विद्यार्थ्यांचा टक्का वाढला; पण गुणवत्ता घसरली

युवराज पाटील
सोमवार, 23 जुलै 2018

कोल्हापूर - दरवर्षी दहावीच्या निकालाचा आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा आलेख उंचावत असला, तरी राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षणातून मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर - दरवर्षी दहावीच्या निकालाचा आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा आलेख उंचावत असला, तरी राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षणातून मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ६६ टक्के विद्यार्थ्यांना गणितात ३५ टक्केही गुण मिळवता आलेले नाहीत. सामाजिक शास्त्रांपासून ते विज्ञान विषयातही विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावल्याचे दिसते.

मंडळाच्या किंवा शाळेच्या परीक्षांच्या ठराविक चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी आवश्‍यक कौशल्ये आत्मसात केली आहेत का हे पाहण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) देशभर विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. यामध्ये तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची व शाळेची निवड केली. या विद्यार्थ्यांचा राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल घवघवीत लागला असला, तरी चाचणीचे निष्कर्ष मात्र निकालाच्या विरुद्ध दिसत आहेत.  या गुणवत्ता सर्वेक्षणात राज्यांचे जिल्हानिहाय निष्कर्ष जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा पहिल्या पाचमध्ये आहे; मात्र शैक्षणिक गुणवत्ता चिंताजनक आहे. राज्याची राजधानी मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे. 

दहावी निकालाची आकडेवारी उल्लेखनीय आहे; मात्र जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती चिंताजनक आहे.
-डॉ. आय. सी. शेख,

प्राचार्य, डाएट कॉलेज, कोल्हापूर

राज्याचे चित्र

  •     गणितामध्ये राज्यातील सरासरी ६६ टक्के विद्यार्थ्यांना ३५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण मिळालेत. तर केवळ १.३३ टक्का विद्यार्थी ७६ ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहेत. याउलट राज्य मंडळाच्या परीक्षेत मात्र गणितात ८९.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  •     विज्ञानात ६०.८७ टक्के विद्यार्थी ३५ टक्‍क्‍यांपर्यंत आहेत, तर फक्त ०.७९ टक्का विद्यार्थी ७६ ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहेत. राज्य मंडळाच्या परीक्षेत विज्ञान विषयाचा निकाल हा ९४.३७ टक्के लागला आहे.
  •     सामाजिक शास्त्रांमध्ये ३७.९९ टक्के विद्यार्थ्यांची मजल ३५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुणांवरच थांबली आहे. केवळ ०.५४ टक्का विद्यार्थी ७६ ते १०० टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहेत. राज्य मंडळाच्या निकालानुसार मात्र ९६.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
  •     इंग्रजीत ५६.६४ टक्के मुले ३५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण मिळवणारी आहेत; मात्र राज्य मंडळाच्या निकालानुसार ९०.१२ टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, तर फक्त २.७० टक्के विद्यार्थी ७६ ते १०० टक्‍क्‍यांदरम्यान आहेत.
  •     भाषा विषयातील विद्यार्थ्यांची कामगिरी बरी आहे. राज्यात १५.२८ टक्के विद्यार्थी ३५ टक्‍क्‍यांपर्यंत आहेत, तर ७६ ते १०० टक्‍क्‍यांच्या दरम्यान २०.९२ टक्के विद्यार्थी आहेत.
Web Title: Kolhapur News SSC result issue