नाशिकच्या मोनिटो कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - शालिनी सिनेटोनच्या जागेतील वारसास्थळांच्या यादीतील जुनी इमारत विनापरवाना पाडल्याप्रकरणी मोनिटो एक्‍सपोर्टस्‌ प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक चांगदेव रामभाऊ घुमरे यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

कोल्हापूर - शालिनी सिनेटोनच्या जागेतील वारसास्थळांच्या यादीतील जुनी इमारत विनापरवाना पाडल्याप्रकरणी मोनिटो एक्‍सपोर्टस्‌ प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक चांगदेव रामभाऊ घुमरे यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. महापालिकेच्या नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण गवळी यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी - ए वॉर्ड रि. स. नंबर ११०४ मधील भूखंड क्रमांक ५ आणि ६ ही जागा रंकाळा तलावाच्या पश्‍चिमेस आहे. त्यामध्ये शालिनी सिनेटोनच्या इमारती अस्तित्वात होत्या. शहरातील ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांची यादी तयार करून त्यास महासभा ठराव क्रमांक ४० ने मान्यता दिली आहे. ठरावामध्ये शालिनी सिनेटोन इमारत 
हेरिटेज यादीत ग्रेड नंबर तीनमध्ये नमूद आहे. या जागेचे मालक तुकोजीराव पवार यांनी ए वॉर्ड रि.स.नंबर ११०४ क्षेत्र १,९३,८०० चौरस मीटर या जागेचा विकास करण्यासाठी मोनिटो एक्‍सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड या नाशिकच्या कंपनीकडे दिले. कंपनीचे संचालक चांगदेव घुमरे यांना वटमुखत्यारपत्र देण्यात आले. घुमरे यांनी महापालिकेस हमीपत्र दिले.

त्यात या भूखंडातील रेखाकंन मंजूर करताना शालिनी सिनेटोनसाठीच राखीव ठेवण्याचे आहे, अशी अट नमूद करण्यात आली होती; परंतु भूखंड क्रमांक ५ व ६ वर अस्तित्वातील इमारती या हेतुतः हेरिटेज यादीतून इमारतीचे नाव कमी करण्यात यावे, यासाठी अनधिकृतरीत्या बांधकाम पाडण्यात आले. शहराच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अस्तित्वातील बांधकामे पाडण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे आवश्‍यक होते; पंरतु विनापरवाना इमारती पाडल्याने वटमुखत्यार चांगदेव घुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंजूर रेखांकन रद्द करा : शेटे
दरम्यान, महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी वटमुखत्यारदारावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस ठाण्यातून आणून पत्रकारांना दिली. या वेळी ते म्हणाले, ‘‘या विषयाचा मी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सभागृहातही आवाज उठविला आहे. हा मंजूर ले-आउट रद्द करावा, अशी आपली मागणी आहे. गुन्हा दाखल करण्यातही आयुक्त डॉ. चौधरी यांनीच कडक भूमिका घेतली. त्यामुळेच हा गुन्हा दाखल होऊ शकला.’’

Web Title: Kolhapur News Shalini Cinetone issue