पहाडात छत्रपती शिवरायांचा जयजयकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

रायगड - दुर्गराज रायगडावर शिवभक्तांनी हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, या जयघोषात गड दुमदुमत आहे. आज (ता. ५) रायगड विकास प्राधिकरणतर्फे आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त रायगडची स्वच्छता मोहीम होणार आहे.

रायगड - दुर्गराज रायगडावर शिवभक्तांनी हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, या जयघोषात गड दुमदुमत आहे. आज (ता. ५) रायगड विकास प्राधिकरणतर्फे आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त रायगडची स्वच्छता मोहीम होणार आहे. प्राधिकरणचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून मोहिमेचे आयोजन केले आहे. 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्यकर्ते रायगडावर दाखल झाले आहेत. अन्नछत्र समितीतर्फे गडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. नियंत्रण, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक कक्षाची उभारणी केली असून, राजदरबारात मंडप उभारला आहे. 

दरम्यान, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी पाचाड येथे शिवभक्त व स्वयंसेवकांना स्वच्छता मोहिमेबाबत आज सायंकाळी मार्गदर्शन केले. स्वच्छतेसाठी गडावरील ३७ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्याची माहिती भारतीय पुरातत्त्व खात्याचे माजी संचालक डॉ. ए. के. सिन्हा, प्रा. ए. आर. रामनाथन, डॉ. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके, प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर, शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, उदय गायकवाड यांनी दिली. मोहिमेत हजारो स्वयंसेवक स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. सकाळी सात ते बारा या वेळेत स्वच्छता मोहीम होणार आहे.

शिवभक्त रायगडला रवाना 
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शहरातून दरवर्षी हजारो तरुण रायगडावर जातात. यंदाही तरुणांनी ही परंपरा कायम राखली. सोमवारी मध्यरात्री दसरा चौकातून सुमारे सात बस रायगडाकडे रवाना झाल्या. यामधून सुमारे पाचशे तरुण शिवराज्याभिषेक दिनासाठी गेले. गेल्या दोन दिवसांपासून तरुणांचे जथ्थे रायगडच्या वाटेने जात आहेत.

पाचाडला पथनाट्य 
पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यात स्वप्नील यादव दिग्दर्शित रायगड स्वच्छतेबाबत पथनाट्य सादर झाले. या नाटकाने स्वच्छतेवर नेमकेपणाने बोट ठेवले. उपस्थितांनी त्यास दाद दिली.

स्वयंसेवक रवाना
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ३८० स्वयंसेवक, १० कार्यक्रम अधिकारी, ७ कर्मचारी मोहिमेत सहभागी होत आहेत. ते आज पाचाड येथे दाखल झाले.

Web Title: Kolhapur News Shiv Rajyabhishekha on Raigad