माजी महापौरांच्या पुत्रासह ‘मास्तरां’चा डाव उधळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

कोलहापूर - शालिनी सिनेटोनचे आरक्षण उठवण्यासंबंधी माजी महापौरांच्या पुत्रासह ‘मास्तरां’चा डाव उधळला. या दोघांसह अन्य एका सदस्याचा यामध्ये रस होता; मात्र प्रकरण अंगलट येऊ लागल्याने दोन्ही काँग्रेससह भाजप - ताराराणी आघाडीची पाचावर धारण बसली.

कोलहापूर - शालिनी सिनेटोनचे आरक्षण उठवण्यासंबंधी माजी महापौरांच्या पुत्रासह ‘मास्तरां’चा डाव उधळला. या दोघांसह अन्य एका सदस्याचा यामध्ये रस होता; मात्र प्रकरण अंगलट येऊ लागल्याने दोन्ही काँग्रेससह भाजप - ताराराणी आघाडीची पाचावर धारण बसली.

सत्तारूढसह विरोधकांनीही कार्यालयीन प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर करावा, सिनेटोनचे आरक्षण कोणत्याही स्थितीत उठवू नये, अशी मागणी केली. महिनाभरापासून चाललेल्या या प्रक्रियेत माजी महापौरांचे पुत्र, ‘मास्तरां’सह अन्य एका सदस्याचा समावेश होता. अत्यंत हुशारीने त्यांनी आपल्या प्लॉटिंगची व्यवस्थाही यात केल्याचे समजते. 

काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक भूपाल शेटे, दिलीप पोवार, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, लाला भोसले, दुर्वास कदम यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शालिनी सिनेटोनचा ठराव बहुमताने मंजूर करावा, असे आयुक्तांना निवेदन देणार आहोत. त्यासाठी सह्यांची मोहीम सुरू आहे. सिनेटोनची जागा कोणत्याही स्थितीत वाचली पाहिजे. पूर्वी दोन भूखंड राखीव ठेवण्याचे हमीपत्र दिले असताना प्रशासनाने प्रस्ताव का आणला, याचे आश्‍चर्य वाटते. संगनमताने प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे नगररचनाचे सहायक संचालक खोत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शेटे यांनी केली. यासंबंधीचा प्रस्ताव आयुक्तांनी जसाच्या तसा मंजूर करावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भाजप - ताराराणी आघाडीतर्फे सत्यजित कदम यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत कोणत्याही स्थितीत शालिनी सिनेटोनचे आरक्षण उठविणार नसल्याचे सांगितले. महासभेत प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना सदस्यांना दिली होती; मात्र प्रस्तावात जागेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे प्रस्ताव नामंजूर केला. प्रमुख मंडळीही सभेस गैरहजर होती. प्रस्ताव आयुक्तांनी जसाच्या तसा मंजूर करावा, अशी आयुक्तांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. विरोधी नेता किरण शिराळे, विजय सूर्यवंशी, आशीष ढवळे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Shalini cine-stone issue