‘सिद्धगिरी विद्याचेतना’तून जिल्ह्यात २३२ शाळांना बळ

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 5 जून 2018

कोल्हापूर - सरकारी शाळा आणि पर्यायाने मराठी वाचवा, या उद्देशाने कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फे यंदा २३२ शाळा दत्तक घेतल्या जाणार आहेत. ‘सिद्धगिरी विद्याचेतना’ या उपक्रमातून मठातर्फे दर महिन्याला दहा लाखांवर खर्च केला जातो. जिल्हा परिषदेच्या २०२ शाळांबरोबरच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या ३० शाळाही दत्तक घेतल्या जाणार आहेत. 

सिद्धगिरी मठातर्फे गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेतल्या जातात. सुरुवातीला ३०, त्यानंतर ७०, त्यानंतर ८० असा टप्पा पार करत आता ही संख्या २३२ शाळांवर पोचली आहे. दोन शाळांमागे एक शिक्षक आणि दहा शाळांमागे एक शारीरिक शिक्षक, अशी टीम कार्यरत असून ती अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यावर भर देते. प्रत्येक वर्षी मठातर्फे या उपक्रमासाठी साठ लाख रुपये खर्च केले जायचे, पण आता हा खर्च दुप्पट झाला आहे. 

विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातून एक बालसभा, महिन्यातून एक पालकसभा आणि वर्षातून प्रत्येक गावात माता-पित्यांचा कृतज्ञता सोहळाही आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि आई-वडिलांनी मुलाचे शिक्षण अर्धवट न थांबवता त्याला शिकून मोठे करण्याचा संकल्प, अशा मध्यवर्ती संकल्पनेवर माता-पिता कृतज्ञता सोहळा होतो.  

मोबाईल सायन्स लॅब
मठातर्फे यंदा मोबाईल सायन्स लॅब ही नवी संकल्पना पुढे आणली आहे. एका मोठ्या वाहनात अडीचशेहून अधिक वैज्ञानिक प्रयोग असतील. त्याशिवाय माहिती देण्यासाठी दोन विज्ञान मित्र असतील. ही मोबाईल सायन्स लॅब असणारी गाडी प्रत्येक शाळेत जाईल आणि विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांची माहिती देणार असल्याचे विनायक माळी यांनी सांगितले.

सरकारी शाळा वाचल्या, तर मराठी वाचेल आणि संस्कृती टिकून राहील, याच उदात्त हेतूने मठातर्फे शाळा दत्तक अभियान आणि ‘सिद्धगिरी विद्याचेतना’ अभियान राबवले आहे.
- श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी

Web Title: Kolhapur News Sidhagiri Math School special story