पत्रकारांनी समाजमनाचे अस्त्र बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील

पत्रकारांनी समाजमनाचे अस्त्र बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील

कोल्हापूर - सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणाराच खरा पत्रकार असतो. बदलत्या काळातही पत्रकारांनी समाजमनाचे पत्र, मित्र आणि निर्भीड अस्त्र बनावे, असे स्पष्ट सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर प्रेस क्‍लबतर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सोहळा  सजला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते.

राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर ४५ मिनिटांचा संवाद साधला. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेपासून ते सध्याच्या पत्रकारितेपर्यंतचे विविध पैलू त्यांनी उलगडले. केवळ पत्रकार म्हणूनच नव्हे तर झपाट्याने होत असलेली संवादक्रांती आणि ती आत्मसात करताना होणाऱ्या गमती-जमती, जाहिरातींचे बदललेले स्वरूप आणि एकूणच व्यवसायाचा प्रवासातील त्यांच्या अनुभवांची शिदोरीही त्यांनी रिती केली.

‘सकाळ’चे कौतुक
पत्रमहर्षी नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात १९३२ मध्ये ‘सकाळ’ सुरू केला आणि सामान्य माणसांची सुख-दुःखे जाणीवपूर्वक पत्रकारितेत आणली. याबाबतच्या आठवणीही राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी जागवल्या. त्यांनी पुरस्कारप्राप्त पत्रकार व छायाचित्रकारांच्या सत्कारासाठी खास सिक्कीमहून महावस्त्रे आणली.

ते म्हणाले, ‘‘वृत्तपत्र चालवण्याचीही एक कला असते आणि ती 
ज्याला जमते, तोच यशस्वी होतो. कारण एका वृत्तपत्राचा निर्मिती खर्च आणि त्याची किंमत यात फार मोठी तफावत असते. त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. जगाला समानतेची शिकवण देणाऱ्या कोल्हापूरच्या मातीतील पत्रकारितेलाही मोठी परंपरा आहे आणि नव्या पिढीने ती अधिक समृद्ध केली आहे.’’ 

अमूक अमूक प्रश्‍न ऐरणीवर आला आहे, असे आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळी ऐरण म्हणजे काय, ती आता कुठे पाहायला मिळते, अशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती नव्या पिढीने आवर्जून घ्यायला हवी. बदलांवर स्वार होणाराच येत्या काळात पत्रकारितेत टिकेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.  

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर स्वाती यवलुजे, खासदार धनंजय महाडिक यांनीही कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमात पत्रकार समीर देशपांडे, राहुल गायकवाड, प्रताप नाईक, प्रमोद सौंदडे यांना उत्कृष्ट पत्रकार व छायाचित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘ॲड फाईन’चे अमरदीप पाटील यांना जाहिरात क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवण्यात आले. रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी प्रास्ताविकात महिन्याभरात प्रेस क्‍लबमध्ये ज्येष्ठ पत्रकार (कै.) सोपान पाटील यांच्या नावाने ग्रंथालय सुरू केले जाणार असल्याचे सांगितले. प्रेस क्‍लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार, विकास पाटील, शिवाजी साळोखे, विजय कुंभार यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित होत्या. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com