शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची जय्यत तयारी - फत्तेसिंह सावंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ६ जूनला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा होणार आहे. त्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त येणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रसण व्हावा यासाठी प्रबोधन करणार आहे. राज्यातील गड संवर्धनविषयक परिसंवाद व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मुख्य सहभागाने यंदाचा सोहळा साजरा होत आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी दिली. 

कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ६ जूनला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा होणार आहे. त्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त येणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रसण व्हावा यासाठी प्रबोधन करणार आहे. राज्यातील गड संवर्धनविषयक परिसंवाद व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मुख्य सहभागाने यंदाचा सोहळा साजरा होत आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी दिली. 

साडेतीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आलुतेदार, बलुतेदारांना घेऊन आदर्श राज्याची घडी बसविली. लोककल्याणकारी राज्याचा पाया घालून दिला. त्या शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६६४ ला झाला. हा दिवस इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदविला गेला. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला दिवस म्हणून ‘राष्ट्रीय सण’ म्हणून समितीतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो. त्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा पुढाकार असतो. यंदाही ते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांसह इतिहास अभ्यासक, संशोधक गडावर जाणार आहेत. 

शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला (५ जूनला) ‘संवर्धन रायगडाचे मत शिवभक्तांचे’ या विषयावर परिसंवाद आहे. यात युनेस्कोच्या संचालक डॉ. शिखा जैन, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संचालक संशोधक बी. व्ही. खरबडे, राकेश माथूर, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक ए. के. सिन्हा, डॉ. के. पी. पनाचा, स्थापत्य अभियंता ए. आर. रामनाथन व राहुल समेल आदींसह दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, पर्यावरण तज्ज्ञ प्रा. मधुकर बाचूळकर सहभागी होणार आहेत. 

५ जूनला गडापासून सोहळ्यांची सुरुवात होईल, महादरवाजाला तोरण बांधण्यात येईल. शिरकाई देवीचा गोंधळ, शाहिरी, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम गडावर होणार आहेत.

शिवराज्याभिषेक दिनाच्या मुख्य दिवशी पहाटे रायगडावरील नगारखान्याजवळ भगवा ध्वज उभारून सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर मूर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाईल. रणवाद्य हलगी, घुमक-कैताळाच्या तालावर होळीचा माळ येथे युद्धकालीन प्रात्यक्षिके होतील. त्यानंतर पालखी सोहळा, शिवप्रतिमा, शोभायात्रा होईल, असेही श्री. सावंत यांनी सांगितले.

गडावर जाण्यासाठी दोन्ही बाजूला संरक्षण कठडे व दोर लावले आहेत. स्वयंसेवक असणार आहेत. पाण्याची सोय गडावर केली आहे. तरीही शिवभक्तीनी स्वतःसोबत पिण्याचे पाणी आणावे, असे आवाहन समितीने केले आहे. देशभरातील सर्व आमदार व खासदार तसेच शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील वंशजांना निमंत्रित केले आहे. पायथा ते बसस्थानक अशा तीन कि.मी. अंतरासाठी शटल सेवा मोफत असणार आहे.  खासदार संभाजीराजे छत्रपती ५ जूनला दुपारी ४ वाजता पायथ्यावरून रायगडावर चालत जाणार आहेत.पत्रकार परिषदेस समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, उदय घोरपडे, अजय पाटील, राहुल शिंदे, शहाजी माळी, सागर दळवी, दिलीप सावंत, प्रसाद ओतारी उपस्थित होते.

Web Title: kolhapur news shivrajyabhishek din sohala preparation