खरंच...एवढ्या नैवेद्यांची गरज आहेच का?

खरंच...एवढ्या नैवेद्यांची गरज आहेच का?

कोल्हापूर - रक्षाविसर्जनासाठी झालेल्या गर्दीने सकाळी पंचगंगा स्मशानभूमी फुललेली असते. प्रथा परंपरेचा भाग म्हणून रक्षाविसर्जनानंतर चितेच्या जागी नैवेद्य ठेवण्याची पद्धत असते. घरचा नैवेद्य, आजोळचा नैवेद्य, माहेरचा नैवेद्य, मित्र परिवारांचा नैवेद्य अशी वेगवेगळ्या आहारांची रास नैवेद्याच्या रूपातून मांडली जाते. नैवेद्याशिवाय फळफळावळ, बेकरीचे पदार्थ, काही पेयांसाठीही मध्ये मध्ये जागा केली जाते आणि या नैवेद्याला कावळ्याने चोच लावावी म्हणून कावळ्याची प्रतीक्षा केली जाते.

कावळा कमी-अधिक उशिराने येतो. नैवेद्यातल्या एखाद्याच पदार्थाला चोच लावतो. रक्षाविसर्जनाचा विधी त्या क्षणी पूर्ण होतो; पण त्यानंतर तासाभरात हा नैवेद्य केवळ एक कचरा ठरतो. किमान आठ ते दहा भुकेल्यांचा आधार ठरू शकेल, असा हा नैवेद्य अक्षरशः कचरा म्हणून मोठ्या बुट्ट्यात भरला जातो आणि लगतच्या कोंडाळ्यात टाकला जातो. त्यामुळे रक्षाविसर्जनावेळी खरोखरच इतक्‍या मोठ्या प्रमाणात नैवेद्य आणावा का? हा एक प्रश्‍न आपल्या जाणीवपूर्वक उत्तराची अपेक्षा करतो. 

रक्षाविसर्जनाच्या वेळी किती नैवेद्य ठेवावा, हा ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्‍न आहे. आम्ही स्मशानातले कर्मचारी त्यासंदर्भात कोणताही सल्ला देऊ शकत नाहीत, मात्र एवढे खरे की, नाईलाजास्तव हा नैवेद्य भरून कचऱ्यात टाकावा लागतो.
- विजय पाटील,
मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका

मृत्यूसारख्या कौटुंबिक भावनेशी संबंधित हा प्रश्‍न आहे. जरूर त्या त्या कुटुंबाने त्या त्या क्षणाची गरज, प्रथा, परंपरा म्हणून केलेला विधी आहे; पण एखाद्या नव्या बदलाची सुरवात करणारे गाव म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. त्यामुळे प्रथा परंपरेला कोठेही छेद न देता फक्त ढीगच्या ढीग नैवेद्य वाया घालवण्याऐवजी नैवेद्याची एकच पत्रावळी हा बदल अनेकांच्या मनात आहे; पण याला तोंड कोणी फोडायचे किंवा या बदलाला सुरवात कोठून करायची, हा प्रश्‍नही अनेकांच्या मनात दडलेला आहे. 

पंचगंगा स्मशानभूमीत शुक्रवार, शनिवार व एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी व काही सणाचे दिवस वगळता. रक्षाविसर्जनानंतर चितेच्या ठिकाणी नैवेद्याची मांडणी करून कावळ्याने त्याला चोच लावण्याची प्रतीक्षा केली जाते. प्रथेनुसार नैवेद्यात मटण, अंडी, कुरवड्या, पापड, भाकरी, पालेभाजी, चपाती, भजी, पांढरा भात, दहीभात, जिलेबी, लाडू, पिवळा भात, खिर, केळी, सफरचंद, पेरू, चिकू, ब्रेड, खारी, बटर, चहा, दूध, फरसाण असे त्यात वैविध्य असते. काही कुटुंबातील प्रथेनुसार दारू व गांजा भरलेली चिलीमही ठेवली जाते. हे सारे चितेच्या जागेवर मांडले जाते. स्मशानातील गूढ वातावरणाचे सावट या नैवेद्यावर असते.

हा नैवेद्य मांडला की स्मशानातल्या पत्र्याच्या शेडवर कावळे येण्यास सुरवात होते. त्यांच्या पंखांची फडफड शांत वातावरणातही जाणवू लागते. बहुतेक वेळा एखाद दुसरा कावळा भर्रकन नैवेद्यावर येतो. उकडलेले अंडे, अंड्याची पोळी किंवा दही भातावर, भजीवर, फळावर चोच मारून एखादा तुकडा खातो. कावळ्याने चोच लावायचा अवकाश, स्मशानातली गर्दी पांगू लागते. आपण ठेवलेल्या एवढ्या मोठ्या नैवेद्याचे पुढे काय झाले, याकडे क्वचितच कोणाचे लक्ष असते.

लोखंडी कोंडाळ्यात नैवेद्य...
स्मशानातली गर्दी बाराच्या सुमारास पूर्ण संपते. तेथे एक नीरव शांतता जाणवू लागते. मांडलेल्या या नैवेद्यावरही शांततेचे एक सावट असते. दोघे-तिघे मद्यपी येतात. नैवेद्यावरील दारूच्या बाटल्या उचलतात. सोबतच्या प्लास्टिकच्या पिशवीत नैवेद्यावरील शेलके पदार्थ काढून घेतात व निघून जातात. त्यानंतर दुपारी बाराला हे नैवेद्य कर्मचारी मोठ्या बुट्टीत भरतात आणि स्मशानाच्या गेटजवळ असलेल्या लोखंडी कोंडाळ्यात टाकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com