आज ईदचा गोडवा आणखी वाढला 

आज ईदचा गोडवा आणखी वाढला 

कोल्हापूर - "व्हिक्‍टोरिया मराठा बोर्डिंग' असं भारदस्त नाव म्हणजे इथे फक्त मराठा विद्यार्थीच असे वाटण्यासारखा तो काळ होता; पण त्याही काळात (1901) त्या बोर्डिंगमध्ये दहा मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी प्रवेश राखून ठेवला होता. त्याहीपुढचा भाग असा, की अथणीचा शेख युसूफ अब्दुला हा एक गरीब हुशार विद्यार्थी होता. त्याची हुशारी पाहून त्याला पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आणून मराठा बोर्डिंगमध्ये ठेवले. तेथे शिकून तो प्रांत, ट्रेझरी ऑफिसर, असिस्टंट दिवाण पदापर्यंत पोचला. एवढेच काय मुस्लिम समाजातल्या या शिकून मोठ्या झालेल्या शेख युसूफवर समाजासाठी मुस्लिम बोर्डिंग उभे करण्यासाठीही महत्त्वाचा भार टाकण्यात आला. पुढे मुस्लिम जरूर उभे राहिले; पण या साऱ्या वाटचालीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा एक द्रष्टा राजाच पहिल्यापासून ठाम पाठीशी राहिला आणि सर्वधर्मसमभावाचा एक कृतिशील आदर्श या राजाने कोल्हापुरात घडवून दाखवला. 

मुस्लिम समाज व शाहू महाराज यांच्यातील नाते सांगणारे हे झाले केवळ एक उदाहरण; पण अशा अनेक घडामोडी घडल्या, की शाहू महाराज तेथे मुस्लिम समाजाच्या पाठीशी घट्ट उभे राहिले व कोल्हापूरला सामाजिक सलोख्याचे एक वेगळे कोंदण त्यांनी मिळवून दिले. हा सारा इतिहास जरूर नोंद आहे; पण योगायोगाने आज प्रथमच शाहू जयंतीला रमजान ईदच्या दिवसाची जोड मिळाली आहे आणि ईदच्या गोडव्यात आणखी भर पडली आहे. 

शाहू महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी जे काही केले, त्याला तोड नाही; पण हे करताना त्यातील जे बारकावे त्यांनी वैयक्‍तिक पातळीवर जपले त्यातून खूप चांगले संदेश साऱ्या समाजासाठी गेले. त्यांनी मराठा बोर्डिंग स्थापन केले. त्यात दहा मुस्लिम विद्यार्थ्यांची सोय केली. त्याहीपुढे जाऊन मुस्लिमांसाठी स्वतंत्र वसतिगृहाच्या उभारणीची आखणी केली. वसतिगृहासाठी दसरा चौकातील जागा दी एडवर्ड मोहामोडन एज्युकेशन सोसायटीला मोफत देण्याचा हुकूम म्युनिसिपालिटीला केला. बांधकामासाठी इंजिनियर रावसाहेब गुप्ते व त्यांच्या स्टाफने मदत करावी, अशी सूचना केली. वसतिगृह उभारणीसाठी जितके सागवानी लाकूड लागेल, ते मोफत देण्याची तजवीज केली व पुढील खर्चासाठी जमिनी दान करून खर्चाची जुळणी करून दिली. आज हेच मुस्लिम बोर्डिंग केवळ मुस्लिमांचे नव्हे, तर कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीचे केंद्र झाले आहे. 

याशिवाय शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मुस्लिम समाज कधीही दबलेला राहणार नाही, याची काळजी घेतली. उदाहरणेच सांगायची झाली, तर 9 मार्च 1903 ला त्यांनी मुस्लिम कब्रस्तानला मोफत पाणीपुरवठ्याचा आदेश केला. स्टेशन परिसरातल्या सरदार लोकांना ज्या नळावाटे पाणी देण्यात येते, त्याच नळाचे पाणी आठ दिवसांत देण्याचे आदेश त्यांनी काढले. शाहूपुरी मशीद बांधण्यासाठी 1085 रुपये मंजूर करून त्याचे काम पुढे सुरू केले. त्याचवेळी त्यांनी बोहरी समाजासाठी शिवाजी रोडवर पाच हजार चौरस फुटांची जागा (त्यावेळच्या जागा निर्देशानुसार टांगा अड्डा ते रविवार वेस रस्त्यावर) मोफत देण्याचा आदेश काढला. हे करताना त्यांनी ही जागा बोहरी लोकांच्याच सार्वजनिक मालकीची राहील, त्यावर अन्य मुस्लिमांची मालकी राहणार नाही, हे स्पष्ट केले व एखाद्या वरिष्ठाने आदेश देताना त्यात किती स्पष्टता पाहिजे, हेच त्यांनी दाखवून दिले. 

भोला पैलवान हा मुस्लिम समाजातील एक प्रख्यात पैलवान; पण त्याला राहायला स्वत:चे घर नव्हते. शाहू महाराज यांनी 1 जुलै 1914 ला स्टेशन रोडवर एक घरच बक्षीस म्हणून दिले. 

चार चॉंद लागणार... 
महाराजांनी पन्हाळगडावरील मुस्लिम वस्तीत पाण्यासाठी विशेष आदेशान्वये सोय करून दिली. साधोबा दर्ग्याजवळ जे मुस्लिम राहतात, त्यांची पाण्याची गैरसोय होती. त्यामुळे गडावरील कमंडलुतीर्थ या विहिरीतून सरकारी नळावाटे पाणी देण्याची त्यांनी व्यवस्था केली. शाहू महाराज व मुस्लिम समाज यांचे नाते आजही तसेच जपले गेले आहे. मुस्लिम बोर्डिंगच्या समोरच शाहू महाराजांचा पुतळा आहे. ईदच्या निमित्ताने बोर्डिंगच्या पटांगणात सामूहिक नमाजासाठी अख्खा मुस्लिम समाज एकत्र येणार आहे. तेथेच शाहू जयंतीचा दिमाखदार सोहळा आहे. त्यामुळे यावर्षी ईदच्या गोडव्याला चार चॉंद लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com