून डॉ. शिंदे यांना मानवंदना दिली.

कर्नल एम.एम. चौधरी यांनी स्वागत  केले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांचा परिचय करून दिला. मानद मेजर रुपा शहा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रा. संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, निवृत्त कर्नल थोरात आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Service Selection Board in Shivaji University