देशात परिवर्तनाची गरज; त्यालाच पाठिंबा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - देशाचे आजचे चित्र बघता परिवर्तनाची आवश्‍यकता आहे. यात जे समविचारी सहभागी होतील, त्यांना एकत्रित करून त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आपली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे स्पष्ट केले. 

कोल्हापूर - देशाचे आजचे चित्र बघता परिवर्तनाची आवश्‍यकता आहे. यात जे समविचारी सहभागी होतील, त्यांना एकत्रित करून त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आपली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे स्पष्ट केले.

व्यक्तिगत सलोखा व राजकीय संबंध यात फरक आहे. माजी राजकीय भूमिका ही स्वच्छ आहे. आमची राजकीय ‘लाईन’ ठरलेली आहे. सामुदायिकपणाने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या हिताचे योग्य व त्या विचाराला पाठिंबा देणारे लोक एकत्र येत असतील तर त्या सर्वांना एकत्रित करून त्या माध्यमातून राज्य व देशाला पर्याय देण्याची स्थिती असेल तर त्या गोष्टीला माझ्यासारख्याचा मनापासून पाठिंबा असेल, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.  

त्यांचा संघर्ष आणि प्रेमही पाहिले
(कै.) मंडलिक संघर्षशील असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या राजकीय जीवनात बराच काळ ते माझ्यासोबत होते. त्यांचे प्रेमही आणि संघर्षही मी पाहिला. कुठल्याही गोष्टीत लक्ष घालायचे ते मनापासून हा त्यांचा स्वभाव होता. हीच भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिले; पण सामान्य माणसांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्काराचे वितरण श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. श्री. पवार या कार्यक्रमात काय बोलणार, लोकसभेच्या उमेदवारीबाबत काय मत व्यक्त करणार, याविषयी मोठी उत्सुकता होती; पण श्री. पवार यांनी त्यावर थेट भाष्य न करता अप्रत्यक्षपणे प्रा. मंडलिक यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, असाच संदेश आपल्या भाषणातून दिला.  

श्री. पवार म्हणाले, ‘‘माझ्या मनात काय हे माझ्या पक्षातील सगळ्या लोकांना कळते. मी वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांशी मैत्री करतो, मैत्रीचे संबंध ठेवतो. (कै.) बाळासाहेब ठाकरे माझे जवळचे मित्र. अखंड महाराष्ट्राला आमची मैत्री माहीत होती; पण ठाकरेंच्या उमेदवाराला मी कधी पाठिंबा दिला नाही आणि त्यांनीही कधी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. भाजप, शिवेसना किंवा अन्य पक्षांवर बोलायला मी उभा नाही. माझ्या मनात जे काय ते स्वच्छ आहे आणि त्यात तडजोड कधी होत नाही. व्यक्तिगत सलोखा हा मी ठेवत असतो; पण राजकीय भूमिका ही स्वच्छ असते. तीच भूमिका घेऊन काम करण्याचा आदर्श (कै.) सदाशिवराव मंडलिक यांनी अखंडपणाने घालून दिला.’’ लोकांच्या प्रश्‍नांसाठी प्रसंगी माझ्याशी संघर्ष करण्याच्या बाबतीतही ते कधी मागे राहिले नाहीत. जनतेशी बांधिलकी असलेले (कै.) मंडलिक आमचे नेते होते. त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो, ही चांगली गोष्ट आहे, असे गौरवोद्‌गारही श्री. पवार यांनी काढले.

आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात श्री. पवार यांनी कोल्हापूर, महाराष्ट्र व देश पातळीवरील शेतीसह साखर उद्योग, इतिहास आदी अनेक विषयांना हात घातला. ते म्हणाले, ‘‘आयुष्यभर सामान्य माणसाच्या व शेतकऱ्याच्या हिताची जपणूक करण्याची काळजी घेतली, अशा कै. मंडलिक यांच्या नावाने पुरस्कार देण्याची चांगली परंपरा आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा समाजासमोर ठेवून नव्या पिढीला प्रोत्साहित करावे, या हेतूने हा सोहळा होत आहे. ते जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते. त्यांच्यावर अविश्‍वासाचा ठराव आला. सत्ता काँग्रेसची, मी काँग्रेसचा सचिव, माझी नियुक्ती केली. त्या सगळ्या संघर्षातून बाहेर कसे पडायचे, याचा उत्तम नमुना त्यावेळी (कै.) मंडलिक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिला होता.’’

