शालिनी सिनेटोनची विकसकाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

कोल्हापूर - ‘शालिनी सिनेटोनची जागा हेरिटेज वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, तसेच या जागेवरील आरक्षणाबाबत झालेल्या ठरावात बदल करण्यास मनाई मिळावी’, अशी वटमुखत्यारदार पांडुरंग घुमरे यांनी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर दाखल केलेली यचिका आज फेटाळण्यात आली.

कोल्हापूर - ‘शालिनी सिनेटोनची जागा हेरिटेज वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, तसेच या जागेवरील आरक्षणाबाबत झालेल्या ठरावात बदल करण्यास मनाई मिळावी’, अशी वटमुखत्यारदार पांडुरंग घुमरे यांनी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर दाखल केलेली यचिका आज फेटाळण्यात आली. महापालिकेतर्फे ॲड. अभिजित आडगुळे काम पाहत आहेत.

शालिनी सिनेटोनची जागा देवासचे तुकोजीराव पवार यांच्या नावावर असून, त्याचे वटमुखत्यार श्री. घुमरे यांनी घेतलेले आहे. शालिनी सिनेटोन परिसरातील जागेचा ले-आऊट करत असताना श्री. घुमरे यांनी शालिनी सिनेटोनसाठी भूखंड क्रमांक पाच व सहा सोडत असल्याचे आणि त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार किंवा न्यायालयात दाद मागणार नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते. त्यामुळे महापालिकेने त्याला परवानगी दिली. हे दोन भूखंड शालिनी सिनेटोनसाठी आरक्षित ठेवण्याचा ठराव महापालिका प्रशासनाने सभागृहासमोर मांडला. शालिनी सिनेटोनचा इतिहास पाहता हा ठराव मंजूर होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती; मात्र शहरवासीयांची ही अपेक्षा फोल ठरली. 

श्री. घुमरे यांनी महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांना हाताशी धरून हा ठराव नामंजूर करून घेतला. विशेष म्हणजे त्याला विरोधी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीचे कारभारी आणि नगरसेवकही बळी पडले. 

ठराव नामंजूर झाला; तरी प्रशासन ही जागा शालिनी सिनेटोनसाठी आरक्षित करण्यावर ठाम होते. तसे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितलेही होते. दरम्यानच्या काळात नगरसेवकांनीही शालिनी सिनेटोन बचावची मोहीम हाती घेतली आणि फेर प्रस्ताव सभागृहात सादर करावा, अशी मागणी आयुक्‍तांकडे केली.

ठराव नामंजूर झाल्यानंतर शालिनी सिनेटोनची जागा हेरिटेजमध्ये घालण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका श्री. घुमरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यांनी आपल्या याचिकेत आरक्षण ठेवण्याबाबतचा महापालिका सभेत नामंजूर झालेल्या ठरावात बदल करण्यास मनाई मिळावी, शालिनी सिनेटोनची जागा हेरिटेज वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, असे म्हटले आहे. 

ॲड. आडगुळे यांनी यावर युक्‍तिवाद करताना मुद्दे मांडले, की जमिनीचे मूळ मालक श्री. पवार यांचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. निधन झालेल्या व्यक्‍तीच्या नावाने याचिका दाखल करता येत नाही. हे माहीत असूनही श्री. घुमरे यांनी याचिका दाखल केली आहे. शालिनी सिनेटोनच्या जागेचा हेरिटेजमध्ये अद्याप समावेश केलेला नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्याची तीस दिवस मुदत आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यालाही हरकत घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्या ठिकाणी ती घ्यावी. यावर न्यायालयाने श्री. घुमरे यांची याचिका फेटाळली.

Web Title: Kolhapur News Shalini Cinetone development issue