शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा १९ ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त सोहळा सोमवारी (ता. १९) विक्रम साराभाई डिस्टिंग्विश्‍ड, इस्रोचे प्रोफेसर ए. एस. किरणकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यंदाचे राष्ट्रपती सुवर्णपदकासाठी कोल्हापुरातील प्रियंका राजाराम पाटील; तर कुलपतीपदकासाठी सातारा येथील दीक्षा विजय मोरे यांची निवड केली.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त सोहळा सोमवारी (ता. १९) विक्रम साराभाई डिस्टिंग्विश्‍ड, इस्रोचे प्रोफेसर ए. एस. किरणकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यंदाचे राष्ट्रपती सुवर्णपदकासाठी कोल्हापुरातील प्रियंका राजाराम पाटील; तर कुलपतीपदकासाठी सातारा येथील दीक्षा विजय मोरे यांची निवड केली.

लोककला केंद्रात सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात २४ हजार २४५ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.

दीक्षान्त सोहळ्यानिमित्त १९ व २० ला ग्रंथमहोत्सवासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमास इस्रो इंडियन स्पेस रीसर्चचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांची उपस्थिती राहणार आहे. ते भारतीय अवकाश शास्त्रज्ञ (इंडियन स्पेस सायंटिस्ट) म्हणून सुपरिचित आहेत. ‘चंद्रयान, मंगळयान’ याचबरोबर परदेशांत अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक साधनांचा विकास केला. २०१४ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. संशोधनपर लेख प्रसिद्ध करून त्यांनी या क्षेत्रासाठी ज्ञाननिर्मिती केली आहे. विविध विषयांत संशोधन केलेल्या २७९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रांत पारितोषिक प्राप्त केलेल्या १०७ विद्यार्थ्यांना १७० पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी पाचनंतर सांकृतिक कार्यक्रम लोककला केंद्रात होणार आहे. यात मुंबई व कोल्हापुरातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थी, पालकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाही केल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव बी. डी. नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. नमिता खोत, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते. 

ग्रंथ महोत्सव
ग्रंथ महोत्सवास सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे. नामवंत भारतीय, परदेशी कंपनीचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजिटल ग्रंथांच्या ५० स्टॉलचा यात समावेश आहे. हे स्टॉल १९ व २० मार्च या दोन्ही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले असतील.

ग्रंथ दिंडी 
सोमवारी (ता. १९) सकाळी कमला कॉलेज येथून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडी जनता बझार-राजारामपुरी मेन रोड, आईचा पुतळा मार्गे शिवाजी विद्यापीठात जाईल. 

पीएच.डी. पदवी
विविध विषयांत संशोधन केलेल्या पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या स्नातकांची संख्या २७९ आहे. त्यांपैकी ४३ एकूण स्नातक व्यासपीठावर व २३६ स्नातकांना व्यासपीठाव्यतिरिक्त पदवी बहाल करण्यात येणार आहे.

५०,४४४ पदव्या
दीक्षान्त सोहळ्यात ५० हजार ४४४ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ८२ बूथ उभे करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना लघुसंदेश पाठवून त्यांचा बूथ क्रमांक कळविण्यात येणार आहे. काही अडचण आल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पीआरएन क्रमांकाद्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.

प्रियंका पाटील यांना राष्ट्रपती सुवर्णपदक

गतवर्षीच्या शैक्षणिक क्षेत्रासह क्रीडा, बौद्धिक, कला क्षेत्र, एन.सी.सी., एन. एस.एस. यांमध्ये गुणवत्ता; तसेच व्यक्तिमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषाशुद्धता, सर्वसाधारण वर्तणूक व नेतृत्वगुण प्राप्त केलेल्या प्रियंका राजाराम पाटील यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले. मंगळवारी (ता. १९) त्यांना हे पदक इस्रो, विक्रम साराभाई डिस्टिंग्विश्‍डचे प्रोफेसर ए. एस. किरणकुमार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
करवीर तालुक्‍यातील शिरोली दुमाला येथे प्रियंका पाटील यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले. दहावीला ८२ टक्के, तर बारावीलाही ८० टक्के गुण मिळवून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. येथील महावीर महाविद्यालयात बी.ए.,बी.एड. केले. प्रथम वर्षातच एनसीसी जॉईन केली. नुकतेच त्यांना शासनाने युवा पुरस्काराने सन्मानित केले. प्रियंका पाटील या ‘सकाळ’चे उपसंपादक सुजित पाटील यांच्या पत्नी आहेत. पतीसह सासर-माहेरच्या मंडळींच्या पाठिंब्यावर मला सर्वश्रेष्ठ राष्ट्रपती पदक मिळाले. हे यश म्हणजे मी आतापर्यंत केलेल्या कष्टाचे चीजच म्हणावे लागेल. मला सहकार्य केलेल्या सर्वांची मी ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया प्रियंका पाटील यांनी व्यक्त केली.

दीक्षा मोरे यांना कुलपती पदक

एमए. संस्कृत विषयामध्ये सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजची विद्यार्थिनी दीक्षा विजय मोरे यांना कुलपती पदक जाहीर झाले. मंगळवारी (ता. १९) त्यांना हे पदक इस्रो, विक्रम साराभाई डिस्टिंग्विश्‍डचे  प्रोफेसर ए. एस. किरणकुमार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. वाई येथील शेतकरी कुटुंबातील दीक्षा मोरे यांनी आई-वडिलांच्या प्रोत्साहनावर शिक्षणास सुरुवात केली. संस्कृत विषयात एमए. पदवी घेऊन इतरांना संस्कृत शिकवावे, अशी इच्छा काकांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. काकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या बारावीनंतर विज्ञान शाखा सोडून कला शाखेकडे वळल्या. गंगापुरी (सातारा) येथून छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. कॉलेजमधील प्राध्यापक, ग्रंथालयातील पुस्तकांच्या आधारे त्यांनी अथक परिश्रमातून संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवून हे यश संपादन केले. विवाहानंतर सध्या त्या पुण्यात राहात आहेत. नेट-सेटचा अभ्यास सुरू असून, लवकरच त्यात यश मिळवून प्राध्यापक बनायचे आणि विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवून काकांची इच्छा पूर्ण करण्याचे माझे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया दीक्षा मोरे यांनी दिली.

Web Title: Kolhapur News Shivaji University convocation ceremony on 19th