शालिनी सिनेटोनची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न - आयुक्‍त

शालिनी सिनेटोनची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न - आयुक्‍त

कोल्हापूर - ‘‘शालिनी सिनेटोनसाठी जागा आरक्षित ठेवण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून फेरप्रस्ताव आणला जाईल. ज्यांनी प्रस्ताव नामंजूर केला आहे, त्याच नगरसेवकांनी पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. 

त्यावर ४७ नगरसेवकांच्या सह्या आहेत. त्यामुळे महापालिका कायद्यानुसार फेरप्रस्ताव सादर करता येऊ शकतो. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल,’’ असे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.  या जागेचा हेरिटेजमध्ये समावेश करता येतो काय, यासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दोनशे चौरस मीटरच्या आतील बांधकामांना परवानगीची प्रक्रिया राज्य शासनाच्या नव्या परिपत्रकाद्वारे आर्किटेक्‍चरने राबविण्याची आहे. त्याची सुरुवात त्यांनी करावी. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतील संबंधित विभागाची केवळ त्यावर स्वाक्षरी घ्यावी.
- डॉ. अभिजित चौधरी,
आयुक्‍त

शालिनी सिनेटोनची जागा आरक्षित करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तत्कालीन महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सादर केला होता. हा प्रस्ताव नामंजूर झाला आणि सौ. फरास यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला. हा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी आणि शिवसेना या सर्वांनी एकमताने मंजूर केला. सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी कोणतेही आरक्षण उठविणार नाही, असे आपल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटले होते, तरी देखील कारभाऱ्यांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे या ठरावात कारभाऱ्यांनी आंबा पाडल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाल्यानंतर पुन्हा हा ठराव सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तसे आयुक्‍तांना निवेदनही दिले आहे.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना आयुक्‍त डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘शालिनी सिनेटोनची जागा वटमुखत्यारदाराने हमीपत्रावर लिहून दिल्याप्रमाणे त्यासाठी आरक्षित राहावी यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने शालिनी सिनेटोनसाठी जागा आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला होता; पण तो नगरसेवकांनी नामंजूर केला. तरीही ही जागा वाचविण्यासाठी प्रशासन कायदेशीर बाबी तपासून पहात आहेत. या जागेसंदर्भात मंत्रालयात सुनावणी सुरू आहे. त्याची देखील माहिती घेण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे विभागीय कार्यालयाकडून या जागेसंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांचीही माहिती मागविली आहे. या प्रकरणात सध्या तरी फेरप्रस्ताव सादर करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. त्यामुळे यासंदर्भात येत्या आठ दिवसांतच निर्णय घेऊन महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेतच हा फेरप्रस्ताव सादर करण्यात येईल.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com