चालकांची कमाई, प्रवाशांची धुलाई

शिवाजी यादव
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर - एसटीच्या निमआराम, शिवशाही बसगाड्या प्रमाणित न केलेल्या खासगी हॉटेल व ढाब्यांवर थांबवल्या जातात. तेथे चढे भाव आकारले जातात. राज्यातील २४ हून अधिक बसस्थानकांत कॅन्टीन सेवाच सुरू नाही. स्थानकावरील कॅन्टीन सक्षम नसल्याने गाड्या खासगी हॉटेल, ढाब्यांवर थांबविण्याची वेळ येते. येथे चालक, वाहकांची ‘कमाई’,  हॉटेल, ढाबेवाल्यांचा ‘नफा’, तर प्रवाशांचा खिसा ‘रिकामा’ अशी अवस्था आहे.

शिवशाही, निमआराम गाड्या दीर्घप्रवासात ठराविक स्थानकावर प्रवासी घेण्या-उतरण्यासाठी थांबतात; मात्र स्थानकात कॅन्टीनमध्ये बसण्यास अपुरी जागा, जेवण नाही किंवा रात्री दहानंतर कॅन्टीन बंद असते; तर काही ठिकाणी स्वतच्छतागृहे स्वच्छ नाहीत, म्हणून गाड्या पुढे जातात. तीन तासांच्या प्रवासानंतर गाड्या खासगी हॉटेल, ढाब्यांवर थांबतात. वास्तविक एसटी महामंडळाने काही खासगी हॉटेल, ढाबे प्रमाणित केले आहेत. तेथे न थांबविता प्रमाणित नसलेल्या खासगी हॉटेल, ढाब्यांवर गाड्या थांबवतात. 

येथे चालक, वाहकांना मोफत जेवण व चार ते पाचशेची बिदागी काही हॉटेल, ढाबेवाले देतात असे सांगण्यात येते. एका फेरीला पाचशे रुपये मिळतात; म्हणून चालक-वाहक कारणे काढून खासगी हॉटेल व ढाब्यांवर गाडी थांबवितात. वास्तविक गाडी खासगी हॉटेल, ढाब्यांवर थांबवली तर त्या वाहकाला पाचशे रुपये दंड एसटी बसविते; मात्र अशी दंडात्मक कारवाई महिन्यात राज्यात १० ते १५ कर्मचाऱ्यांवर होते. अनेकदा प्रवाशांनी आग्रह केला म्हणून गाडी थांबविली, असे कारण देत कर्मचारी कारवाईतून निसटतात; तर काही वेळा एसटी अधिकाऱ्यांना ‘खूश’ करणारा वाटा देतात.

प्रवाशांना फटका असा
परिणामी दर्जाहीन चहासाठी १५ रुपये, डाळ-भातासाठी ६० ते ८० रुपये, जेवणासाठी १०० ते १५० रुपये असे चढे भाव द्यावे लागतात. अनेकदा अर्धकच्चे पदार्थ असतात, तरीही गाडी थांबली, पर्याय नाही म्हणून प्रवासी निमूटपणे खातात. तेव्हा चालक-वाहकांची ‘कमाई’, प्रवाशांच्या खिशाला कात्री, खासगीवाल्यांचा नफा वाढण्यास हातभार लागतो.  

एसटीच्या कोणत्याही गाडीतील प्रवाशाची गैरसोय झाल्यास, त्याची तक्रार एसटी गाडीत तक्रार बुकमध्ये करता येते. अनेक प्रवाशांना याची माहितीच नसल्याने तक्रार करत नाहीत. काही वेळा चालक-वाहक गयावया करत तक्रार नोंदच करू देत नाहीत. त्यामुळे खासगी हॉटेल व ढाब्यांवर गाड्या थांबविण्याचे प्रमाण वाढते आहे.
-एक सेवानिवृत्त,
 एसटी वाहतूक अधिकारी

Web Title: Kolhapur News ST Canteen issue special