‘झुरायचं नाही!’ हाच दीर्घायुष्याचा मंत्र

सुधाकर काशीद
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

ब्याण्णव वर्षांच्या शामराव मोहितेंचा तरुणाला लाजवेल असा उत्साह

ब्याण्णव वर्षांच्या शामराव मोहितेंचा तरुणाला लाजवेल असा उत्साह
कोल्हापूर - यांचं नाव शामराव भिवाजी मोहिते, सध्या राहणार देवकर पाणंद, वय ब्याण्णव, तब्येत आजही धडधाकट. डोळ्याला चष्मा नाही. कानाला सगळ ऐकू येतं. काही तक्रार नाही. ब्लड प्रेशर आणि शुगर म्हणजे काय, हे तर त्यांना माहीतच नाही. वय ब्याण्णव... म्हणजे आता घरात विश्रांती असं तर अजिबात नाही. रोज लक्षतीर्थ ते देवकर पाणंद सहा किलोमीटर म्हणजे येता-जाता बारा किलोमीटर अंतर स्वतः सायकल मारत जातात. त्याहून पुढे, शेतातले गवत जनावरांसाठी कापतात आणि गवत सायकलला बांधून घरी परत येतात. एक दिवस कधी खंड नाही आणि प्रत्येक वाढदिवसाला ‘‘या पुढचा वाढदिवस आणखी दणक्‍यात’’, असं म्हटल्याशिवाय त्यांचं मनोगत पूर्ण होत नाही.

वयाची नव्वदी पूर्ण करणे सध्याच्या परिस्थितीत तसं सोपं नाही; पण आजही काहीजण नव्वदी पूर्ण केलेले आहेत. 

काही शरीराने पूर्ण थकलेले आहेत किंवा अंथरुणावर आहेत; पण श्‍यामराव भिवाजी मोहिते आजही बारा किलोमीटर सायकल चालवतात, हे मात्र खूप वेगळे चित्र आहे आणि जीवनात जे बरंवाईट वाट्याला येतंय, त्याला अजिबात घाबरायचं नाही, काळजीनं झुरायचं नाही, हे साधं-सुधं तत्त्वच त्यांच्या मते, त्यांच्या या निरोगी व दीर्घायुष्याचे कारण आहे.

श्‍यामरावांनी शेती हेच आपले लक्ष्य मानले. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण, दिवसभर शेतात काम व रात्री जेऊन जमिनीला पाठ टेकली, की लागले घोरायला हा त्यांचा दिनक्रम. त्यांना चार भाऊ, दोन बहिणी. हे सर्वांत मोठे. काळाच्या ओघात चार भाऊ, दोन बहिणींचा मृत्यू त्यांनी पाहिला.

आता ते देवकर पाणंदला मुलांसोबत राहतात; पण आजही रोज लक्षतीर्थ वसाहतीत शेतावर चक्क नातवाच्या फॅन्सी सायकलवरून येतात. गवत कापायचं काम ही एक शरीराची कसोटीच असते; पण ते रोज करतात. आपले काम थांबले, हात थांबले, की आपण थांबलो, असे म्हणत रोज स्वतःला कामात गुंतवून ठेवतात.

त्यांना आजही चष्मा नाही. कानाची तक्रार नाही. बी.पी. नाही; शुगर नाही; एवढंच काय- कधी औषधाची गोळी त्यांनी खाल्लेली नाही. याचं कारण विचारलं, की ते भाकरी, साधा भात, पालेभाज्या, आमटी आणि आठवड्यातून दोन वेळा चरचरीत मटण हेच आपलं आवडतं जेवण असल्याचं सांगतात. पांडुरंग माने, दत्तू इंगवले, महादेव राऊत, दत्तू पुजारी या आपल्या लंगोटीयार मित्रांच्या आठवणी काढतात. कधी काळी कशी दादागिरी करत होतो, हेदेखील मिशीवर हात फिरवून सांगतात.

काळजी आणि रुखरुख फार करायची नाही, हे ते आपल्या फ्रेश जीवनाचे तत्त्व असल्याचे व आपलं वय ९२ आहे आणि शंभरी अशीच बघता बघता गाठणार आहे, हे ते खणखणीत आवाजात सांगतात. वयाच्या तीस-पस्तिशीत बीपी, शुगरचा त्रास सुरू झालेल्या आपल्या या पिढीला ते प्रत्यक्ष आपल्या कृतीतूनच निरोगी जीवनाचा सल्ला देतात.
 
तारीख नाही, जन्मखूण
आज लक्षतीर्थ वसाहत जेथे आहे, तेथे चार-पाच घरे सोडली तर वस्ती नव्हती. सगळा माळ रिकामा होता. तेथे संस्थानचा तोफगोळा ठेवला जात होता. तेथे रोज दुपारी बारा वाजता तोफ उडवली जायची. तोफेचा आवाज कोल्हापुरात पोचायचा व बारा वाजल्याचा तो संदेश लोकांपर्यंत पोचायचा. या तोफेच्या माळावर श्‍यामराव मोहिते राहायचे. त्यांचे वय आज ९२... यासाठी जन्मतारीख नाही; पण १९४८ मध्ये महात्मा गांधींचा खून झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे लग्न होते. कोल्हापुरात पूर्ण संचारबंदी होती. हे त्यांना चांगले आठवते व त्या वेळी त्यांचे वय २२ होते.

Web Title: kolhapur news shamrao bhivaji mohite