ते म्हणाले, ‘‘अनेक प्रकारचे प्रश्‍न आहेत; पण जे लोकांच्या जिव्हाळ्याचे आहेत, त्याची मांडणी करण्याची खबरदारी (कै.) मंडलिक यांनी घेतली. चारवेळा आमदार, चारवेळा खासदार ही गोष्ट काही साधीसुधी नाही. त्याला महत्त्वाची दोन कारणे आहेत. एक त्यांचे व्यक्तिमत्त्व व त्यांची समाजाशी असलेली बांधिलकी आणि कर्तृत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका.’’

सत्तेचा वापर शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करणारा असावा, असा अलीकडच्या काळातील राजा कोण, असा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर एकच नाव येते ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे सांगून श्री. पवार म्हणाले, ‘‘शाहू महाराजांनी अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या. प्रश्‍न सोडवण्याचे अनेक मार्ग दाखवले. शेवटच्या माणसाच्या भल्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे अनेक लोक या जिल्ह्यात झाले. माधवराव बागल, त्र्यंबक सीताराम कारखानीस, पी. बी. साळुंखे यांची आठवण यानिमित्ताने होते. अनेक नावे सांगता येतील, ज्या व्यक्ती कोल्हापुरात आल्या आणि त्यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दाखवली. या सर्वांच्या मागे शाहू महाराजांची प्रेरणा अत्यंत महत्त्वाची होती.’’

मंडलिक यांच्या स्मृतीची आठवण कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगले काम केलेल्यांची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्यांची पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल निवड समितीला धन्यवाद देतो, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत मिळाली पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात उसाचा प्रश्‍न नेहमीचा होता. सत्तेची धोरणे शेतकरीविरोधी असतात. त्यावर हल्ला करावाच लागतो. हल्ला केल्याशिवाय धोरण बदलत नाही. हे काम राजू शेट्टी यांनी केले. उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे.’’

साखर उद्योगात आता थोडे थोडे बदल होत आहेत, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ‘‘साखर निर्यातीवरील शुल्क काढले. आयात साखरेवरील शुल्क शंभर टक्के केले. श्री. शेट्टी यांच्यासह आमच्या लोकांची हीच मागणी होती. त्यातून काही तरी बदल होत आहेत; पण ते पुरेसे नाहीत. त्यात अजूनही बदल झाले पाहिजेत; पण केंद्र सरकार वेगळेच निर्णय घेत आहे. मध्यंतरी सरकारने देशातील ज्या महत्त्वाच्या बॅंका आहेत, त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ८० हजार कोटी भरले. त्यानंतर पुन्हा १ लाख २० हजार कोटी भरले. आर्थिक परिस्थिती असलेल्यांकडून कर्जे बुडवली गेली. त्यांची भरपाई शासनाने केली, हे चुकीचे आहे.’’

या वेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘(कै.) मंडलिक परखड होते. त्यामुळेच त्यांची पावलोपावली आठवण येते. ते नसल्याची हुरहूर वाटते. एकदा ते भांडायचे; पण पुन्हा एक व्हायचे. कागल तालुक्‍यात मला पाय ठेवू देणार नसल्याची धमकी त्यांनी दिली होती. नंतर श्री. मुश्रीफ यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला. त्यात मी त्यांच्यावर टीका करायची नाही आणि त्यांनी आमच्या चळवळीवर काय बोलायचे नाही, असे ठरले. त्यांचा दराराच असा होता, की त्यांच्यासमोर बसायची भीती वाटायची. आपल्यात व त्यांच्यात संघर्षातून एक वेगळे नाते निर्माण झाले होते.’’

