शरद पवार-शेट्टींमध्ये ‘साखरपेरणी’?

गणेश शिंदे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

जयसिंगपूर -  राजकारणात विळ्याभोपळ्याचे नाते असणाऱ्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील गोडव्याच्या पर्वाला आता सुरवात झाली आहे. जवाहर साखर कारखान्याचा गाळप हंगाम प्रारंभ पवार-शेट्टी यांच्यात साखरपेरणी करणारा ठरू शकतो. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशीच नीती आज भाजपबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बनली आहे. यातून लोकसभा निवडणुकीत हे तिघे एकत्र येण्याचे संकेतही मिळू लागले असून, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी हा दुग्धशर्करा योग जुळवून आणल्याचे सांगून संभाव्य युतीच्या चर्चेला बळ मिळू लागले आहे. 

जयसिंगपूर -  राजकारणात विळ्याभोपळ्याचे नाते असणाऱ्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील गोडव्याच्या पर्वाला आता सुरवात झाली आहे. जवाहर साखर कारखान्याचा गाळप हंगाम प्रारंभ पवार-शेट्टी यांच्यात साखरपेरणी करणारा ठरू शकतो. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशीच नीती आज भाजपबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बनली आहे. यातून लोकसभा निवडणुकीत हे तिघे एकत्र येण्याचे संकेतही मिळू लागले असून, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी हा दुग्धशर्करा योग जुळवून आणल्याचे सांगून संभाव्य युतीच्या चर्चेला बळ मिळू लागले आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळत नसल्याचे खापर भाजपवर फोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्तेतून काडीमोड घेतली. तीन वर्षं सत्तेत राहूनही शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवू शकत नसल्याचे शल्य खासदार शेट्टींना होते. 

यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असला तरी नोटबंदी, जीएसटीसह अन्य काही निर्णयांमुळे समाजातील सर्वच घटकांकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. याचे भविष्यातील राजकीय सारीपाटावरील परिणामांचा अभ्यास करूनच शेट्टी यांनी मोदींना टार्गेट करून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरवात केली आहे. 

शेट्टी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात मोदींचे शेतकरीविरोधी धोरण बिंबविण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल त्यांचा सॉफ्टकॉर्नर स्पष्टपणे दिसू लागला आहे. मोदींपेक्षा पवारांनाच शेतीतील जास्त अभ्यास असल्याचे जाहीरपणे शेट्टींनी सांगितल्यामुळे राजकारणाचे वारे बदलू लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

ऊस दराच्या चळवळीतून शेट्टींचे राजकारणात पदार्पण झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील बहुतांश साखर कारखान्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने गेल्या पंधरा वर्षांत स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. शरद पवार यांच्यासह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांवर निशाणा साधून खासदार शेट्टींनी चळवळीबरोबर राजकारणातही मनसुबे साध्य केले आहेत.

भाजपने तीन वर्षांत स्वाभिमानीला सत्तेत स्थान दिले असले तरी स्वाभिमानीच्या मनात स्थान निर्माण करता आले नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोंदीविरोधात एककलमी कार्यक्रम शेट्टींनी सध्या हाती घेतला आहे. तीन वर्षांत भाजपने लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांसाठी पायघड्या टाकल्याने आज भाजपची मोठी ताकद निर्माण झाली आहे. यामुळे खासदार शेट्टींची काही प्रमाणात अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत शेट्टींना कोणाशी तरी हातमिळवणी करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार-शेट्टी एकमेकांबद्दल स्तुतीसुमने उधळू लागल्याने हातकणंगले लोकसभेवर युतीचे ढग जमू लागले आहेत.

‘जवाहर’च्या हंगाम प्रारंभाचे निमित्त साधून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दोघांनाही एकाच व्यासपीठावर आणण्याचे निश्‍चित केल्यामुळे यामागे काय शिजतंय हे राजकीय जाणकारांना वेगळे काय सांगण्याची गरज नाही. एकूणच, पवार-शेट्टी यांच्या २ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. 

भाजपला थोपविण्याची रणनीती
स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस-राष्ट्रवादी हे पारंपरिक विरोधक आहेत, मात्र तीन वर्षांत सत्तेत असणाऱ्या भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसह मंत्री सदाभाऊंच्या रूपाने स्वाभिमानीतही फूट पाडण्याचे काम केले आहे. याच द्वेषातून विरोधक एकवटले आहेत. हातकणंगले लोकसभा निवडणुकीवेळी या युतीला मूर्त रूप येण्याची शक्‍यता आहे. काही करून भाजपला रोखण्याच्या रणनीतीतून स्वाभिमानी, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची शक्‍यता आहे.

Web Title: Kolhapur News Sharad Pawar Shetty Alliance ?