रायगड विकास प्राधिकरणात सिंधुदुर्ग - खासदार संभाजीराजे

संजय पाटील
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

वारणानगर - रायगड किल्ल्यासह परिसराच्या विकासासाठी रायगडला प्राधिकरणाचा दर्जा मंजूर करून आणला. सिंधुदुर्ग किल्लाही रायगड प्राधिकरणच्या अंतर्गत घेऊन किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पन्हाळा, पावनगडच्या संवर्धनासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी  वारणेतील मावळा प्रतिष्ठानबरोबरच्या बैठकीत दिली.

वारणानगर - रायगड किल्ल्यासह परिसराच्या विकासासाठी रायगडला प्राधिकरणाचा दर्जा मंजूर करून आणला. सिंधुदुर्ग किल्लाही रायगड प्राधिकरणच्या अंतर्गत घेऊन किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पन्हाळा, पावनगडच्या संवर्धनासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी  वारणेतील मावळा प्रतिष्ठानबरोबरच्या बैठकीत दिली.

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवरायांच्या मंदिराची पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे डागडुजी झाली नाही. याबाबत वारणानगर येथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर लंडनमध्ये असलेले खासदार संभाजीराजे यांनी वस्तुस्थिती जाणून बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे काल कोल्हापुरात बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘‘शासनाने रायगड परिसर विकासासाठी रायगड प्राधिकरण स्थापनेला मंजुरी दिली आहे. रायगड परिसर विकासाला ४०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या प्राधिकरणातच सिंधुदुर्गचा समावेश केला असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या दुरवस्थेसह सर्व समस्यांचा अभ्यास करून त्या दूर केल्या जाणार आहेत.’’
खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘‘मी नुकताच इंग्लंडमधील २५ किल्ल्यांचा अभ्यास दौरा केला. तिथे एकही किल्ला आपल्या किल्ल्यांसारखा नैसर्गिक नाही. आपल्या किल्ल्यांना ऐतिहासिक महत्त्व असल्याने सर्वच किल्ल्यांना पर्यटन केंद्र बनविले तर जगातील पर्यटक येतील.’’

मावळा प्रतिष्ठानमार्फत पन्हाळागड व पावनगड याचा केलेला अभ्यास ॲड. पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांच्यासमोर मांडला. पावनगडला प्रदूषणमुक्त परिसर करण्यासाठी राज्य शासन व केंद्र सरकारच्या मंजुऱ्या घ्याव्या लागतात. त्या घेऊन पन्हाळ्याचे वेगळे पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणार आहे. मुंबईत येत्या १५ नोव्हेंबरला शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलविली आहे. बैठकीस कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, निखिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सकाळ’चे आभार
सिंधुदुर्ग किल्ल्याचा अभ्यास केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मंदिरासह अन्य दुरवस्थेचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानेच खासदार संभाजीराजे लंडनमध्ये असतानाही त्यांनी वृत्ताची दखल घेतली. त्यांनी बैठक घेऊन सिंधुदुर्गसह पन्हाळा, पावनगड या किल्ल्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न सुरू केले. ‘सकाळ’ने वेळोवेळी दिलेल्या प्रसिद्धीमुळे आजची बैठक होऊ शकली. याबद्दल ॲड. संदीप पाटील यांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

Web Title: Kolhapur News Sindhudurg Fort included in Raigad Development authority