कोल्हापूरात शिवसेनेचा वाढीव पाणीपट्टी विरोधात मोर्चा

कोल्हापूरात शिवसेनेचा वाढीव पाणीपट्टी विरोधात मोर्चा

कोल्हापूर - कोल्हापूर दक्षिणमध्ये रक्त सांडण्याची परंपरा आहे. तेथे तहानलेल्या लोकांना पाणी देण्याची परंपरा नाही. अशा लोकांच्या ताटाखालचे आपण मांजर होऊ नका, तेरा गावच्या वाढीव पाणीपट्टीस तातडीने स्थगिती द्या, अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज जीवन प्राधिकरणाकडे करण्यात आली. प्राधिकरणाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी आज धडक मोर्चा काढला. पाणीपट्टी रद्द न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. 

गांधीनगरसह, वसगडे, मुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, नेर्ली, तामगाव, कणेरीवाडी, कणेरी, मोरेवाडी, पाचगाव अशा तेरा गावच्या पाणीपट्टीत वाढ झाली आहे. एक हजार लिटरमागे 12 रूपयांवरून 19 रूपये इतकी पाणीपट्टी केली आहे. दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून 19 रूपयावरून पंधरा रूपये पन्नास पैशापर्यंत वाढ कमी झाली आहे. शिवसेनेला मात्र साडेतीन रूपयांची कपात अमान्य आहे. तेरा गावातील दोन हजार लोकांच्या हरकती दिल्या. त्यावर कोणतीही सुनावणी न घेता पाणीपट्टीत वाढ केली.

कोल्हापूर दक्षिणमध्ये रक्त सांडले जाते पण पाणी देण्याची व्यवस्था कोणी करत नाही. आठ आठ दिवस नळाला पाणी येत नाही. योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. त्यास जबाबदार कोण,याचा शोध घ्या. 
संजय पवार,
जिल्हाप्रमुख. 

साडेतीन रूपयांची कपात अमान्य असून सुनावणी न घेता वाढ लागू कशी केली, असा सवाल करण्यात आला. याच मागणीसाठी दुपारी बाराच्या सुमारास ताराराणी चौकातून मोर्चास सुरवात झाली. पाणीपट्टी वाढ रद्द झालीच पाहिजे, झोपलेल्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देत मोर्चा जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस तैनात होते. प्राधिकरणाचे अभियंता भोई यांच्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केला. शिवसेनेने हरकती नोंदवल्या असताना नवी दरवाढ लागू का केली आणि नंतर साडेतीन रूपयांची कपात का केली, असा सवाल केला.

एसआयडीसीला पंधरा रूपयाप्रमाणे आणि जनतेला साडेपंधरा रूपयाप्रमाणे आकारणी का करता, असाही सवाल झाला. विराज पाटील यांनी नव्या वाढीला स्थगिती द्यावी, पूर्वीप्रमाणे बारा रूपयांची आकारणी करावी, तोपर्यंत नव्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली. आपल्या भावना वरिष्ठ कार्यालयास कळवून स्थगितीचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. 

रवि चौगुले,हर्षल सुर्वे, शशी बिडकर,अवधूत साळोखे, विजय करी, दिपक रेडेकर,मंजीत माने, सुनील पोवार, संजय जाधव, जितेंद्र कुबडे,पोपट दांगट, रणजित आयरेकर, जितेंद्र कुबडे,संजय काळुगडे, दिपक पाटील, धनाजी यादव, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, दिपाली शिंदे, संतोष पाटील, जयराम पोवार आदी आंदोलनात सहभागी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com