कोल्हापूरात पोलिसांचा २२ ठिकाणांवर ‘वॉच’

राजेश मोरे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  ‘मावशी, काकी मी क्राईम ब्रॅंचचा पोलिस आहे, पुढे मारामारी, खून झाला आहे, गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेवा’ अशा बतावण्या करत चोरटे खुलेआम चेन स्नॅचिंग करू लागलेत. वाढत्या चेन स्नॅचिंगच्या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. शहरातील २२ ठिकाणांवर यापुढे पोलिसांचा वॉच असणार आहे.

कोल्हापूर -  ‘मावशी, काकी मी क्राईम ब्रॅंचचा पोलिस आहे, पुढे मारामारी, खून झाला आहे, गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेवा’ अशा बतावण्या करत चोरटे खुलेआम चेन स्नॅचिंग करू लागलेत. वाढत्या चेन स्नॅचिंगच्या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. शहरातील २२ ठिकाणांवर यापुढे पोलिसांचा वॉच असणार आहे. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शहरातील सर्व ठाण्यातील डी. बी. पथकाच्या दररोजच्या कामाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले. 

चार आठवड्यात चेन स्नॅचिंगचे पाठोपाठ प्रकार घडलेत. महावीर गार्डनमध्ये सायंकाळी पतीसोबत वॉकिंगला गेलेल्या महिलेचे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्याने हिसकावून नेले. प्रतिभानगर येथे सायंकाळी फिरायला गेलेल्या वृद्धेला चोरट्याने आपण क्राईम ब्रॅंचमधील पोलिस असल्याची व पुढे चाकूहल्ला झाला आहे, अशी बतावणी करत, तुमच्या गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेवा, असे सांगितले. त्यानंतर त्याच्या साथीदाराने हातातील सहा तोळे दागिन्यांची पिशवी हिसकावून नेली. 

काल आपटेनगर येथे दोघा मोटारसायकलस्वारांनीही साध्या वेशातील पोलिस असल्याचे सांगत महिलेला पुढे खून झाल्याचे सांगितले, यावर विश्‍वास ठेवून महिलेने गळ्यातील साडेसहा तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी हातोहात लंपास केले. मुक्तसैनिक परिसरात सायंकाळी अंधाराचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन लंपास केली.

शहरातील उद्यानात अगर निर्जनस्थली बसलेल्या प्रेमीयुगुलांनाही साध्या वेशातील पोलिस असल्याचे भासवून त्यांच्याकडून प्रकरण मिटविण्यासाठी दागिने, किमती वस्तू काढून घेण्याचे प्रकार घडत आहेत. 

शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या प्रकाराची गंभीर दखल शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी घेतली. त्यांनी आज सायंकाळी सर्व ठाण्यांतील डी. बी. पथकाला बोलवून त्यांची कानउघाडणी केली. 

दररोज काय काम केले, याचा अहवाल पाठवा. गस्तीबरोबर लोकसंपर्क वाढवा. तातडीने चोरट्यांचा छडा लावा, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या. डॉ. अमृतकर यांनी चेन स्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्यात शहरातील ज्या ज्या निर्जन ठिकाणी वारंवार चेन स्नॅचिंगचे प्रकार होतात, अशी २२ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्या ठिकाणासह गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांचा वॉच ठेवला आहे. ही विशेष मोहीम तरी चोरट्यांना जेरबंद करेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

चेन स्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. डी. बी. पथकांनाही आवश्‍यक त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच संबंधित चोरट्यांना जेरबंद केले जाईल.
- डॉ. प्रशांत अमृतकर, 
शहर पोलिस उपअधीक्षक.

पोलिसांनी केलेल्या उपाययोजना
- शहरातील निश्‍चित २८ ठिकाणांवर पोलिसांचा वॉच
- सर्व पोलिस ठाण्यातील डी. बी. पथकांचा संयुक्तिक तपास
- महिला कर्मचारी अधिकाऱ्यांची मदत 
- शहरातील सीसीटीव्हींची मदत 
- तपासात नागरिकांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न 

Web Title: Kolhapur News to stop Chain Snatching incident police watch on 22 spots