राष्ट्रीय पुरस्कार व्हाया मोबाईल, हॅन्डीकॅम...!

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 11 मे 2018

कुणी हॅन्डीकॅमवर तर कुणी मोबाईलवर शूट करून प्रयत्न सुरू केले तर कुणी घरच्यांनी केलेले दागिने विकून ‘बजेट’ उभारलं...गेल्या चार वर्षांतील कलापूरच्या शॉर्टफिल्म चळवळीच्या या प्रवासात अनेक शॉर्टफिल्म तयार झाल्या आणि त्या जगभरातील विविध महोत्सवात बक्षिसांची लयलूट करू लागल्या.

कोल्हापूर - जे स्वतःला भावतं, त्यावर शॉर्टफिल्म करायची संकल्पना पुढे आली. पण, ‘बजेट’चं काय? अखेर त्यावर स्वतःच उत्तर शोधलं गेलं. कुणी हॅन्डीकॅमवर तर कुणी मोबाईलवर शूट करून प्रयत्न सुरू केले तर कुणी घरच्यांनी केलेले दागिने विकून ‘बजेट’ उभारलं...गेल्या चार वर्षांतील कलापूरच्या शॉर्टफिल्म चळवळीच्या या प्रवासात अनेक शॉर्टफिल्म तयार झाल्या आणि त्या जगभरातील विविध महोत्सवात बक्षिसांची लयलूट करू लागल्या. उमेश बगाडेच्या ‘अनाहूत’नं यंदा पहिल्यांदाच कोल्हापुरात फिल्मफेअर ॲवार्ड आणलं आणि मेधप्रणव पोवारच्या ‘हॅपी बर्थ डे’नं राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. अशाच अप्रतिम कलाकृती उद्या (ता. ११) होणाऱ्या शॉर्टफिल्म कार्निव्हलमध्ये अनुभवायला मिळणार आहेत.

कशाला हवे गॅदरिंग ?
शहरातील कला शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांनी गॅदरिंग रद्द करून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर शॉर्टफिल्म तयार करण्याच्या असाईन्‌मेंट दिल्या. कुठल्याही कॅमेऱ्यावर शूट करण्याची मुभा दिली गेली, विद्यार्थ्यांनीही मग संधीचं सोनं केलं. पहिल्या दोन वर्षांत संख्यात्मक अधिक असणाऱ्या या शॉर्टफिल्म पुढे गुणात्मक आणि अधिक आशयघन होत गेल्या. शार्टफिल्म मेकींग ग्रुप तयार झाले. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलसारखी स्थानिक व्यासपीठं या तरूणाईला मिळाली आणि एकापेक्षा एक कलाकृती मर्यादित न राहता जगभरातील विविध महोत्सवात पोचू लागल्या. 

चाळीसहून अधिक पुरस्कार
‘भवताल’, ‘दि प्रॉमिस’, ‘कोलाज’, ‘मायग्रेशन पॉवर’ पासून ते अलीकडच्या ‘बलुतं’, ‘कॉस्ट अवे’, ‘चौकट’, ‘याकूब’, ‘डेरू’, ‘आर्म थीफ’, ‘काजवा’, ‘उत्सव’, ‘ट्रॅफिक’, ‘टरका’, ‘प्रिय मित्रा’ अशा अनेक कलाकृती विविध महोत्सवांत पोचल्या. काही शॉर्टफिल्मनी चाळीसहून अधिक पुरस्कार पटकावले. सलग दोन वर्षे गोव्यातील ‘इफ्फी’तील ‘इंडियन पॅनोरमा’मध्ये कलापूरचं प्रतिनिधित्व केलं. ही चळवळ अधिक व्यापक करताना सिनेमानिर्मितीकडे जाण्याचा संकल्प कार्निव्हलच्या निमित्ताने होणार आहे. 

निर्मितीची प्रयोगशाळा
वेगवेगळे प्रयोग तरूणाईने शॉर्टफिल्ममधून केलेले दिसतात. अगदी आशयापासून ते तंत्रज्ञान आणि प्रमोशनपर्यंतच्या निर्मितीची प्रयोगशाळाच कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.   

मुळात तरुणाई व्यक्त होतेय व शॉर्टफिल्म करण्याचं धाडस करते, हीच मोठी गोष्ट आहे. याच शॉर्टफिल्म मेकर्समधून नक्कीच उद्याचे प्रतिभावंत फिल्ममेकर्स निर्माण होणार आहेत. 
- मेधप्रणव पोवार ,
राष्ट्रीय पुरस्कार विजेता.

कोल्हापुरात सिनेमा सुरू झाला, असा केवळ अभिमान मिरवण्यापूर्वी येथील तरुणाईने नव्या जोमानं कृतिशील 
पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- उमेश बगाडे, फिल्मफेअर विजेता.

कोल्हापुरातील लेखक, दिग्दर्शक आता जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत. त्यांच्या शॉर्टफिल्म कार्निव्हल उपक्रमाला शुभेच्छा. कोल्हापूरकरहो, तुम्हीही सहभागी व्हा.
- डॉ. अमोल कोल्हे, अभिनेता 
 

Web Title: Kolhapur News Short Film Big Story