सोशल मीडियातून मैत्री आणि चोराशी लग्न 

सोशल मीडियातून मैत्री आणि चोराशी लग्न 

कोल्हापूर - सोशल मीडियातून दोघांची मैत्री झाली. पुढे प्रेम जमले. महिन्याभरानंतर तो लोणावळ्याहून कोल्हापुरात आला. ती त्याला भेटली आणि त्याच दिवशी त्यांनी लोणावळ्याकडे प्रयाण केले. लग्न केले, तेव्हा तिला त्याचे खरे रूप समजले. तो चोर असल्याचे सत्य पुढे आले. तरीही ती त्याच्याबरोबर चार-पाच महिने राहिली. पुढे तिचा मानसिक व शारीरिक छळ होऊ लागला. तेव्हा ती त्याला सोडून कोल्हापुरात आली. इथे तिला मध्यस्थी मिळाला आणि तिचा संसार पुन्हा बहरू लागला. कोल्हापुरातील ही एक सत्य घटना समाजातील अनेक मुद्यांना स्पर्श करणारी ठरली. 

कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ती मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती चांगली. शिक्षण ही पदवीपर्यंत झालेले. तिने सोशल मीडियावर अकाउंट काढले. तेही बनावट नावाने. ती रोज चॅटिंग करायची. एक दिवस तिला एका मुलाची "फ्रेंड-रिक्वेस्ट' आली. ती स्वीकारली. रोज चॅटिंग सुरू झाले. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर त्या दोघांनाही एकमेकांचे खोट्यानावाने अकाउंट असल्याचे समजले; पण दरम्यानच्या काळात मुलीने स्वतःची बहुतांशी माहिती खरी सांगितली होती. मुलाने मात्र बरेच काही तिच्यापासून लपविले होते. तरीही महिन्याभरात दोघांनीही सात जन्म एकत्रित राहण्याचे वचन घेतले. 

एक दिवस तो कोल्हापुरात आला. दोघांची भवानी मंडपात भेट झाली आणि त्याच दिवशी एकमेकांचे जन्मोजन्मीचे साथीदार म्हणून त्यांनी लोणावळ्याला प्रयाण केले. 

ज्या दिवशी तिला त्याने घरी नेले. त्याच दिवशी त्याने तासाभरात दोन हजार रुपये आणून तिच्या हातात दिले. आणखी तासाभराने तो घरातून बाहेर गेला. परत आला तेव्हा त्याने पुन्हा सहा हजार रुपये मुलगीच्या हातात दिले. ती आश्‍चर्यचकित झाली. पैसे कोठून आणतोस, अशी विचारणा केल्यावर त्याने स्पष्ट सांगितले "मी चोर आहे'. हे ऐकताच मुलीच्या पायाखालची वाळू सरकली. तिला धक्काच बसला. तिने त्याला चोरी बंद करण्याबाबत विनवणी केली. त्यासाठी माहेरी जाण्याचा दम दिला. नंतर त्याने चोरी सोडून छोटी-मोठी कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, तो बारावी नापास असल्याने चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही. अपेक्षित पैसे मिळत नव्हते. त्यामुळे तो तिचा छळ करू लागला. दारू पिऊन त्रास देऊ लागला. अखेर चार-पाच महिन्यांनी मुलगीने आई आजारी आहे. भेटून येतो, असे सांगून माहेरी निघून आली. आयुष्य उद्‌ध्वस्त झाल्याचे तिला क्षणाक्षणाला वाटत होते. 

पण तिच्या तुटलेल्या संसाराला भावनेचा आणि प्रेमाची उब देण्याचा प्रयत्न विधी व सेवा प्राधिकरणाने मध्यस्थीच्या माध्यमातून केला. प्राधिकरणातील वकिलांनी त्या मुलास बोलावून घेतले. दोघांच्या भावना स्वतंत्रपणे जाणून घेतल्या. दोघांनाही एकमेकांबरोबर रहायचे होते; पण संसार आणि आर्थिक गणिते जुळत नव्हती. अखेर प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी पुन्हा संसार करण्याचा निश्‍चिय केला. 

ऍड. योगिता हरणे, ऍड. शुभांगी निंबाळकर, ऍड. सारिका तोडकर, ऍड. इरफान पटेल यांनी दोघांचीही मानसिकता तयार केली आणि आज ते दोघेही पुण्याजवळील एका हॉटेलमध्ये काम करून सुखी संसार करीत आहेत. त्या मुलाचे व्यसनही सुटले आहे. विधी व सेवा प्राधिकरणाच्या यशस्वी प्रयत्नातून सोडचिठ्ठीपर्यंत आलेला संसार पुन्हा बहरू लागला. 

प्राधिकरणाचा उद्देश सफल झाला - मोरे 
वेळ, पैसा आणि शक्ती यांची बचत करण्यासाठी विधी व सेवा प्राधिकरण काम करते. न्यायालयात दाखलपूर्व घटनेत मोफत वकील देऊन प्रश्‍न निकाली काढले. यातीलच एक संसार जोडण्यात आम्हाला यश आले आहे. प्राधिकरणाचा उद्देश यामुळे सफल झाल्याचा आम्हाला आनंद असल्याचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com