जहॉं युवराज खडा, लाइन वहीं से शुरू होती है 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

उंचीचा अभिमान 
विद्यापीठातील विविध कार्यक्रमांवेळी कुलगुरूंसमवेत जेव्हा तो असतो, तेव्हा "जहॉं युवराज खडा होता है वहॉं सर उठाना पडता है,' याचा अनुभव अनेकांना येतो. तो म्हणतो, ""माझे आजोबा ज्ञानदेव यांची उंची सहा फूट होती. माझे चुलते एकनाथ हेही सहा फूट आहेत. माझी उंची साडेसहा फूट इतकी आहे. या उंचीचा मला अभिमान आहे.''

कोल्हापूर - "जहॉं हम खडे होते हैं लाईन वहीं से शुरू होती है,' अमिताभ बच्चन यांचा "कालिया' चित्रपटातील हा फेमस डायलॉग. यांसारख्या अनेक डायलॉग्जमुळे आजही हा अभिनेता लोकांच्या काळजात घर करून आहे. अभिनय, आवाज आणि स्वत:च्या उंचीने देशवासीयांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा अभिनेता. त्यांच्या उंचीचा प्रभाव लोकांवर इतका आहे, की एखादा उंच माणूस दिसला, तर साहजिकच त्याला "बच्चन' म्हणण्याचा प्रघातच पडला आहे. हे सांगण्याचे कारण तब्बल साडेसहा फूट उंचीचा एक "बच्चन' शिवाजी विद्यापीठात वावरत आहे आणि विद्यापीठ वर्तुळात तो याच नावाने ओळखला जात आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कक्षाबाहेर सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करतो. त्याचे नाव युवराज कृष्णात साठे. 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची उंची साधारणपणे सव्वासहा फूट. ज्या वेळी त्यांनी कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांच्या उंचीची विद्यापीठात चर्चा झाली. मात्र, जेव्हा डॉ. शिंदे यांची वनस्पतिशास्त्र विभागातील एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली. तेव्हा त्यांनाही त्याच्या उंचीचे आश्‍चर्य वाटले. इमारतीच्या परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या युवराजला त्यांनी आपल्या कक्षाबाहेर "ड्यूटी' करण्याचा आदेश दिला. तो कुलगुरूंना भेटण्यासाठी येणाऱ्यांचे कक्षाबाहेर स्वागत करतो. त्याची उंची पाहून येणारे सर्वच अवाक्‌ होतात. 

युवराज हा मूळचा कुर्डू (ता. करवीर) इथला आहे. त्याचे विद्यामंदिर, कुर्डू येथे पहिली ते सातवी, तर जय हनुमान हायस्कूूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो विद्यापीठात 2013 पासून रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करतो आहे. अकरा महिन्यांचा करार संपल्यानंतर सहा महिने ब्रेक घेऊन तो पुन्हा विद्यापीठाच्या सेवेत हजर होतो. 

त्याची आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. त्याने आर्मीमध्ये भरतीसाठी प्रयत्नही केला होता. लेखी परीक्षेत त्याला आवश्‍यक गुण मिळाले नाहीत. मात्र, निराश न होता त्याने विद्यापीठात काम स्वीकारले. 

Web Title: kolhapur news shivaji university