कर्तृत्वाचा मक्ता पुरूषांबरोबर महिलांचाही - शरद पवार

संभाजी गंडमाळे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - आई शारदाबाई पवार यांनी आयुष्यभर पुरोगामी विचार जपला. कर्तृत्वाचा मक्ता हा पुरूषांबरोबर महिलांचाही असतो, ही शिकवण घालून दिली आणि म्हणूनच राजकारणातही महिलांना राजकारणात आरक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. येत्या काळातही सारे मिळून हाच विचार जपणारी नवी पिढी निर्माण केली पाहिजे, असे स्पष्ट मत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज गोलिवडे (ता. पन्हाळा) येथे व्यक्त केले.

कोल्हापूर - आई शारदाबाई पवार यांनी आयुष्यभर पुरोगामी विचार जपला. कर्तृत्वाचा मक्ता हा पुरूषांबरोबर महिलांचाही असतो, ही शिकवण घालून दिली आणि म्हणूनच राजकारणातही महिलांना राजकारणात आरक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. येत्या काळातही सारे मिळून हाच विचार जपणारी नवी पिढी निर्माण केली पाहिजे, असे स्पष्ट मत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज गोलिवडे (ता. पन्हाळा) येथे व्यक्त केले.

(व्हिडिआे - सचिन सावंत)

दरम्यान, गोलिवडे हे श्री. पवार यांचं मामाचं गाव. साहजिकच या निमित्ताने त्यांनी विविध आठवणींना उजाळा दिला. ग्रामस्थांतर्फे त्यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो चांदीची मूर्ती देवून गौरव झाला. सत्कारानंतर बोलताना मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्‍किल टिपणीही श्री. पवार यांनी केली. ते कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी गोलिवडे गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधला. 

एकूण अठरा मिनिटांच्या भाषणात श्री. पवार यांनी कोल्हापूर आणि एकूणच राजकीय, सामाजिक अशा विविध मुद्यांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, ""राजर्षी शाहूंच्या शिकवणीतून प्रतिकुल परिस्थितीवर कशी मात करायची, याची प्रेरणाही मिळते. कोल्हापूरचा हाच संस्कार आईवर होता आणि म्हणूनच तिने पुढची पिढी शिकली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात जावू तेथे नावलौकिक झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. भोसले कुटुंबातील पुढची पिढी शिकून अमेरिकेत स्थायिक झाली. आईने आम्हा भांवडांना शिकवलं. परदेशात शिकण्याची माझ्या भावांना संधी मिळाली आणि म्हणूनच विविध क्षेत्रात सारी भावंडं यशस्वी झाली. कदाचित एकच कुटुंब असे असेल की त्या कुटुंबातील तीन भावांना राष्ट्रीय पातळीवरचे सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, (कै) दिनकरराव पवार यांना भारत सरकारने पद्मश्री तर मला पद्मविभूषण देवून गौरविले. आपल्या तीन मुलांना असे सर्वोच्च सन्मान मिळतात, हे पहायला आई असती तर तिला नक्कीच समाधान वाटले असते.'' 

इच्छा पूर्ण झाली... 
श्री. पवार यांच्या स्वागतासाठी कोतोली फाट्यापासून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. गावात तर गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा झाला. 
गावात सकाळपासूनच पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. गावातील महिलांनी हिरव्या साड्या परिधान केल्या होत्या तर पुरूषांनी कोल्हापुरी फेटे परिधान केले होते. तरूणांनी झांजपथकाच्या निनादात त्यांचे स्वागत केले. श्री. पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्म या गावातील भोसले कुटुंबामध्ये झाला. भोसले कुटुंबीय काही वर्षांनी कोल्हापूरला वास्तव्यास गेले; परंतु ही आठवण पवार यांना माहिती असल्याने त्यांनी एका जाहिर कार्यक्रमात या गावाला एकदा भेट देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या दौऱ्यात त्यांनी ही भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी मामाच्या गावाला भेट देण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे आवर्जुन सांगितले. 

संघर्षाची सुरवात कोल्हापुरातून 
आजवर ज्या काही सामाजिक, राजकीय मोहिमा केल्या आणि त्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याची सुरवात कोल्हापुरातून केली आणि यशाला गवसणी घातली. अंबाबाई, जोतिबाचा आशिर्वाद आणि कोल्हापूरच्या जनतेच्या सदिच्छा पाठिशी असल्या की अपयश येत नाही, हा अनुभव असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News Sharad Pawar in Mamas Village