बुरशीजन्य विकारापासून दूर राहा

अमोल सावंत
बुधवार, 14 जून 2017

लहान मुलांची काळजी हवी; विविध बुरशीजन्य विकारांचा पावसाळ्यात प्रादुर्भाव

लहान मुलांची काळजी हवी; विविध बुरशीजन्य विकारांचा पावसाळ्यात प्रादुर्भाव

कोल्हापूर - मान्सूनचे आगमन झाले, की अन्य पावसाळी रोगांबरोबर घातक त्वचारोग निर्माण करणाऱ्या बुरशीजन्य विकारांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यातील हे बुरशीजन्य विकार अन्य त्वचारोगांप्रमाणेच सुरवातीला सहज ओळखून न येणारे; पण त्वचेवर पसरले की, अक्षरश: दमवून टाकणारे ठरतात. यासाठी पावसाळ्यात आपल्या त्वचेवर लक्ष ठेवून असा एखादा विकार उमटल्यास त्वरित त्वचारोगतज्ज्ञांना भेटून औषधोपचार करून घेणे महत्त्वाचे ठरते. विशेषत: काख, जांघा, मांड्या, टाचा, पायाचे तळवे, नखे, केसांची तसेच लहान मुलांच्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. 

बुरशीजन्य विकाराबरोबर जीवाणू, विषाणू, परजीवींमुळेही काही त्वचाविकार निर्माण होतात. प्रौढांपेक्षा त्वचाविकारांची तीव्रता लहान मुलांमध्ये आढळते; कारण ही त्वचा नाजूक असते. यामुळे अशा त्वचेवर बुरशीजन्य विकार लगेच बळावतात. त्वचाविकार तज्ज्ञ म्हणतात, त्वचेशी संबंधित कोणताही विकार झाला की, त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा विकार वाढत जाऊन त्वचा मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ शकते. शिवाय त्वचेवर कायमस्वरूपी डाग निर्माण होतात. ती कुरूप दिसते. त्वचेची काळजी घेतल्यामुळे तुम्ही त्वचा विकारापासून दूर राहू शकता. यासाठी फळांचे रस, बर्फ आदी विकारग्रस्त भागावर लावणे यासारखे घरगुती उपायही तुम्ही करू शकता, असा सल्ला त्वचाविकार तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञ म्हणतात, पावसाळी काळात अतिशय फिट्ट कपडे घालू नका. शक्‍यतो शूज वापरू नका. शूज वापरल्यास तातडीने सॉक्‍स धुऊन टाका. शूजच्या आतील भाग लागलीच कोरडा करा. त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटणे, अतिखाज सुटणे आदी लक्षणांनीयुक्त संबंधित २० टक्के रुग्णांची वाढ पावसाळी काळात होते. पावसाळ्यात खेळायला लहान मुलांना आवडते. अशा वेळी खेळून झाल्यावर तातडीने आंघोळ करणे, अँटीबॅक्‍टेरियल साबणाचा वापर करणे हितावह ठरते. याबरोबर भरपूर पाणी पिल्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. 

पावसाळ्यात अनेकदा हवेतील आर्द्रता वाढते. मध्येच तीव्र ऊन पडते. अशावेळी बुरशीजन्य, विषाणूजन्य विकारात वाढ होते. कॅंडीडासारख्या बुरशीमुळे नखे बाधीत होतात. ॲथलिट फुटमुळे खूप खाज सुटते. त्वचादाह होतो. तसेच पावसातून आल्यानंतर तातडीने अंग कोरडे करा.

पावसाळी बुरशीजन्य विकार 

शरीरावर पुरळ उठणे
त्वचेवर लाल, काळे डाग उमटणे 
खवल्यासारखी त्वचा निघणे 
खरूज, नायटा, इसब होणे. 
त्वचेवर लोम निर्माण होणे. 
खाज, कंड सुटून त्वचा लाल होणे. 
काखेत, जांघेत, मानेच्या भोवती प्रमाणापेक्षा जास्त मेलानीन जमल्यामुळे त्वचेचा रंग गडद होणे. 
त्वचेच्या विविध ॲलर्जीज निर्माण होणे.  
त्वचेवर चट्टे उमटणे.

कोरडे राहा
पावसात घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट वापरा 
चांगल्या प्रतीची टाल्कम पावडर वापरा. कोरड्या खरखरीत टॉवेल्सचा वापर करा. 
पावसाळ्यात दिवसा कॉटन-खादीचे कपडे वापरा. 
दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या.   
फॅन्सी चप्पल्स, घट्ट शूज वापरू नका. साधे चप्पल वापरा. 
काख, कान, मान, जांघा, मांड्या, कान, गुप्तांग, पाठीचा भाग, कमरेभोवतीची त्वचा, टाचा, तळवे स्वच्छ, कोरडे ठेवा.

Web Title: kolhapur news Stay away from fungal diseases

टॅग्स