शाहिरांनो देशभक्तीची प्रेरणा द्या - अंबादास तावरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

कोल्हापूर - ‘महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक जडणघडणीत शाहिरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. नव्या काळात रसिकांची अभिरुची बदलली आहे. त्यामुळे शाहिरांनी राष्ट्रपुरुषांचे पोवाडे गाण्याबरोबर सामाजिक प्रश्‍न मांडणारे पोवाडे गाऊन परिवर्तन घडविले पाहिजे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ शाहीर अभ्यासक अंबादास तावरे यांनी येथे व्यक्त केली. 

कोल्हापूर - ‘महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक जडणघडणीत शाहिरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. नव्या काळात रसिकांची अभिरुची बदलली आहे. त्यामुळे शाहिरांनी राष्ट्रपुरुषांचे पोवाडे गाण्याबरोबर सामाजिक प्रश्‍न मांडणारे पोवाडे गाऊन परिवर्तन घडविले पाहिजे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ शाहीर अभ्यासक अंबादास तावरे यांनी येथे व्यक्त केली. 

शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेस सुरवात झाली. ‘राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा’ हा शाहिरी कार्यक्रम येथील शाहू स्मारक भवनात रंगला.

शाहीर सखाराम चौगुले, संजय जाधव व बाळासाहेब खांडेकर या बुलंद शाहिरांनी खड्या आवाजात ‘जय राजर्षी शाहू राजे, तुम्हाला मानाचा मुजरा’ अशी दमदार सुरवात केली. कडाडत्या डफावरील थाप... दिमडीचा फटका अशा लोकवाद्यांनी सुरात नटवून, तालात सजविलेले एकाहून एक सरस पोवाडे सादर झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. ‘महाराष्ट्राचा उद्धारक तू रयतेचा राजा... पददलितांचा कैवारी तू श्रमिकांचा राजा... स्वातंत्र्याचे स्वप्न मनोहर तू, तुजला मुजरा... आदर्श धर्मनायक तू समतेचा राजा... दीनांसाठी दीन होऊनी पुसतो आसू, तू जनअभिमानी राजा...’ अशा विविध उपाध्यांची वर्णनात्मक मांडणी करणारी शाहिरी बुलंद आवाजात सादर झाली.

पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, शाहिरी परिषदेचे शामराव खडके, शाहीर रंगराव पाटील, लेखक विजय शिंदे आदी उपस्थित होते. तृप्ती सावंत या बालशाहिराचा सत्कार  करण्यात आला. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर शाहीर दिलीप सावंत यांनी संयोजन केले.

कलासक्‍त धोरणांचा सन्मान 
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी अनेक कलाप्रकारांना प्रोत्साहन दिले, त्या सर्व कलाप्रकारांचे प्रातिनिधिक रूप म्हणून व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. यातून शाहू महाराजांच्या कलासक्त धोरणांचा सन्मान करण्याचा भाग आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Shahu Jayanti Event