गोणी यांची ३३ वर्षांची श्रद्धा, कर्तव्य अन्‌ सेवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कोल्हापूर - कर्तव्य, श्रद्धा आणि सेवा काय असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील शिवाजीराव गोणी. जोतिबा यात्रा आणि तेथील पार्किंग नियोजन म्हणजे गोणी असे समीकरण तयार झाले. आयुष्यातील ३५ पैकी ३३ वर्षे गोणी यांनी जोतिबा डोंगरावरील ‘चैत्र’ आणि ‘श्रावण षष्ठी’ यात्रेतील पार्किंगचे नियोजन केले आहे.

कोल्हापूर - कर्तव्य, श्रद्धा आणि सेवा काय असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील शिवाजीराव गोणी. जोतिबा यात्रा आणि तेथील पार्किंग नियोजन म्हणजे गोणी असे समीकरण तयार झाले. आयुष्यातील ३५ पैकी ३३ वर्षे गोणी यांनी जोतिबा डोंगरावरील ‘चैत्र’ आणि ‘श्रावण षष्ठी’ यात्रेतील पार्किंगचे नियोजन केले आहे.

जोतिबा यात्रेत पार्किंगची व्यवस्था करण्यातून भाविकांची सेवा करण्याचे समाधान मिळते, असे गोणी सांगतात. शहर वाहतूक नियंत्रण शाखेत सहायक फौजदार असलेले गोणी सध्याही जोतिबा डोंगरावर रजा-सुटी न घेता भाविकांची सेवा म्हणून मनःपूर्वक कार्यरत आहेत.

बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील शिवाजीराव गोणी. ३५ वर्षांपूर्वी पोलिस मुख्यालयातून ‘ड्युटी’ला सुरुवात केली. दोनच वर्षांत त्यांना कोडोली पोलिस ठाणे दिले. तेथून गोणी यांनी जोतिबा यात्रेतील नियोजनाला सुरवात केली. ते जोतिबा डोंगरावरील चैत्र आणि श्रावणषष्ठी यात्रेचे नियोजन करू लागले. त्यांचे मुद्दे ते वरिष्ठांना पटवून देत होते आणि ते योग्यही ठरत होते. पुढे जोतिबा यात्रा आणि तेथील पार्किंगचे नियोजन म्हणजे शिवाजीराव गोणी असे समीकरण तयार झाले. त्यातूनच ३५ पैकी ३३ वर्षे शिवाजीराव गोणी जोतिबा यात्रेतील पार्किंगच्या नियोजनात सक्रिय आहेत.

यात्रेच्या नियोजनासाठी त्यांना ठराविक कालावधीसाठी बोलावून घेतले जाते. मूळचे बसर्गेचे असलेले गोणी सध्या कळंब्यात राहतात. अडीच-तीन महिने ते रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत जोतिबा डोंगरावर असतात. स्वतःची मोटारसायकल आणि त्या मोटारसायकलवर घरातून घेतलेला जेवणाचा डबा सोबत असतो. जोतिबा चैत्रात साधारण ६० हजारांहून अधिक दुचाकी; तर ३० हजारांहून अधिक मोटारी येतात. चार-पाच वर्षांत त्यांनी दहा-बारा पार्किंगच्या ठिकाणांहून तब्बल २४ हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ते पार्किंगची व्यवस्था करत आहेत. राज्यातून-परराज्यांतून येणाऱ्या भाविकांना पार्किंगचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेतात. 

Web Title: Kolhapur News ShivajiRao Goni spiecal story