महागावच्या युवतीची धनुर्विद्येवर "श्रद्धा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

कोल्हापूर - क्रिकेटला लाभलेले ग्लॅमर पाहता वैयक्तिक खेळांकडे क्रीडाप्रेमी गांभीर्याने कधी पाहणार, अशी विचारण्याची वेळ येऊन ठेपली असली, तरी खेळाडू मात्र वैयक्तिक खेळांत करिअर करिण्यासाठी अक्षरश: झटत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील श्रद्धा बाबासाहेब पोवार हिचा धनुर्विद्येतील प्रवास थक्क करायला लावणारा आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत तिने विशेष प्रावीण्यासह चमकदार कामगिरी केली आहे.

कोल्हापूर - क्रिकेटला लाभलेले ग्लॅमर पाहता वैयक्तिक खेळांकडे क्रीडाप्रेमी गांभीर्याने कधी पाहणार, अशी विचारण्याची वेळ येऊन ठेपली असली, तरी खेळाडू मात्र वैयक्तिक खेळांत करिअर करिण्यासाठी अक्षरश: झटत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील श्रद्धा बाबासाहेब पोवार हिचा धनुर्विद्येतील प्रवास थक्क करायला लावणारा आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत तिने विशेष प्रावीण्यासह चमकदार कामगिरी केली आहे. शेतमजूर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास तिने बाळगला असून गडहिंग्लज तालुक्‍यातील महागावच्या या युवतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याचे स्वप्न आहे; मात्र तिरंदाजीचे साहित्य घेण्याकरिता पैशाची असलेली चणचण ही तिच्यासमोरील अडचण आहे. 

श्रद्धा ही महागावची असून वाईतील कनिष्ठ महाविद्यालय कन्याशाळेत बारावी सायन्सला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने धनुर्विद्येत स्वत:ला झोकून दिले. जे साहित्य मिळाले. त्याच्या जोरावर तिने शालेय स्तरावरील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत स्वत:ची छाप पाडली. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू वैयक्‍तिक क्रीडा प्रकारांत पदक मिळवत असल्याचे पाहून तिने पदके मिळविण्याचे ध्येय ठेवले. 

काडाप्पा (आंध्र प्रदेश) येथील सातव्या राष्ट्रीय वरिष्ठ धनुर्विद्येत तिने रौप्य, आनंदमधील (गुजरात) रुरल गेम्समध्ये रौप्य, फुलगाव (पुणे) येथील पाचव्या राष्ट्रीय ग्रामीण स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. तसेच झारखंड येथे झालेल्या 60 व्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदकेही पटकाविली. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या स्पर्धांत तिने पाच सुवर्ण, तर जालना, सातारा, वाईसह ठिकठिकाणी झालेल्या स्पर्धांत सुवर्ण, रौप्य, कास्यपदक पटकावून धनुर्विद्येतील प्रवास सुरू ठेवला आहे. 

धनुर्विद्येत पदकांच्या राशी मिळविताना तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले नाही. कन्याशाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथल्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. धनुर्विद्येतील यशाबद्दल तिचा अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्या हस्ते सत्कारही झाला आहे. तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उंचवायचे आहे. त्यासाठी धनुर्विद्येचे दोन लाख दहा हजार रुपयांचे साहित्य हवे आहे. आई-वडील शेतमजूर असल्याने हा खर्च त्यांच्या आवाक्‍याबाहेरचा आहे. सायन्स शाखेचा अभ्यास करत ती धनुर्विद्येचा कसून सराव करत आहे. 

""श्रद्धाने सुवर्ण, रौप्य व कास्यपदके पटकावून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिला धनुर्विद्येचे साहित्य मिळाले, तर ती भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्त्व करेल. त्यासाठी साहित्य लवकर उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.'' 
- बाबासाहेब पोवार (श्रद्धाचे वडील) 

Web Title: kolhapur news shradha