तरुणाईची जिगर अन्‌ साकारले छोटे उद्यान

सुधाकर काशीद
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक मोकळ्या जागा पडून आहेत. वर्षानुवर्षे त्यांचा वापर नसल्याने तेथे रानटी गवत, झुडपे वाढली आहेत; पण या मुलांनी अशा जागेचेच स्वकष्टातून नंदनवन केले आहे. आणखी सहा ठिकाणी ही संकल्पना राबविली जाणार आहे.
- संतोष रामाणे, आर्किटेक्‍ट

प्रिन्स शिवाजीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श - स्वकष्टातून तयार झाले ग्रीन वॉक पार्क
कोल्हापूर - ही जागा रस्त्याकडेला पडून असलेली. सहज कचरा टाकायला सोयीची. वीसपंचवीस दिवसांपूर्वी तेथे तीस मुले आली. त्यांनी जागा साफ केली. कोणी हातात खोरे घेतले, कोणी फावडे घेतले, कोणी चक्क गवंडी झाले. जीन्स टी शर्टमधली ही थोडी मॉडर्न वाटणारी मुले काय करतात, याकडे परिसरातले लोक कुतूहलाने पाहत होते. पंधरा-वीस दिवस उलटले आणि या जागेचे रूपच पालटले. वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या या जागेवर चक्क छोटे उद्यानच आकारास आले. अक्षरशः दहा-दहा तास राबून, या मुलांनी तरुणाईच्या संकल्पनेतून काय चमत्कार घडू शकतो, याचे प्रत्यंतर कोल्हापुरवासीयांना दाखवून दिले.

सानेगुरुजी वसाहत मुख्य रस्त्यावर तरुणांनी साकारलेली ही संकल्पना म्हणजे ग्रीन वॉक पार्क. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या मुलांनी स्वकष्टातून ही संकल्पना आकारास आणली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गेले पंधरा-वीस दिवस राबून, सार्वजनिक मोकळ्या जागेचे नंदनवन केले आहे. हे एकच ठिकाण नव्हे, तर कोल्हापुरात आणखी सहा ते सात ठिकाणी ही संकल्पना राबविण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

सानेगुरुजी वसाहतीची हिरव्या पट्ट्यातली जागा बरेच वर्षे पडून आहे. तेथे नैसर्गिक काही झाडे वाढली होती; पण त्या झाडांखाली बसायचे सोडाच; पण उभे राहणेही शक्‍य नाही, अशी त्यांची अवस्था होती. आर्किटेक्‍चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक प्रत्यक्ष कृतिशील काही तरी करायचा अभ्यासक्रमात भाग असतो. मग त्यांनी महापालिका आर्किटेक्‍ट संतोष रामाणे यांच्याशी संपर्क साधला.

पहिलाच प्रयत्न म्हणून त्यांनी सानेगुरुजी वसाहत रस्त्याजवळची जागा निवडली. मुला-मुलींनी जागा साफ केली. खड्डे काढले. लोकांना बसण्यासाठी पारंपरिक रचनेपेक्षा वेगळे कट्टे उभे केले. वाहनाच्या टायरचे झोपाळे मुलांसाठी बांधले, झाडांच्या बुंध्यांना रंग दिला, मातीवर खडी टाकली, दुतर्फा छोटी छोटी रोपे लावली, कट्ट्यावर वारली चित्रकला साकारली. ही सारे कामे गवंडी, सुतार किंवा पेंटरचा आधार न घेता मुला-मुलींनी व त्यांच्या शिक्षकांनी केली. स्थानिक नगरसेवक शारंगधर देशमुख, सानेगुरुजी वसाहतीतील नागरिकांनीही त्यांना मदत केली. या साऱ्यातून एक सुंदर छोटेसे उद्यान तेथे उभे राहिले आहे. इतके सुंदर, की या रस्त्यावरून जाणारे-येणारे येथे थांबून सेल्फी काढून घेत आहेत. हे छोटेसे देखणे उद्यान महापालिकेने नव्हे, तर मुला-मुलींनी श्रमदानातून उभे केले आहे, हे कळल्यानंतर तर खूपच कौतुकाची भावना आहे.

Web Title: kolhapur news small garden making by youth