शिवाजी विद्यापीठ जीएस निवड प्रक्रिया जल्लोषात

संदीप खांडेकर
बुधवार, 24 जानेवारी 2018

कोल्हापूर - इर्षा व चुरशीने महाविद्यालयीन व शिवाजी विद्यापीठ अधिविभाग सचिवपदाची (जीएस) निवड प्रक्रिया आज जल्लोषात झाली.

कोल्हापूर - इर्षा व चुरशीने महाविद्यालयीन व शिवाजी विद्यापीठ अधिविभाग सचिवपदाची (जीएस) निवड प्रक्रिया आज जल्लोषात झाली.

(व्हिडिआे - मोहन मिस्त्री) 

समर्थकांनी गुलालाच्या उधळणीत व हलगी, घुमकं कैताळाच्या ठेक्‍यावर महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला. विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन दुचाकीवरून शहर परिसरात फेरी काढली. महाविद्यालयांच्या परिसरातील त्या त्या तालमींचा निवड प्रक्रियेत अप्रत्यक्ष सहभाग राहिला.

गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू, डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात सचिवपदाची निवड प्रक्रिया बिनविरोध झाली, तर विवेकानंद, कमला, न्यू, राजाराम महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठात सचिवपदासाठी मतदान झाले. 

सचिवपदाच्या निवडीची उत्सुकता सर्व महाविद्यालयांत होती. सचिवपदासाठी अनेकांनी आधीच डावपेच आखले होते. निवड बिनविरोध होण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे त्या त्या महाविद्यालयाच्या परिसरातील तालमींचा निवड प्रक्रियेत अप्रत्यक्ष सहभाग राहिला.

गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात प्रतिक पांडुरंग जाधव (बी. ए. भाग-3) याची बिनविरोध सचिवपदी निवड झाली. गिरीश रवींद्र आसोदे (बी. एस्सी. भाग-3) याची विद्यापीठ प्रतिनिधी, तर मनाली मल्लप्पा पाटील (बी. कॉम. भाग-2) हिची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांनी त्यांच्या नावांची घोषणा केल्यानंतर हलगीच्या कडकडाने परिसर दणाणला. प्रा. देसाई यांच्या हस्ते प्रतिक, गिरीश व मनाली यांचा सत्कार झाला. या वेळी प्रशासनाधिकारी प्रा. डॉ. मंजिरी मोरे-देसाई, कौन्सिल मेंबर दौलत देसाई, माजी नगरसेवक अजित मोरे, प्राचार्य डॉ. ए. बी. गडकरी, प्रा. पी. के. पाटील, उपप्राचार्य एस. एस. गुरव उपस्थित होते. प्रा. एन. आर. कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, प्रा. एस. ए. मेणसे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

शहाजी छत्रपती महाविद्यालयात ओंकार सुरेश पाटील (बी. ए. भाग-2) याची सचिव, तर सारिका विठ्ठल डफडे (बी. कॉम. भाग-3) हिची विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी बिनविरोध निवड झाली. विद्यापीठ प्रतिनिधीपदासाठी अमित राजेश चव्हाण (बी. ए. भाग-3) व पूजा पंडीत खवरे यांनी अर्ज भरले होते. या दोघांत निवडणूक होऊन अमितने 13, तर पूजाने 5 मते मिळवली.

अमितच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, मानद सचिव विजय बोंद्रे, प्रभारी प्राचार्य प्रा. एकनाथ काटकर, डॉ. आर. के. शानेदिवाण, प्रा. प्रशांत पाटील, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. राहुल मांडणीकर, प्रबंधक रवींद्र भोसले, मनीष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया झाली. 

कॉमर्स कॉलेजमध्ये स्वरूप नंदकुमार तेली (बी. कॉम. भाग-2) याची बिनविरोध निवड झाली. त्याच्या नावाची घोषणा होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याच्यावर गुलालाची उधळण करत अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी त्याचा सत्कार केला. प्रा. डॉ. बी. जे. नेर्लेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व प्रा. डॉ. ए. एस. बन्ने यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. 

