राजर्षी शाहूंच्या नगरीतच मिळेना त्यांचे छायाचित्र

प्रमोद फरांदे
रविवार, 25 जून 2017

दोन वर्षांपासून छपाईच नाही; शासकीय पातळीवर उदासीनता; वारंवार मागणी होऊनही दुर्लक्ष 

दोन वर्षांपासून छपाईच नाही; शासकीय पातळीवर उदासीनता; वारंवार मागणी होऊनही दुर्लक्ष 

कोल्हापूर - सामाजिक सुधारणेचा विचार आणि कार्याद्वारे देशाला विकासाची दिशा देणाऱ्या महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांची छायाचित्रे शासकीय मुद्रणालयात मिळत नाहीत. राजर्षी शाहू महाराजांची छायाचित्रे दोन वर्षांपूर्वीच संपली आहेत; मात्र वारंवार मागणी होत असूनही ती छापली गेली नसल्याने कोल्हापूरच्या शासकीय मुद्रणालयात उपलब्ध होत नाहीत. शासकीय पातळीवरील उदासीनतेमुळे राजर्षींच्या भूमीतच महाराजांचे शासनाचे अधिकृत छायाचित्र मिळत नसल्याची स्थिती आहे. 

महापुरुषांचे विचार, कार्याची समाजाला दिशा व प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाकडून त्यांचे चरित्र व साहित्य प्रकाशित केले जाते. संशोधक, अभ्यासकांसाठी हे साहित्य मौल्यवान ठेवा असतो. त्याचबरोबर शासनाकडून महापुरुषांचे छायाचित्रतही छापले जाते. ते अधिकृत छायाचित्र असते. त्यामुळे या छायाचित्रांना राज्यभरातून मोठी मागणीही असते.

यातून शासनाला महसूलही मिळत असतो. शासनाच्या नियमानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये महापुरुषांची छायाचित्रे लावणे बंधनकारक आहे. कार्यालयप्रमुखाने शासकीय मुद्रणालयातून महापुरुषांची छायाचित्रे विकत घेऊन त्याची फ्रेम करून कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याबाबत शासन निर्णयात नमूद आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या तरतुदीचा उल्लेखही आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांतूनही महापुरुषांच्या छायाचित्रांची मागणी होत असते. 

राजर्षी शाहूंची भूमी म्हणून कोल्हापूरची देशात ओळख आहे. महाराजांनी कोल्हापूर जिल्हा सुजलाम, सुफलाम केला. त्यासाठी विविध क्षेत्रांच्या उन्नतीसाठी त्यांनी उचललेले पाऊल आजही दिशादर्शक ठरते. पुरोगामी विचार त्यांनी घराघरांत नेला. त्यामुळे शाहू महाराजांविषयी कोल्हापूरच्या जनतेमध्ये विशेष आस्था आहे. शाहू महाराजांच्या विचारांद्वारेच आजही सामाजिक कार्याचा प्रारंभ होत असतो. राज्यातील अनेक संशोधक, अभ्यासक कोल्हापुरात येऊन राजर्षी शाहू महाराजांच्या दुर्लक्षित पैलूवर अभ्यास करत असतात. त्यांच्यावरील साहित्य खरेदी करीत असतात. कोल्हापूरच्या शासकीय मुद्रणालयातून शाहू महाराजांवरील साहित्य, छायाचित्रांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. असे असतानाही गेल्या दोन वर्षांपासून राजर्षी शाहू महाराजांचे छायाचित्र विक्रीसाठी उपलब्ध नाही. मुंबईतील मुद्रणालयात हे छायाचित्र छापले जाते. तेथून ते पुणे, कोल्हापूर, नागपूर आदी शासकीय मुद्रणालयात विक्रीसाठी उपलब्ध केले जाते.

मुंबईतील शासकीय मुद्रणालयातच शाहू महाराजांचे छायाचित्र छापले गेले नसल्याने ते उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मुद्रणालयात छायाचित्रांची वारंवार मागणी होत आहे. त्यांनीही छायाचित्र छापण्याबाबत मुंबईतील कार्यालयाकडे अनेकदा मागणी केली आहे, असे असताना छायाचित्र का छापले जात नाही, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

शाहू महाराजांचे छायाचित्र छापण्यासाठी मुंबईतील कार्यालयाकडे फोन, पत्राद्वारे वारंवार पाठपुरावा केला आहे. शाहू जयंतीला शाहूंचे छायाचित्र विक्रीसाठी उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली होती. शाहू महाराजांवरील गौरव ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, छायाचित्र अद्याप उपलब्ध झालेले नाही.
- एस. के. आढाव, प्रभारी व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर.

Web Title: kolhapur news shahu maharaj photo not available in shahu city