सहकार सोहळ्यात राजकीय धुळवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी हंगाम शुभारंभ आणि त्याच कार्यक्रमात सहकारातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सत्कार, असा सहकार सोहळा होण्याऐवजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राजकीय धुळवडच पाहायला मिळाली. 

कोल्हापूर - हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी हंगाम शुभारंभ आणि त्याच कार्यक्रमात सहकारातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा सत्कार, असा सहकार सोहळा होण्याऐवजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राजकीय धुळवडच पाहायला मिळाली. 

‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे श्री. पवार यांच्या टीकेचे नेहमीचे लक्ष्य; पण ते बाजूलाच राहिले, त्यांच्याकडून कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला गेला. माजी राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसकडून झालेला अन्याय, दुर्लक्ष याचा पाढा वाचताना श्री. पवार यांचे पाठबळ आपल्यामागे असल्याचे मान्य केले. श्री. आवाडे यांनी श्री. शेट्टी व आपण एकत्र राजकारण करण्याचे दिलेले संकेत हे श्री. पवार यांना पटले नसतील; पण त्याला त्यांचा विरोधही असणार नसल्याचे स्पष्ट झाले. 
श्री. आवाडे यांची काँग्रेसची बैठक पक्की आहे, वेळोवेळी त्यांनी ती दाखवून दिली आहे. १९७८-८० च्या सुमारास श्री. पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर झालेल्या निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे त्यांच्या समांतर काँग्रेसचे उमेदवार होते; पण त्यानंतर काँग्रेस एके काँग्रेस असाच त्यांचा प्रवास राहिला.

श्री. पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर आवाडे कुटुंबीयही त्यांच्यासोबत जाईल, अशी अटकळ होती, तरी श्री. आवाडे काँग्रेसमध्ये राहिले. या वेळी कै. बाळासाहेब माने कुटुंबीयांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. 
श्री. आवाडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही; पण श्री. पवार यांच्याशी असलेला ऋणानुबंध संवादही कायम ठेवला. त्यातून २०१४ ची लोकसभा डोळ्यांपुढे ठेवून श्री. पवार यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष केले. त्याही पुढे जाऊन लोकसभा निवडणुकीत श्री. आवाडे यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना पक्षाची उमेदवारी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तरीही श्री. आवाडे काँग्रेस सोडण्यास तयार झाले नाहीत. दुसरीकडे श्री. शेट्टी यांना रोखायचे म्हणून राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली ही जागा काँग्रेसला सोडून श्री. आवाडे यांनाच उमेदवारी देण्यास श्री. पवार यांनी भाग पाडले. मोदींची लाट, सरकारविरोधातील नाराजी व भाजपच्या मदतीमुळे श्री. शेट्टी विजयी झाले.

काँग्रेससाठी सर्व काही करूनही पक्षाच्या पातळीवर मात्र आवाडेंना डावलण्यात आले. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पी. एन. यांच्यानंतर ज्येष्ठता व योग्यतेच्या पातळीवर कल्लाप्पाण्णा आवाडे हे एकच नाव समोर होते; पण त्यांना विरोध झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांच्या लोकांना काँग्रेसची उमेदवारी डावलण्यात आली. त्याही परिस्थितीत श्री. आवाडे यांनी दुसऱ्या पक्षाचा विचार न करता आघाडी करून निवडणूक लढवली. 

या कार्यक्रमात प्रकाश आवाडे यांनी आपण व शेट्टी यापुढे एकत्र राहाणार, असे सांगून या दोघांची अंतर्गत ‘गट्टी’ आहे अशी जी चर्चा पूर्वीपासून होती त्यावर शिक्कामोर्तबच केले. श्री. आवाडे मध्यंतरी भाजपच्या वाटेवर होते; पण त्यांना श्री. शेट्टी यांनीच रोखले. त्यांचा अनुभव वाईट असल्याचे सांगत गडबड करू नका, ताकद जिवंत ठेवा, असा सल्लाही शेट्टींनी दिला. पक्षात गेला तर त्यांची बंधने येतील, त्यांच्यात सुसंगत असे निर्णय घ्यावे लागतील, असे सांगितल्यानेच श्री. आवाडे यांनी खुल्लमखुल्ला राजकरण करणार, असे सांगून टाकले आहे. 

‘एफआरपी’वर शेतकरी समाधान मानणार नाहीत’ या आवाडे यांच्या वक्तव्याने कार्यक्रमाला उपस्थित कारखानदार जरूर आवाक्‌ झाले; पण गेली पंधरा वर्षे शेट्टींचा पवित्रा पाहता ते नुसती एफआरपी घेत नाहीत हे वास्तव आहे. एकदा ठरले की मात्र सर्वच कारखाने त्याप्रमाणे दर देतात. यातून शेतकऱ्याला देता येते; पण कारखानदारांची तयारी नसते हा संदेश जातो. दुसरीकडे कारखानदारांतही एकी नाही, काहींचे कारखाने सुरू तर काहींचे आंदोलनामुळे बंद असतात. शेट्टींना रोखायचेच तर कारखानदारांची एकी हवी ती दिसली नाही. आवाडेंचा कारखाना शेट्टींच्या प्रभाव क्षेत्रात आहे, त्यांना या आंदोलनाची मोठी झळ बसते, त्यातून त्यांनी कोंडी फोडायची या उद्देशानेच त्यांनी हे वक्तव्य केले.

पवार यांचे वक्तव्य बुचकळ्यात टाकणारे
शेट्टींसोबत जाण्याचा निर्णय आवाडे यांनी घेऊन पवार यांना नाराज केले असले तरी या कार्यक्रमाला शेट्टीही निमंत्रित होते. त्यांना निमंत्रण देताना श्री. पवार यांची परवानगी घेतली नाही, असे होणार नाही. अलीकडे श्री. पवार यांच्याकडून श्री. शेट्टी यांच्यावर स्तुतिसुमने, त्याच वेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर होणारी टीका हे सर्व काही सांगून जाते. ‘आमच्या सदा खोतांचं काय होणार?’ असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. पवार यांनी सगळ्यांना बुचकळ्यात टाकले असले तरी ही त्यांच्यावर उपाहासात्मक टीकाच होती हे नक्की.

Web Title: Kolhapur News Sharad Pawar Tour