कमला महाविद्यालयात किशोरी पसारे (एम. ए. भाग-2) व तारा दिवेकर यांच्यात सचिवपदासाठी निवडणूक झाली. त्यात किशोरी 12 मते मिळवून विजयी झाली. ताराला नऊ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली. प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी किशोरीचा सत्कार झाला. प्रा. डॉ. एस. एम. काळे, प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. मेजर वर्षा साठे, प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, प्रा. डॉ. नीता धुमाळ यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग होता. राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाची सचिव म्हणून रूबीना बशीर मुल्ला (बी. ए. भाग-3) हिची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर तिच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. 

न्यू कॉलेजमध्ये अभिषेक दादासाहेब श्रीराम (बी. ए. भाग-3) व प्रदीप सुतार (बी. ए. भाग-2) यांच्यात सचिवपदासाठी निवडणूक झाली. अभिषेक 14 विरूद्ध 9 मतांनी विजयी झाला. त्याच्या समर्थकांनी महाविद्यालयाबाहेर जल्लोष केला. प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे यांनी सर्व विद्यार्थी मंडळास शुभेच्छा देत शैक्षणिक वर्षात सर्व उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी प्रा. डॉ. ए. एन. यादव, प्रा. अमर सासने, प्रा. व्ही. एस. पवार-पाटील, प्रा. डॉ. एम. बी. वाघमारे उपस्थित होते. प्रा. सी. व्ही. राजाज्ञा यांनी आभार मानले. 

विवेकानंद महाविद्यालयात अक्षय प्रकाश पाटील (बी. ए. भाग-3) याची सचिवपदी निवड झाली. त्याला 17 मते मिळाली. प्रतिस्पर्धी शिवानी पाटील (बी. एस्सी. भाग-3) हिला 14, कोमल पाटील हिला 2 मते मिळाली. निवडीच्या घोषणेनंतर त्याच्या समर्थकांनी आतषबाजी केली. त्याला घेऊन महाविद्यालय परिसरातून फेरफटका मारत विजयाच्या घोषणा दिल्या. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी त्याचा सत्कार केला. डॉ. डी. बी. पाटील, प्रा. किरण पाटील, डॉ. एस. जी. गावडे, डॉ. डी. सी. कांबळे, डॉ. व्ही. सी. महाजन, प्रा. डी. ए. पवार, सी. बी. दोडमणी, हितेंद्र साळुंखे, रवी चौगुले यांनी निवड प्रक्रियेसाठी सहकार्य केले. 

राजाराम महाविद्यालयात मैथिली उदय आर्वे (बी. एस्सी. भाग-3) विरूद्ध सृष्टी नलवडे (बी. ए. भाग-2) यांच्यात सचिवपदासाठी निवडणूक झाली. मैथिलीला 11, तर सृष्टीला 4 मते मिळाली. मैथिलीच्या समर्थक मित्र-मैत्रिणींनी तिच्या विजयानंतर फटाके उडविले. 

डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात मुजफ्फर बाळासाहेब बाणदार (बी. कॉम. भाग-3) सचिवपदी विराजमान झाला. संस्थेचे अध्यक्ष चारूदत्त शिंदे, प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे यांनी त्याचा सत्कार केला. 

शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाचा विद्यार्थी सुनील मलकाप्पा बिरेदार याची निवड झाली. त्याला 21 मते मिळाली. तो मूळचा चिंचवाड (ता. करवीर) येथील आहे. त्याला विभाग प्रमुख डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

गोखले महाविद्यालयाचा सचिव प्रतिक पांडुरंग जाधव व शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा ओंकार पाटील हा पाटाकडील तालीम मंडळाचा फुटबॉलपटू आहे. त्यांची सचिवपदी निवड झाल्यानंतर तालमीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रतिकची बिनविरोध निवड झाल्यावर तालमीचे कार्यकर्ते पिवळे-निळा झेंडा घेऊन आले होते. कॉमर्स कॉलेजचा स्वरूप तेली याच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी त्याच्या खांद्यावर पांढरा-निळा झेंडा लपेटून फोटो सेशन केले. 

यिनच्या सदस्याचा जल्लोष

न्यू कॉलेजचा अभिषेक श्रीराम हा डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा लीडर आहे. यिनच्या प्रत्येक उपक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असतो. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करत तो विजयी झाल्यावर त्याचे यिनच्या सदस्यांनी अभिनंदन केले. 
 

Web Title: Kolhapur News Shivaji University GS election