शिवछत्रपती पुरस्कार विजेतीवर शिवणकामाची वेळ

शिवाजी यादव
शुक्रवार, 23 मार्च 2018

शिवछत्रपती पुरस्कार शासनाकडून मिळाला, लाखमोलाचा आनंद झाला. पुरस्काराने मन भरले, पण नोकरीचा प्रश्‍न कायम असल्याने आपण शिवणकाम आनंदाने करते. त्यावर उदरनिर्वाह चालवते,

- नलिनी चंद्रकांत डवर

कोल्हापूर - शिवछत्रपती पुरस्कार शासनाकडून मिळाला, लाखमोलाचा आनंद झाला. पुरस्काराने मन भरले, पण नोकरीचा प्रश्‍न कायम असल्याने आपण शिवणकाम आनंदाने करते. त्यावर उदरनिर्वाह चालवते, पण आपल्याला थांबायचे नाही, ॲथलेटिक्‍समध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तुंग यश मिळवायचे आहे. त्यासाठी आपण एकटीच सराव करते, पण एकलव्यासारखी... चांगला प्रशिक्षक हवा आहे. जेणेकरून आपल्याला खेळातील नैपुण्य आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करता येईल... देशाचा लौकिक वाढविताना दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणादायी असे काही करता येईल, त्यासाठी आपण जिद्दीने सराव करतेय. बस... हे मनोगत आहे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी चंद्रकांत डवर यांचे...

नलिनी सांगतात की, सात महिन्यांची असताना ताप आला. वडिलांनी तातडीने दवाखान्यात नेले. उपचार झाले. संपूर्ण जीवावरील संकट टळले. पण पायाला अधू करून गेलं. अर्धा अधिक पाय काहीसा लुळा झाला. या अंपगत्वाशी आयुष्यभर दोस्ती निभावावी लागणार, याची साक्ष माझ्या बालमनाने स्वीकारली.

पणोरे विद्यामंदिर (ता. राधानगरी) या माझ्या गावात प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. पुढे कोल्हापुरात महावीर महाविद्यालयात शिक्षणासाठी आले. तेव्हा पॅरािलंपिक असोसिएशन कोल्हापूर या संस्थेच्या संपर्कात आले. शाळकरी वयातील खेळांच्या आवडीला क्रीडा प्रशिक्षणाचे इथे बळ लाभले. 
जिल्हास्तरावर दिव्यांग स्पर्धेत गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी अशा मैदांनी खेळात यश मिळाले. माझी वाटचाल राज्यपातळीवर स्पर्धेकडे सुरू झाली.

जिद्दीच्या सरावातून बंगळूर, हंपी, हरियाना, चंदीगड, गझीयाबाद, नागपूर अशा अनेक शहरांतील दिव्यागांसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. मैदानावर धावत जाते, भाला फेकते, तो ज्या गतीने आकाशात झेपवतो, काही क्षणात तब्बल वीस मीटरच्या पुढे जातो. काही क्षणात टाळ्यांचा गजर व्हायचा. यात विजेतेपदाचे मेडल गळ्यात मिरवताना झालेला आनंद माझ्या जगण्याला नवी उभारी देऊन गेला. आजवर तब्बल ६५ बक्षिसे मिळवली. शंभरावर स्पर्धा खेळल्या आहेत. 

या साऱ्यातून शासनाने शिवछत्रपती पुरस्कार दिला. माझ्या आनंदाने कळसाध्याय गाठला...एवढा हा पुरस्कार माझ्या जगण्याचा परमोच्च आनंद ठरला. पुरस्काराने आनंद दिला, पण आयुष्य स्थिरस्थावर होण्यासाठी नोकरी मिळाली तर माझ्या जगण्याची वाट सुखकर होईल. पण नुसते बसून काही होणार नाही म्हणून आपण सध्या शिवणकाम करते.

आंतरराष्ट्रीयस्तरावर स्पर्धेत यश मिळवणार आहे, पण आपल्याला अद्याप प्रशिक्षक (कोच) मिळालेला नाही. म्हणून पणोरे विद्या मैदानाच्या प्रांगणात एकटीच सराव करते. पुढच्या महिन्यात पंजाबमध्ये राष्ट्रीय निवड चाचणी होणार आहे, त्या स्पर्धेचा सराव सुरू आहे.

जिद्दीला यशाचे पंख फुटतील
दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध सवलती, योजना आहेत; मात्र आपल्याला त्यापैकी पुरस्कार वगळता फारसे काही मिळालेले नाही. आपण नाराज नाही, पण अपेक्षा जरूर आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासकीयस्तरावर प्रशिक्षक मिळवून दिला तर माझ्या जिद्दीला यशाचे आणखी पंख फुटणार आहेत.

Web Title: Kolhapur News Shiva Chhatrapati award winner Nalini Davar Special Story