सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या मंदिराबाबत सोमवारी बैठक

संजय पाटील
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची सुधारणा करण्याबाबत खासदार संभाजीराजे ३० आक्‍टोबरला बैठक घेणार आहेत. बैठकीनंतर संभाजीराजे किल्ल्याला भेट देणार असल्याची माहिती येथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली.

 

वारणानगर - सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची सुधारणा करण्याबाबत खासदार संभाजीराजे ३० आक्‍टोबरला बैठक घेणार आहेत. याचे निमंत्रण मला मिळाले आहे. बैठकीनंतर संभाजीराजे किल्ल्याला भेट देणार असल्याची माहिती येथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली. दरम्यान, याबाबतचे पत्र संभाजीराजे यांच्याकडून लंडनहून इमेलद्वारे आल्याचेही त्यांनी सांगितले.

किल्ल्यातील शिवरायांचे मंदिर जीर्ण झाले असून, पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे त्याची वेळेत डागडुजी झालेली नाही. याबाबत वारणानगर येथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सायबर तज्ज्ञ ॲड. पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच खासदार संभाजीराजे व उदयनराजे यांनीही लक्ष घालावे अशी मागणी श्री. पाटील यांनी केली होती.

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर लंडनमध्ये असलेले खासदार संभाजीराजे यांनी याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊन ॲड. पाटील यांच्याशी संपर्क साधला. मंदिराच्या दुरवस्थेबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. खासदार संभाजीराजे यांनी ‘सकाळ’मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिराकडे दुर्लक्ष ही बातमी वाचल्याचे पत्र इमेलद्वारे लंडनहून ॲड. पाटील यांना आज पाठवून त्यांचे  अभिनंदन केले.हा विषय लवकरच मार्गी लावला जाईल. लंडनहून परत आल्यानंतर  ३० आक्‍टोबरला कोल्हापुरात बैठक घेऊन पंधरा दिवसांत किल्ल्याला भेट देऊ, असे नमूद केले. मंदिरातील दुरवस्थेची पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचना अभियंत्याना दिली आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनीही त्यांच्या प्रतिनिधीनी मंदिराची पाहणी केल्याची माहिती पुजारी संकपाळ यांनी ॲड.पाटील यांना दिली. ॲड. पाटील यांनी ‘सकाळ’चे आभार मानले. 

 

Web Title: kolhapur News Shivaji Mandir on Sidhudurg fort Renovation