होय!..आम्ही आनंदानेच जगणार...

सुधाकर काशीद
रविवार, 29 एप्रिल 2018

स्नेहबंध या संस्थेच्या माध्यमातून या सर्वांना एकत्रित आणले आहे. आणि उद्या त्यांच्यासाठी बांधलेल्या नव्या वास्तूत हे सर्वजण पाऊल टाकणार आहेत. समाजातल्या कोणत्याही वृद्धाने, ज्येष्ठाने येथे रडत कुडत नाही, केवळ आनंदी जगायच्या तयारीने यावे, अशी या सर्वांची विनंती आहे.

कोल्हापूर - हा वृद्धाश्रम नाही. येथे जे आहेत, त्यांना घरात कोणी बघत नाही, असे तर अजिबात नाही. तरीही हे सारे येथे एकत्र आले आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धाचा टप्पा त्यांनी गाठला, पण वय, वृद्धत्व या शब्दांना बाजूला ठेवून अखेरच्या दिवसापर्यंत आनंदाने जगायचे एवढीच त्यांची भावना आहे. आणि तसेच ते येथे जगत आहेत.

स्नेहबंध या संस्थेच्या माध्यमातून या सर्वांना एकत्रित आणले आहे. आणि उद्या त्यांच्यासाठी बांधलेल्या नव्या वास्तूत हे सर्वजण पाऊल टाकणार आहेत. समाजातल्या कोणत्याही वृद्धाने, ज्येष्ठाने येथे रडत कुडत नाही, केवळ आनंदी जगायच्या तयारीने यावे, अशी या सर्वांची विनंती आहे.

कारभारी मंडळी...
स्वरूपा कोरगावकर, अलका कुलकर्णी, नीलिमा पाटील, लक्ष्मी शिरगावकर, दीप्ती केसरकर, कल्पना चिटणीस, मिलन कोरगावकर, इंदिराराजे शितोळे, विनायक गुजराथी, उदय काळे, नरेश पोलाणी हे स्नेहबंधचे काम पाहतात.

येथील ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टने २०१० ला रेल्वे फाटकाजवळ छोट्याशा कौलारू घरात या स्नेहबंधचा पहिला धागा विणला. उद्देश एवढाच की, विशिष्ट वयानंतर म्हणजे साधारण सत्तर, ऐंशी वर्षांनंतर त्या व्यक्‍तीच्या कार्यक्षमतेकडे शंकेने पाहिले जाते. याच्या काही लक्षात राहिल की नाही, याला काही आठवले की नाही असे बोलले जाते. ज्येष्ठांच्या वृद्धांच्या मनातल्या गोष्टींना तुम्हाला हे जमणार नाही असे म्हणून दाबले जाते, पण वस्तुस्थिती तशी नसते. वृद्धांना काही काळ दिलखुलास राहता यावे, म्हणून स्नेहबंधमध्ये त्यांना एकत्रित केले. रोज सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत येथे वृद्ध येऊ लागले. त्यांना हवं ते वाचन करू लागले.

मी रोज आठ किलोमीटर प्लेजरवरून स्नेहबंधमध्ये येतो. माझे वय ९३. मी कृषी खात्यात सेवेत होतो. मी नोकरी केलेल्या काळापेक्षा जास्त निवृत्तीचा काळ आनंदाने उपभोगत आहे. अनेकजण म्हणतात, या वयात प्लेजर चालवू नका; पण मस्त गार हवेत या वयातही प्लेजर चालविण्याचा आनंद खूप वेगळा आहे. मी अखेरच्या दिवसापर्यंत असाच आनंद घेणार आहे. 
- बाळकृष्ण दुधगावकर काका
(वय ९३)

आबा कुलकर्णी काका दर गुरुवारी जुन्या गाण्याची मैफल रंगवू लागले. पित्रे काका सर्वांना इंग्रजी बोलता यावे, म्हणून प्रसंगी रागावून धडे देऊ लागले. डॉ. आर. व्ही. भोसले त्यांचे इस्त्रोतले अनुभव सोप्या भाषेत सांगत राहिले. अंतराळ कसे असते ग्रह तारे कसे असतात. हे छोट्या छोट्या उदाहरणातून समजावून देऊ लागले. डिंगणकर काका सुरात तबला वाजवू लागले. संगोराम काका महंमद रफीची गाणी इतक्‍या तन्मयतेने म्हणू लागले की अनेकांना ते भूतकाळात रमवून टाकू लागले.

खोत काका स्नेहधामसमोरच्या बागेत रमू लागले. एखादं दिवशी सर्वांच्या मनात आलं तर अलबेलातील शाम ढले, खिडकीतले या मास्टर भगवान यांच्या गीतावर सगळे काका-काकी ताल धरून नाचू लागले. एखाद्याचा वाढदिवसाला असला तर त्या दिवशी तोंडाला केक फासण्यापर्यंत काही काका खोड्या करू लागले. 
पण हे करताना जागेच्या मर्यादा किंवा निवाऱ्याच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या. आणि एका अज्ञात दानशूर काकांनी आपली मत्तिवडे (ता. कागल) येथील २० गुंठे जमीन स्नेहबंधला दिली. आणि तेथे सर्वांच्या सहभागातून १२ खोल्या, एक हॉल, स्वयंपाकगृह उभे राहिले. येथे ७० ते ८० ज्येष्ठांच्या राहण्याची सोय आहे. ज्येष्ठ नागरिकांना मन रमवता येथील असे खेळ आहेत. ज्येष्ठांना पोषक अशा आहाराची सोय आहे. 

आज वास्तूचे उद्‌घाटन 
रविवारी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सौ. अंजली पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन सोहळा आहे. कागल तालुक्‍यात मत्तीवडे रोड, कुरनूर येथे हा स्नेहबंध आहे. 
 

Web Title: Kolhapur News Snehbandh senior citizens special story