शिवाजी विद्यापीठाचा संशोधन क्षेत्रात डंका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली आगेकूच कायम राखताना देशातील अकृषी राज्य विद्यापीठांत राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थान प्राप्त केले आहे. आघाडीच्या टॉप-१० संशोधन संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विद्यापीठ देशात आठवे आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली आगेकूच कायम राखताना देशातील अकृषी राज्य विद्यापीठांत राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थान प्राप्त केले आहे. आघाडीच्या टॉप-१० संशोधन संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विद्यापीठ देशात आठवे आहे.

विशेष म्हणजे विद्यापीठाने मटेरियल सायन्स, भौतिकशास्त्र, खगोल आणि अभियांत्रिकी या तीन विषयांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभाच्या पार्श्वभूमीवर, संशोधनाच्या क्षेत्रातील हे यश विद्यापीठाच्या नावलौकिकात भर टाकत आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाच्या क्षेत्रातील दर्जा व गुणवत्तेवर पुनश्‍च शिक्कामोर्तब झाले आहे. मटेरिअल सायन्स, भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या विषयांमधील संशोधनात राष्ट्रीय स्तरावर सर्वसाधारण यादीत तिसरे व अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान पटकावून या क्षेत्रातील प्रभुत्व सिद्ध केले आहे. 
- डॉ. देवानंद शिंदे,
कुलगुरू

‘करंट सायन्स’च्या २५ फेब्रुवारी २०१८ च्या अंकात रिसर्च आऊटपुट ऑफ इंडियन इन्स्टिट्युशन्स ड्युरिंग २०११-१६ क्वालिटी ॲन्ड क्वांटिटी परस्पेक्‍टिव्ह  हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये जागतिक संशोधनाचा दर्जा निश्‍चित करणाऱ्या साय-व्हॅल निर्देशांकाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला. सरासरी राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा ज्या संशोधन संस्थांचे निर्देशांक अधिक आहेत, अशा सात विद्या शाखांचा दर्जात्मक अभ्यास या लेखात करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र व खगोल, रसायनशास्त्र, बीजीएम अर्थात बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्‍स व मॉलेक्‍युलर बायोलॉजी आणि मटेरियल सायन्स यांचा समावेश होता. 

२०११  ते २०१६  या कालावधीत वर्षाला ३०० हून अधिक शोधनिबंधांचे प्रकाशन आणि देशातील आघाडीच्या संशोधन संस्थांची क्रमवारी लेखात देण्यात आली आहे. यामध्ये इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकाता ही संस्था २८९८ प्रकाशने व २६.३ पर्सेंटाईलसह प्रथम क्रमांकावर आहे. शिवाजी विद्यापीठाने १९२८ प्रकाशने व २०.४ पर्सेटाईलसह देशात आठव्या आणि अकृषी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यादीत मुंबई विद्यापीठ ३८२८ प्रकाशने व १५.६ पर्सेंटाईलसह बाराव्या स्थानी आहे.

त्याखेरीज, या संशोधन संस्थांचे फिल्ड वेट सायटेशन निर्देशांक (एफ.डब्ल्यू.सी.आय.) यावर आधारित विषयनिहाय विश्‍लेषण केले आहे. त्यामध्ये मटेरियल सायन्स, भैतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या तीन विषयांमध्ये शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर सर्वसाधारण यादीत तिसऱ्या तर अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मटेरियल सायन्समध्ये सर्वसाधारण जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगलोर प्रथम स्थानी, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकाता द्वितीय स्थानी तर शिवाजी विद्यापीठ तिसऱ्या व अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी आहे.
 

Web Title: Kolhapur News Shivaji University eight rank in research