देखणा अन्‌ सर्वांगसुंदर प्रयोग...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची नाटकं तितक्‍याच समर्थपणे पेलण्याची धमक फिनिक्‍स क्रिएशन्सने यापूर्वीही दाखवली आहे आणि यंदाच्या स्पर्धेतही या टीमनं तेंडुलकरांच्याच ‘शांतता ! कोर्ट चालू आहे..’ या नाटकानं पुन्हा ते सिद्धही करून दाखवलं. एका देखण्या आणि तितक्‍याच सर्वांगसुंदर प्रयोगाची अनुभूती त्यांनी तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना दिली.

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची नाटकं तितक्‍याच समर्थपणे पेलण्याची धमक फिनिक्‍स क्रिएशन्सने यापूर्वीही दाखवली आहे आणि यंदाच्या स्पर्धेतही या टीमनं तेंडुलकरांच्याच ‘शांतता ! कोर्ट चालू आहे..’ या नाटकानं पुन्हा ते सिद्धही करून दाखवलं. एका देखण्या आणि तितक्‍याच सर्वांगसुंदर प्रयोगाची अनुभूती त्यांनी तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना दिली. दरम्यान, स्पर्धेतील हा प्रयोग गर्दीच्या दृष्टीने ‘ओव्हर फ्लो’च झाला तर ध्वनीयंत्रणेतील काही तांत्रिक त्रुटींमुळे प्रेक्षकांतून ‘आवाज’ अशी ओरड काही वेळा झाली तरीही त्यामुळे कुठेही डगमगून न जाता या टीमनं प्रयोग अक्षरशः जगला आणि प्रेक्षकांनाही तो जगायला लावला. 

मराठी रंगभूमीवर यापूर्वी या नाटकानं अनेक विक्रम मोडीत काढले. त्याशिवाय १९६७ साली सर्वात पहिल्यांदा भ्रूणहत्येसारखा गंभीर विषय सर्वांसमोर आणला. अनेक भाषांत नाटकाचा अनुवाद आणि प्रयोगही झाले. ‘फिनिक्‍स’ने यंदा हे नाटक करायचं ठरवलं आणि दीड महिन्यांच्या परिश्रमानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांना तसूभरही तडा जाऊ न देता ते सादर केलं. अभिनयासह सर्वच तांत्रिक बाजूंत ते उजवं ठरलं. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या आयुष्यातलं हे महत्त्वाचं नाटक. राज्य नाट्य स्पर्धेसाठी १९६७ मध्‍ये हे नाटक तेंडुलकरांनी लिहिलं आणि ‘रंगायन’ने ते सादर केले होते. स्पर्धा तीन आठवड्यांवर आली होती आणि तेंडुलकरांनी नाटक लिहायला सुरवात केली. रोज लिहिलेली पानं ते पाठवायचे आणि त्यानुसार प्रत्येक जण आपापल्या भूमिका समजून घेत होता. वीस डिसेंबर १९६७ ला पहिला प्रयोग झाला आणि पुढे ‘हाऊसफुल्ल’ असे चित्र कायम राहिले. त्याचीच प्रचिती येथील केंद्रावर ‘फिनिक्‍स’ने दिली.

पात्र परिचय
 प्रमोद पुजारी (सुखात्मे), अवधूत पोतदार (पोंक्षे), अमर सकटे (रोकडे), अमित कांबळे (काशीकर), धनश्री गुरव (सौ. काशीकर), सचिन वाडकर (कर्णिक), योगेश हवालदार (सामंत), प्रशांत देशिंगे, महादेव चौगुले, स्वप्नील ठोंबरे (गावकरी) आणि राजश्री खटावकर (बेणारे)

 दिग्दर्शक- संजय मोहिते
 प्रकाशयोजना- रोहन घोरपडे
 नेपथ्य- अमोल नाईक, राहुल पाटील
 पार्श्‍वसंगीत- सुशांत कांबळे, श्रेयस मोहिते
 रंगभूषा- गणेश माने
 वेशभूषा- राजश्री खटावकर
 केशभूषा- मीनाक्षी हांडे
 

Web Title: Kolhapur News State Drama Competition special