ह्यो सुकाळीचा काय सांगतो! 
माझा एक काळ असा होता, की मी काही भूमिका घेतली, आमच्या दौऱ्याचा कार्यक्रम आखला तर त्याची सुरुवात बिंदू चौकातून करत असे. कारण बिंदू चौक असा आहे, की आपले धोरण चांगले असेल तर बिंदू चौकात पाठिंबा मिळतो आणि चुकीचे असेल तर लोक हळूच सांगतील ‘ह्यो सुकाळीचा काय सांगतो’, असे श्री. पवार म्हणताच एकच हशा पिकला. अनेक कार्यक्रम घेताना त्याची सुरुवात मी बिंदू चौकातून करत होतो. बिंदू चौकात एखाद्या विचाराचे स्वागत झाले तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत तो विचार पोचतो आणि स्वीकारलाही जातो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. 

शेट्टींचे आमच्यावरही प्रेम
गेल्या काही महिन्यांपासून खासदार राजू शेट्टी व श्री. पवार यांचेही चांगले सूर जमले आहेत. त्याची प्रचिती या कार्यक्रमातही आली. जिल्ह्यात उसाचा प्रश्‍न आहे. त्यावरच आजपर्यंतचे राजू शेट्टींचे समाजकारण, राजकारण अवलंबून आहे. त्यातून त्यांनी आमच्यावरही प्रेम केलंय; पण सत्तेतील लोकांची धोरणे चुकली तर त्यावर हल्ला हा करावाच लागतो, त्याशिवाय बदल होत नाही, हे काम श्री. शेट्टी यांनी केले, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले. 

शेतकरी कर्ज थकवणारा नाही
एकीकडे बड्या उद्योजकांनी बॅंकांचे पैसे बुडवले; पण शेतकरी कधीही कर्ज बुडवत नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. नैसर्गिक आपत्ती, काही कारणाने पीक वाया गेले तरच शेतकरी कर्ज थकवतो, शेतकऱ्यांची जात कर्ज थकवणारी नाही. आपण मेल्यानंतर नैवेद्याला कावळा शिवला नाही तर पुढच्या पिढीला यातना होतील. आम्हाला कोणाचे पैसे थकवायचे नाहीत, ही शेतकऱ्यांची भूमिका असल्याचे एका महिलेने मला सांगितले. त्यामुळे शेतकऱ्याला स्थैर्य देण्याची गरज आहे, असे श्री. पवार यावेळी म्हणाले. 

बस माझ्या छाताडावर
(कै.) मंडलिक यांच्या संतापाबाबत एक आठवण सांगताना श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘शासकीय विश्रामगृहावर दराची बैठक होती. त्यात लवकर निर्णय होत नव्हता. निर्णयाला जसा वेळ लागू लागला तसे मंडलिक चिडू लागले. त्यांची साखर वाढत गेली तसा त्यांचा पारा वाढत गेला व तू स्वतःला काय समजतोस. पैसे नाही दिले तर छाताडावर बसणार आहेस. ये बस माझ्या छाताडावर, असे ते म्हणाले.’’ 

...तर प्रश्‍न मिटला असता
या वेळी ऊस दराचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. साखरेचे दर उतरल्याने ठरलेल्या दरात कारखानदारांनी कपात केली आहे. पूर्वी एकदा मंडलिकांनी घरी बोलावून काय द्यायचे ते सांग. मी देऊन टाकतो, कोणाचे देणे-घेणे नाही, असे सांगितले होते. पण आज निर्माण झालेल्या दराच्या प्रश्‍नात त्यांनी वडिलकीच्या नात्याने भाग घेऊन तो मिटवला असता, असे श्री. शेट्टी यावेळी म्हणाले. 

सर्वपक्षीयांची मांदियाळी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी व्यासपीठावर दिसली. खासदार धनंजय महाडिक व महाडिक कुटुंबीय वगळता जिल्ह्यातील सर्व पक्षांचे आमदार व नेते उपस्थित होते. त्यात बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर स्वाती यवलुजे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, श्रीमती निवेदिता माने, व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, ॲड. सुरेश कुराडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार दिनकरराव जाधव, के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, ॲड. श्रीपतराव शिंदे, प्रकाश आवाडे, वैभव नायकवडी, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Sharad Pawar comment