एकजुटीनं पेटलं रान.. तुफान आलंया...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

कोल्हापूर - वेळ पहाटे पाचची. मजले (ता. हातकणंगले) येथील २५ ते ३० ग्रामस्थ सकारात्मक ऊर्जेने घराबाहेर पडतात. अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगर चढतात. हातात खोरे, टिकाव, पाटी घेऊन तब्बल दोन तास अंगाला घाम फुटेपर्यंत राबतात आणि मगच डोंगराखाली उतरतात. दोन महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे.

कोल्हापूर - वेळ पहाटे पाचची. मजले (ता. हातकणंगले) येथील २५ ते ३० ग्रामस्थ सकारात्मक ऊर्जेने घराबाहेर पडतात. अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगर चढतात. हातात खोरे, टिकाव, पाटी घेऊन तब्बल दोन तास अंगाला घाम फुटेपर्यंत राबतात आणि मगच डोंगराखाली उतरतात. दोन महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. हातकणंगलेपासून पाच किलोमीटरवर डोंगर कुशीत वसलेल्या मजले गावात दर उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कायमचीच संपवायची, असा निर्धार करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा उपक्रम श्रमदानातून सुरू आहे.

कोल्हापूर पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो; पण मजले हे गाव याला अपवाद आहे. उन्हाळ्यात येथे भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी आणि विशेषत: तरुणांनी पुढाकार घेतला असून श्रमदानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा क्रियाशील प्रयोग राबविण्यासाठी धडपड सुरू आहे. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच गावातील तलाव आणि विहिरीतील पाणी आटते.
गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून तरुणांनी येथे श्रमदान सुरू केले आहे. 

कष्ट करणाऱ्या ग्रामस्थांना आता हवी आहे ती मदत. कारण पावसाळ्यापूर्वी तलावाचे गाळ काढण्याची गरज आहे. त्यासाठीच खर्चही मोठा आहे. श्रमदानावर मर्यादा येत आहेत. अद्ययावत यंत्रांचीही आवश्‍यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व या क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांनी मदत म्हणून या गावाला सहकार्य करावे व चांगल्या उपक्रमात हातभार लावावा, अशी भावना येथील ग्रामस्थांची आहे.

१०२ हेक्‍टर डोंगरावर पावसाचे पाणी जिरविण्याचे ध्येय
गावाच्या उत्तरेस १०२ हेक्‍टर डोंगरावर पडणारा पाऊस डोंगरावरच जिरविण्याच्या ध्येयाने ग्रामस्थ कामाला लागले आहेत. डोंगराच्या ओघळीत असणाऱ्या जुन्या बंधाऱ्यांची पाण्याची पातळी एकच कशी राहील, याचे तंत्रज्ञानही आत्मसात करून त्या पद्धतीने काम केले. 

पाणी फौंडेशनच्या गावांची पाहणी
ग्रामस्थांनी अभिनेता अमिर खानच्या पाणी फौंडेशनचे काम पाहण्यासाठी त्या गावांचा दौरा केला आहे. वेळू गावचे ॲड. भोसले यांना बोलावून त्यांचेही मार्गदर्शन घेतले. त्या पद्धतीने डोंगरात बंधारे बांधण्यास सुरवात केली आहे. 

पंचवीस ते तीस बंधारे बांधले
पावसाचा प्रत्येक थेंब येथील डोंगरावर मुरवायचा आहे. त्यानंतर ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला गावातील तलावाच्या दिशेने वळविले आहे. तलाव आणि विहिरीतील पाण्याचा उपयोग होणार आहे. एक मीटर रुंदीचे व तीस मीटर लांबीचे पंचवीस ते तीस बंधारे बांधले.

Web Title: Kolhapur News social work in Majale for solution of water problem