शेअर्समध्ये गुंतवणूक करताय सावधान ! 

लुमाकांत नलवडे
सोमवार, 17 जुलै 2017

कोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये येथील डॉक्‍टरांच्या झालेल्या फसवणुकीमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शेअर मार्केट चर्चेत आले आहे. देशभरात सुमारे 1400 गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या पद्धतीने फसवले असल्याची माहिती सेबीच्या लवादाकडून उपलब्ध झाली आहे. यातील बहुतांशी व्यक्तींची, व्यावसायिकांची फसवणूक थेट "डी मॅट' अकाउंट उघडतानाच झाली असल्याचे दिसून येते. तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा केली असाल तर ती अधिक सजगपणे करायला हवी ! 

कोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये येथील डॉक्‍टरांच्या झालेल्या फसवणुकीमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शेअर मार्केट चर्चेत आले आहे. देशभरात सुमारे 1400 गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या पद्धतीने फसवले असल्याची माहिती सेबीच्या लवादाकडून उपलब्ध झाली आहे. यातील बहुतांशी व्यक्तींची, व्यावसायिकांची फसवणूक थेट "डी मॅट' अकाउंट उघडतानाच झाली असल्याचे दिसून येते. तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा केली असाल तर ती अधिक सजगपणे करायला हवी ! 

एखाद्या व्यक्तीकडे बचतीसाठी पैसे उपलब्ध झाल्यास तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. तेथून त्याला गुणाकाराच्या पटीत नफा मिळेल, अशी आशा असते. जे अभ्यासपूर्वक गुंतवणूक करतात त्यांना हे शक्‍य होते. मात्र यासाठी एजंट (ब्रोकर) ही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र डॉक्‍टरांची फसवणूक करणारा ब्रोकर सुद्धा त्यांच्या विश्‍वासातीलच होता. त्यामुळे केवळ विश्‍वास ठेवून चालणार नाही, तर त्यासाठी स्वतः काही महत्त्वाच्या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

फसवणूक कोठे होते? 
केवळ विश्‍वासाने सर्व व्यवहार एजंट (ब्रोकर)च्या हाती देणे 
कंपन्यांकडून येणारे एसएमएस, ईमेल्स वेळोवेळी न पाहणे 
एजंटाने दिलेला जमा-खर्चाचा अहवाल तपासून न पाहणे 
गुंतवणूकदाराला न विचारता एजंटाला गुंतवणुकीची मुभा देणे 

कोल्हापूरमध्ये आर्थिक सुबत्ता असल्यामुळे शेअर्समधील गुंतवणूक वाढली आहे. यातून ग्रामीण आणि शहरी भागातील गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. गेल्या दोन वर्षात पाच गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी असोसिएशनकडे आल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्यास केवळ असोसिएशनच्या एका पत्रावर रोखे आणि विनिमय मंडळा (सेबी) कडून त्याची चौकशी होते. तरीही गुंतवणूकदारांनी "डी मॅट' अकाउंट उघडतानाच दक्षात घेतली तर अनेकांची फसवणूक टळू शकते. 
- मनीष झंवर, अध्यक्ष-कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशन. 

गुंतवणूकदाराने डी मॅट अकाउंट उघडताना त्याचे फायदे-तोटे यांचा विचार केला पाहिजे. त्यामध्ये कोणत्या ठिकाणी सह्या करून आपले अधिकार दुसऱ्याला वापरण्यास द्यायचे, याची माहिती घेतली पाहिजे. विशेष करून ब्रोकरकडे डी मॅट अकाउंट उघडण्यापेक्षा स्वतः बॅंकेत जावून अकाउंट उघडणे केंव्हाही सोयीस्कर असते. त्याचे फायदे गुंतवणूकदारांनाच होतात.2015-16 मध्ये सुमारे 1400 तक्रारी दाखल झाल्या, त्यापैकी अनेक तक्रारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील होत्या. 
- नरेंद्र मेहता - सीए- लवाद -समन्वयक (मुंबई). 

फसवणूक टाळण्यासाठी 
- शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी "डी मॅट' खाते शक्‍यतो बॅंकेतच उघडा. 
- अर्जांवर साधारण 44-48 सह्या घेतल्या जातात. त्यापैकी केवळ 30-32 गरजेच्या असतात. 
- उर्वरित अधिक सह्या घेऊन वटमुखत्यार लिहून घेतल्याची उदाहरणे आहेत. 
- इमेल-एसएमएस, पासवर्डचे अधिकार एजंटाला देऊ नका 
- डी मॅट अकाउंट उघडण्याचा फॉर्म शक्‍यतो प्रांतिक भाषेत मागा. 
- केवळ एसएमएस-इमेलचे अकाउंटवर विश्‍वास ठेवू नका 
- चर्चा केल्याशिवाय गुंतवणूक व फेरफार करण्याचे अधिकारी एजंटाला देऊू नका 

गुंतवणूक संरक्षण निधी 
शेअर्स मार्केटमध्ये होणाऱ्या व्यवहारातून गुंतवणूक संरक्षण निधी उभारला जातो. कायदेशीर व्यवहारातून गुंतवणूकदाराचे नुकसान झाले असल्यास या निधीतून त्याला भरपाई दिली जाते. या बरोबर नुकसानीस जबाबदार ब्रोकरचा परवाना निलंबित करून त्याला जबर दंड केला जातो. याचबरोबर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाते. 

Web Title: kolhapur news shares investment