शिवाजी स्टेडियमच्या ‘खेळपट्टी’ला बॅरिकेड्‌स

संदीप खांडेकर
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  छत्रपती शिवाजी स्टेडियममधील नामशेष झालेल्या खेळपट्टीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. क्रिकेट स्पर्धेखेरीज खेळपट्टीवर अन्य वेळी कोणी खेळू नये, यासाठी बॅरिकेड्‌स लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे खेळपट्टीकडे लक्ष गेले आहे. आठ दिवसांत कामास सुरवात होईल. 

कोल्हापूर -  छत्रपती शिवाजी स्टेडियममधील नामशेष झालेल्या खेळपट्टीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. क्रिकेट स्पर्धेखेरीज खेळपट्टीवर अन्य वेळी कोणी खेळू नये, यासाठी बॅरिकेड्‌स लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे खेळपट्टीकडे लक्ष गेले आहे. आठ दिवसांत कामास सुरवात होईल. 

जिल्हा क्रीडा संकुल समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. मात्र, आजवर स्टेडियमच्या बदलाकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. केवळ नामधारी अध्यक्ष असेच हे पद राहिले. केवळ स्टेडियमच्या विकासाच्या गप्पाच होत राहिल्या. त्याचा परिणाम असा झाला, की स्टेडियममधील खेळपट्टीच नामशेष झाली, तरीही त्याचे कोणालाच सोयरसुतक नाही. ऐन उन्हाळ्यात काही वर्षांपूर्वी हिरवाईने नटलेली खेळपट्टी गेली कोठे, असा प्रश्‍न क्रिकेटप्रेमींतून विचारला जाऊ लागला. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट दिल्यानंतर मात्र खेळपट्टी सुस्थितीत आणण्याचा विचार झाला. 

मैदानातील शंभर बाय ७० फूट परिसरात एकूण आठ खेळपट्ट्या असून, त्यातील चार मुख्य, तर अन्य सरावासाठी आहेत. त्या सर्व चांगल्या स्थितीत आणून क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध केल्या जातील. रात्रीच्या वेळी मद्यपींसह अन्य मंडळींकडून खेळपट्टीची नासधूस होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.  त्यासाठी चार बाय सहा फूट अशा ५८ चाकांच्या बॅरिकेड्‌सचा खेळपट्टीभोवती वेढा असणार आहे. 

खेळपट्टीचे आंतरराष्ट्रीय सामने
मैदानावरील खेळपट्टी तयार करण्याचे काम ताज नांद्रेकर यांनी १९८३ मध्ये केले. या खेळपट्टीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी कौतुक केले. या मैदानावर चंदू बोर्डे बेनिफिट क्रिकेट भारत पश्‍चिम विभाग विरुद्ध वेस्ट इंडिज (१९८३), भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी सामना (१९८३), भारत युवक संघ विरुद्ध श्रीलंका (१९८७), विल्स करंडक (१९९०), महाराष्ट्र विरुद्ध बडोदा (१९९१), रमाकांत आचरेकर (१९९२), आचार्य जियालाल संगीत निकेतन क्रिकेट (१९९३), महाराष्ट्र विरुद्ध गुजरात रणजी सामने झाले. मात्र, मैदानावरील खेळपट्टीच्या संरक्षणासाठी गांभीर्याने कोणतेच पाऊल उचलण्यात आले नव्हते.

‘‘येत्या आठ दिवसांत खेळपट्टीच्या कामास सुरवात होईल. त्यासाठी कोटेशन मागविले आहे. खेळपट्टीभोवती लॉक असलेले बॅरिकेड्‌स लावून ती संरक्षित केली जाईल.’’ 
- माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी.

 

Web Title: Kolhapur news Shivaji Stadium renovation of playground