शिवसेनेचा साखर सहसंचालक कार्यालयावर मशाल मोर्चा

युवराज पाटील
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - "पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे' अशी हाक देत शिवसेनेने साखर सहसंचालक कार्यालयावर आज मशाल मोर्चा काढला. शेतकरी संघटनेने काल याच कार्यालयास टाळे ठोकल्याने आजच्या मोर्चावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. 

कोल्हापूर - "पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे' अशी हाक देत शिवसेनेने साखर सहसंचालक कार्यालयावर आज मशाल मोर्चा काढला. शेतकरी संघटनेने काल याच कार्यालयास टाळे ठोकल्याने आजच्या मोर्चावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

पद्मा चौकातून दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चास सुरवात झाली. शिवसैनिक मशाल घेऊनच मोर्चात सहभागी झाले. शेतकरी संघटनेच कार्यकर्त्यांनी काल याच प्रश्‍नावरून थेट टाळे ठोकल्याने पोलिसांनी बॅरिकेट लावून बंदोबस्त तैनात केला. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पाचशे रूपये कपात करणाऱ्या साखर सम्राटांचे करायचे काय, एफआरपी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. 

यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी आणि दोनशे रूपये अधिक असा तोडगा निघाला असताना साखर कारखानदारांनी पाचशे रूपये कपात करण्याचा निर्णय का घेतला ? साखर सहसंचालकांनी यावर कोणती कारवाई केली ? शेतमजूरांचे वाढते दर एकंदरीतच ऊसाची शेती परवडत नसताना पाचशे रूपयांची कपात केली तर उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती आहे. साखर सहसंचालकांनी याकामी ठोस भुमिका घेऊन पाचशे रूपये न देणाऱ्यावर कारवाई करावी. 

- संग्राम कुपेकर

जिल्हाप्रमूख मुरलीधर जाधव यांनी शिवसेनेचा आजचा मोर्चा हा केवळ इशारा आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे, कष्टाचे पाचशे रूपये कमी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. बगॅस, मोलॅसिसचे दर कमी झालेत का याचे उत्तर साखर सहसंचालकांनी द्यावे. दर कमी करण्याचा अधिकार साखरसम्राटांना कुणी दिला? येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या कपातीचे पाचशे रूपये खात्यावर जमा करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने भाजप सरकारला धडा शिकविला जाईल. 

जिल्हाप्रमूख संजय पवार यांनी धगधगत्या मशालीचा अधिकाऱ्यांनी स्वीकार करावा. यातून मार्ग न निघाल्यास हीच मशाल कार्यालय भस्मसात करेल असा इशारा दिला. 

शिवसेनेतर्फे अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. पाच नोव्हेंबरला पालककमंत्र्यासोंबत झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक वाढीव दोनशे असा दर ठरला होता. टनाला तीन हजारापर्यंत दर होता. तो देणे बंधनकारक असताना कारखानदारांनी पाचशे रूपये कपातीचा निर्णय जाहीर केला, साखर सहसंचालकांना कारवाईचा अधिकार आहे मात्र ते त्यांच्या हाताखालचे बाहुले बनले आहे. ऊस उत्पादकांची पिळवणूक थांबवावी, फसवणूक होणार असेल तर शिवसैनिक कार्यालये पेटवून देतील असा इशारा देण्यात आला. 

शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, बाबासाहेब पाटील, दिपक यादव, दत्ता पोवार, विजय जोशी, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, तानाजी आंग्रे, विराज पाटील, अवधूत साळोखे, कृष्णात पोवार, रणजित आयरेकर, सयाजी चव्हाण, अण्णा बिलोरे, दिलीप देसाई, शुभांगी पोवार, जयश्री खोत, दिपाली शिंदे आदी मोर्चात सहभागी झाले. 

Web Title: Kolhapur News ShivSena Mashal Rally