शालिनी सिनेटोनची जागा हेरिटेजमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

कोल्हापूर - महापालिकेतील कारभाऱ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सध्या शहरात गाजत असलेल्या शालिनी सिनेटोनमधील वादग्रस्त जागा ‘हेरिटेज वास्तू ग्रेड तीन’मध्ये घालण्याचा निर्णय हेरिटेज कॉन्झर्वेशन समितीच्या बैठकीत घेतला.

कोल्हापूर - महापालिकेतील कारभाऱ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सध्या शहरात गाजत असलेल्या शालिनी सिनेटोनमधील वादग्रस्त जागा ‘हेरिटेज वास्तू ग्रेड तीन’मध्ये घालण्याचा निर्णय हेरिटेज कॉन्झर्वेशन समितीच्या बैठकीत घेतला. त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. सहायक संचालक, नगररचना विभाग, महापालिका बागल मार्केट, राजारामपुरी पहिली गल्ली, जनता बझार येथील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

शालिनी सिनेटोनमधील भूखंड क्रमांक पाच व सहा आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता; मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. तत्कालीन महापौर हसीना फरास यांच्या कार्यकालातील ही शेवटची सभा होती. त्यामुळे हा ठराव जाता जाता चर्चा न होताच मंजूर झाला; मात्र नंतर हा ठराव नामंजूर करण्यासाठी कारभाऱ्यांनी केलेल्या बाजाराची चर्चा सुरू झाली. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत आणि विरोधी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीत धुसफूस सुरू झाली. 

स्थापना व चित्रपट निर्मिती!
राजाराम महाराज यांच्या भगिनी श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोन चित्रसंस्था व स्टुडिओ १९३३ मध्ये रंकाळा तलावाच्या पश्‍चिमेस असणाऱ्या माळावर स्थापन करून बोलपट निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला व बाबूराव पेंटरांवर दिग्दर्शनाची जबाबदारी देऊन शालिनी सिनेटोनने ‘उषा’ या पहिल्या मराठी, हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या जागेचा ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ग्रेड ३ यादीमध्ये समावेश करण्याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

ठराव नामंजूर करून चूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या नगसेवकांनी आयुक्‍तांची भेट घेतली. त्यांनी हा ठराव आम्हास मंजूर करून करावयाचा आहे. त्यावर तोडगा सुचविण्याची विनंती केली. 

त्यावर हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यासाठी ४१ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र देण्यास सांगितले. त्यानुसार दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांनी सह्यांची मोहीम हाती घेतली. त्यावर ४७ नगरसेवकांनी सह्या केल्या. ४७ नगरसेवकांचे सह्या असलेले पत्र आयुक्‍तांना देण्यात आले आहे. दरम्यान, ही जागा वाचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील प्रयत्न सुरू होते. आयुक्‍तांनी आपल्याला असलेल्या खास अधिकाराचा वापर केला आहे.

ही जागा हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या सल्ल्याने नियमावलीतील विहित प्रक्रिया राबवून ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये वाढ अथवा सुधारणा करण्याचा अधिकार आयुक्‍त यांना आहेत. त्यानुसार हेरिटेज कमिटीच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत शालिनी सिनेटोनमधील रि.स.न. ११०४ पैकी भूखंड ५ चे ६३१०.६० चौरस मीटर व भूखंड क्रमांक ६ चे १६१०१.६० चौरस मीटर क्षेत्र आणि ॲमिनिटी स्पेस क्षेत्र ६४८१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा ऐतिहासिक परिसर म्हणून ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत ग्रेड तीनमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी दिलेल्या जाहीर प्रकटनामध्ये म्हटले आहे की, शालिनी सिनेटोन इमारत असणारी जमीन रि. स. नं. ११०४ पैकी ॲमिनिटी स्पेससह भूखंड क्रमांक पाच व सहा कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजना आराखड्यात शालिनी सिनेटोनकरिता वाणिज्य भूवापर म्हणून दर्शविला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(२) अन्वये शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करून हेरिटेजबाबतची नियमावली अंतर्भूत करण्याबत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ७४ वारसा स्थळांची यादी मंजूर केली आहे.

शासनाने शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने शासनाने १७ एप्रिल २०१५ रोजी काढलेल्या आदेशानुसार शहरासाठी हेरिटेज कॉन्झर्वेशन समिती स्थापन केली आहे. या समितीने १३ डिसेंबर २०१६ रोजीच्या बैठकीत शालिनी सिनेटोन याखेरीज जागेचा अन्य वापर अनुज्ञेय होणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच ता. २१ जून २०१७ रोजीच्या बैठकीतही महाराष्ट्र शासनास हेरिटेज स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत कळविण्याचा निर्णय झाला आहे. 

Web Title: Kolhapur News Shalini Cine tone issue