वादळी वाऱ्याने शिरोळ तालुक्‍यात तीन कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

जयसिंगपूर - वादळी वाऱ्याने गुरुवारी शिरोळ तालुक्‍याचे मोठे नुकसान झाले. ऊस, टोमॅटो, केळी, भाजीपाला पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेच शिवाय सुमारे 35 घरांची पडझड झाली. अनेक कारखाने आणि शाळांवरील पत्रे उडून पडले. वादळी वारा नव्हे हि तर त्सुनामीची लाट लाटच वाटवी असे चित्र तालुक्‍यात निर्माण झाले.

जयसिंगपूर - वादळी वाऱ्याने गुरुवारी शिरोळ तालुक्‍याचे मोठे नुकसान झाले. ऊस, टोमॅटो, केळी, भाजीपाला पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेच शिवाय सुमारे 35 घरांची पडझड झाली. अनेक कारखाने आणि शाळांवरील पत्रे उडून पडले. वादळी वारा नव्हे हि तर त्सुनामीची लाट लाटच वाटवी असे चित्र तालुक्‍यात निर्माण झाले.

क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आमदार उल्हास पाटील, शिरोळचे तहसिलदार गजानन गुरव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी नुकसानीची पाहणी केली. महसूल खात्याने पंचमाने करण्यास सुरुवात केली आहे. वादळी वारा आणि पावसाने तालुक्‍यातील सुमारे तीन कोटी कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली. 

पावसापेक्षा वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. रहात्या घरावरील पत्रे, जनावरांच्या गोठ्यांनाही वादळाची झळ बसली. यड्राव, जांभळी, टाकवडे, हरोली आदी भागात सर्वाधिक नुकसान झाले. अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूकही ठप्प झाली. शिवाय, शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक गावांमध्ये वीज पुरवठा ठप्प होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नशील होते. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात होते.

यड्राव येथील पोपट मोरे, राजेंद्र डकरे, रामचंद्र कुंभार, लक्ष्मण निर्मळ, शौकत मोमीन, प्रकाश टाकळे, मुस्तफा कोजलगे यांच्या घरांची मोठी पडझड झाली आहे. यड्राव गावभागात पडियार वसाहत, आर. के. नगर, बेघवर वसाहत, इंदिरा नगरमधील अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पोलही मोडून पडले आहेत. वादळाने नुकसान झाल्याने घरे सावरण्याची धांदल शुक्रवारी अनेकांची सुरु होती. आण्णासाहेब पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. 

ऊस पिकाबरोबर, केळी, टोमॅटो व भाजीपाला पिकांची मोठी हनी झाली आहे. हातातोंडाला आलेली पिके डोळ्यासमोर नाहीशी झाल्याचे पाहताना शेतकऱ्यांच्या काळजाचे पाणी होताना दिसत होते. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, माजी पं.स.सदस्य सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, सरपंच श्रीमती सुमन झुटाळ, माजी सरपंच सरदार सुतार आदींनी नुकसानीची पाहणी केली. 

वादळी वाऱ्याने भिंत अंगावर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या श्रीमती चिमाबाई मारुती गुंजुटे या वृध्देला शासनाकडून चार लाखांची मदत दिली जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना अधिकाधिक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

- उल्हास पाटील, आमदार

वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्यांना तातडीने अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शुक्रवारी सकाळपासून तीन विभागात पंचनाम्याचे काम सुरु आहे. इतर गावातील तलाठी, ग्रामसेवकांनाही याकामात सहभागी करुन घेण्यात आले आहे. पंचनामे झाल्यानंतर तातडीने सानुग्रह अनुदान दिले जाईल. 

- गजानन गुरव, (तहसिलदार शिरोळ)

162 पोल मोडले
वादळी वाऱ्याने तालुक्‍यातील महावितरणचेही मोठे नुकसान झाले. तालुक्‍यातील विविध गावांमध्ये 162 हून अधिक विद्युत पोल मोडून पडले. गुरुवारी रात्रीपासून महावितणच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यड्रावमध्ये सुमारे 18 तास विज पुरवठा खंडीत झाला आहे. 

Web Title: Kolhapur News stormy Rains in Shirol Taluka